आठवणीतली माणसं - 14

त्वमेव बंधु, सखा त्वमेव - श्री.टी.के.पाटील!




    आपल्या आयुष्याचा जमाखर्च आपण कधी तरी करून पहावा. तेव्हा समजते की काय मिळविले,काय गमावले आणि हाती काय राहिले.मी अलीकडे असा विचार करत असतो.पैसा,स्थावर संपत्ती,यापेक्षा जिव्हाळ्याची माणसे किती.आणि लक्षात येते की आपले आयुष्य खरोखरच सार्थकी लागलं.कारण आपण लाख मोलाची माणसं मिळवली. सुप्रसिद्ध कीर्तनकार बाबामहाराज सातारकर हे एका कीर्तनात "जिवलग" शब्दाबद्दल ते म्हणाले, "जीवासोबत जो राहतो,असतो तो जिवलग .आपल्या आयुष्यात ही नात्याची ,रक्ताची माणसं सोडून कांही माणसं "जिवालगत"असतात .त्यांना आपल्या आयुष्यात फार मोठे स्थान असते. म्हणून ती जिवलग बनून जातात. अशा माणसांना आपल्या आयुष्यात एक वेगळे स्थान असते.आपल्या सुखदुःखात, ही आपल्याशी समरस असतात .किंबहुना याच्यापेक्षाही अधिक कांही तरी यांच्याजवळ असते. हे असे नाते असते की निरागस ,निष्पाप भावनांचा तो कल्लोळ असतो.एकमेकांशी निरपेक्ष आत्मियता असते.त्यांच्याशिवाय जीवनाला अर्थ प्राप्त होत नाही. अशी फारथोडी माणसे असतात. अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच. अशा मोजक्या माणसातील एक म्हणजे, माझे सहकारी शिक्षक मित्र श्री.टी.के. पाटील होत.साल असावे 1974.म्हणजे जवळ जवळ 45 वर्षे झाली. जून महिना होता.शाळा नुकतीच सुरू झाली होती. सकाळची 10.30 ची वेळ. एक तरूण साधारण पंचवीशीचा.साडे पाच फूटाची उंची, गोल चेहरा ,सरळ पण बसके नाक ,गव्हाळ रंग, काळेभोर केस मागे विंचरलेले, भरीव कष्टाने बनलेली अंग काठी,पिळदार मिशी,हाप मॅनिला आणि सूट, असा तरूण शाळेत आला .मी कोणीतरी पालक असेल असे समजून , कोणाकडे आला म्हणून विचारले. त्यांनी उत्तर दिले,"मला आजगावकर सर यांनी वसंतराव पाटील सर यांना भेटायला सांगितले आहे. " तेव्हा व्ही.के.पाटील सर आमचे पर्यवेक्षक होते. ते दहावीच्या वर्गावर गेले आहेत.थोड्यावेळाने येतील .बसा स्टाफरूममध्ये असे मी म्हणालो. थोड्यावेळाने पाटील सर आले.त्या तरूणाकडे पाहून ,आलास बरे झाले असे म्हणाले.माझ्याकडे वळून पाटील सर म्हणाले, " नाईक सर,हा आमचा विद्यार्थी टी.के.पाटील, बी.एस्सी ( अॅग्री.)आहे. जख्खेवाडी याचे गाव.आज पासून आपल्या शाळेत हजर होतोय." एवढी ओळख झाली आणि आमच्या गप्पागोष्टी सुरू झाल्या. याच्या पूर्वीची एक आठवण म्हणजे 1967/68 साली माझ्या वडिलांचे एक मित्र" वसंतराव लाटकर " हे गीत रामायण फार छान सादर करायचे.त्यांचा कार्यक्रम श्रीपाद जोशी सरांनी शाळेत ठेवला होता. तेव्हा टी.के.पाटील विद्यार्थी होते.तेव्हा पुसटशी ओळख झाली होती. 1974नंतर मात्र आमची सहकारी व मित्र म्हणून अधिक जवळीक झाली.ती आजतागायत दिवसेंदिवस दृढ झाली आहे. एकमेकांना सहकारी म्हणून मदत करीत शिक्षण क्षेत्रातील अनेक उपक्रम राबविले. टी.के.पाटील यांचे आवडते विषय "गणित " आणि "विज्ञान ".पण त्यात गणितावर त्यांचे प्रभुत्व होते आणि तो आवडता विषय होता. हस्ताक्षर ही सुंदर होते.त्याच प्रमाणे शुद्धलेखनाकडेही त्यांचा विशेष कटाक्ष होता. हातात एक छडी असायची. त्या छडीचा प्रसाद अनेक विद्यार्थ्यांना मिळायचा.गणित हा कांही सर्वांचा आवडीचा विषय नव्हे पण तो सक्तीचा असल्यामुळे तो शिकणे गरजेचे होते. तर दहावी नंतर पुढे शिकायला मिळायचे. पण टी.के.पाटील सरांनी तो सोपा करून मुलांना गोडी लावली होती. ते अत्यंत समरसून व कळकळीने शिकवत.म्हणून प्रसंगी कठोर होऊन छडीचा प्रसाद मिळाला तरी पालकांची तक्रार असायची नाही व मुलांचीही नाही. आज अनेक विद्यार्थ्यी या छडीमुळेच आम्ही चांगले कांही करू शकलो ही भावना व्यक्त करतात .