समाजसेवेचा वसा आणि वारसा जपणारे उमेशराव आपटे !
समाजसेवेचा वसा आणि वारसा जपणारे उमेशराव आपटे ! प्रिय श्री. उमेशराव व सौ. वैशाली ताई, सप्रेम नमस्कार. आज प्रथमच तुम्हाला लिहितो आहे. गेल्यावर्षी पासून "कोरोना महामारीच्या संकटाला " सगळे जग सामोरे जात आहे. हे संकट आता उग्र रूप धारण करीत आहे. अशावेळी कुणाचातरी विश्वासाचा आधार माणसाला हवा असतो. तो ज्याच्याकडून मिळतो त्यालाच श्रद्धावान माणूस "देवदूत" म्हणतो. असे देवदूत बनून तुम्ही उभयता मुमेवाडी ता.आजरा येथील "मुकुंदरावदादा आपटे कोविड सेंटर" वर अहोरात्र काम करीत आहात. या आजाराचे नुसते नाव ऐकले तरी काळजाचा ठोका चुकतो. अशा ठिकाणी अत्यंत धाडसाने आपण काम करीत आहात. खरंतर जीव धोक्यात घालणे म्हणजे काय ते आपल्याकडे पाहिल्यावर कळते. रक्ताची माणसे जवळ जायला घाबरतात तिथे तुम्ही धर्माचे "भाऊ बहिण " बनून सेवा करीत आहात. "सेवापरमो धर्मः" असे वचन आहे. या वचनाचा वस्तुपाठ म्हणजेच तुमचे काम. मी समाजसेवा करतो म्हणून समाजसेवा घडत नाही. तो रक्तातच गुण असावा लागतो. त्यासाठी त्यागही करावा लागतो. हे सारे संस्कार कै.मुकुंदरावदादा यांचेकडून आपल्याला मिळाले...