तेव्हा खूप समाधान वाटते असे पाटील सर म्हणतात. आम्ही तीसपसतीस वर्षे सहकारी म्हणून एकमेकांना मदत करीत अनेक शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले. आजगावकर सरांनी एके वर्षी माझ्याकडे व पाटील सरांकडे "शालेय बचत बॅंकेची (संचयिका)जबाबदारी दिली. मुलांना बचतीची सवय लावली. त्यातून मुलांच्या शैक्षणिक खर्चाची तरतूद झाली तसेच शालेय सहलीचा आनंद ही मुलांना घेता आला. शालेय उपक्रम मग ते कोणतेही असोत त्यात जमेल तसे सहकार्य करायचे ही शिस्तीच होती. त्यामुळे आमचे दोघांचे संबंध यायचे. घनिष्ठ मैत्रीत त्याचे रूपांतर केव्हा झाले ते कळलेच नाही. असा आमचा स्नेह आता मुरला आहे. त्याचाच परिणाम म्हणून एकमेकांच्या सुखदुःखाचे वाटेकरी ही झालो. 1980साली दोघांचे जीवनात एक मोठा आघात झाला. दोन दिवसांच्या अंतराने त्यांचे वडील व माझे वडील तडकाफडकी गेले. 20जुलैला पाटील सरांचे वडील गेले.आणि 22जुलैला माझे वडील गेले. "सुखदुःखे समेकृत्वा" असेच झाले. ऊत्तूर हे माझे आजोळ.माझ्या आजोबांची "दळप-कांडप- घाणा"अशी गिरणी होती. ऊत्तूरच्या पंचक्रोशीतल्या गावांना आमची व पोकळे यांच्या गिरणीचा आधार होता.त्यामुळे जख्खेवाडी गावाशी नित्यसंपर्क होता. पाटील सरांच्या घरच्या सर्वांचा दृढ परिचय झाला होता.त्यामुळे मी जसा नातू तसेच पाटील सर ही नातू च समजायचे. आम्ही कांही सहकारी शिक्षकांनी मिळून "राधाकृष्णन माध्यमिक शिक्षकांची सहकारी पत्ता संस्था "स्थापन केली. या संस्थेचे चेअरमन पाटील सर व मी सचिव झालो. अनेक वर्षे संस्था वाढविण्यासाठी प्रयत्न केला.लोकांच्या गरजा स्थानिक पातळीवर भागू लागल्या. पुढे कांही मतभेदामुळे आम्ही दोघांनी पत्ता संस्था सोडून दिली. असे अनेक उपक्रम राबविले जात असत.असेच एकदा आजगावकर सर यांनी एक नवा उपक्रम आम्हाला सांगितला. आणि त्याची जबाबदारी टी.के.पाटील व आमचे सहकारी श्री.लुद्रीक सर यांच्यावर टाकली. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे दोन राष्ट्रीय उत्सव . यावेळी ध्वजारोहण अत्यंत शिस्तबद्ध व गांभीर्याने झाले पाहिजे. यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे हे जाणून तसे प्रशिक्षण गावातील संस्था ,बॅंका, शासकीय कार्यालयात जावून तिथल्या लोकांना द्यावे आणि मदत करावी अशी कल्पना. त्याप्रमाणे आमच्या शाळेत विद्यार्थी निवडणे, त्यांचे गट तयार करणे, या विद्यार्थ्यांना ध्वजाची घडी घालणे, बांधणे ,ध्वजारोहण करणे ,राष्ट्रगीत म्हणणे, याचे दर वर्षी दहा दिवसाचे प्रशिक्षण पाटील सर व लुद्रीक सर देत असत. त्यानंतर ज्या संस्थांनी मागणी केली असेल त्या ठिकाणी त्यादिवशी जाऊन मदत करीत असत.त्या साठी अन्य सहकारी शिक्षकांची मदत घेत असत.हा ऊपक्रम आजही चालू आहे. त्याचे महाराष्ट्रभर खूप कौतुक झाले. यात टी.के.पाटील यांनी खूप कष्ट घेतले आहेत. याची आठवण आजही विद्यार्थी काढतात. विज्ञान प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, शालेय सहली आयोजित करणे यात पाटील सर यांचे मार्गदर्शन मोलाचे असते. स्वतः पाटील सर व्यायामाकडे लक्ष देत असत.त्यांचे आवडते खेळ म्हणजे, "मल्लखांब" आणि "लेझीम " आवड असणार्या कांही विद्यार्थ्यांना घेऊन ते शाळा सुटल्यावर सराव करीत असत. दोन संघही त्यानी तयार केले होते.खरं तर हे काम शारिरीक शिक्षकाचे पण आवडीमुळे पाटील सर करीत. अशीच वर्षे जात होती.आमची मैत्री अधिकाधिक दृढ होत होती.सन 2000 साली असे गप्पागोष्टी करत असताना चर्चा झाली की आपण आता लवकरच निवृत्त होणार .मग पुढे काय ? सामाजिक ऋण कसे फेडणार ? त्यातूनच कल्पना पुढे आली की, प्रबोधनाचे काम आपण चालू ठेऊ.त्यातूनच "त्रिवेणी सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा संस्था, ऊत्तूर "या संस्थेची स्थापना केली. पहिला उपक्रम हाती घेतला तो ,व्याख्यानमालेचा. "संत ज्ञानेश्वर लोकशिक्षण व्याख्यानमाला " दर वर्षी 1 जानेवारी ते 7 जानेवारी अशी घ्यावयाची. गेली 21 वर्षे ती सुरू आहे. यात पाटील सर हे मुख्य आधारस्थंभ . आजपर्यंत लेखक. कवी,कलावंत, विचारवंत, समाजसुधारक अशा अनेक नामवंतानी हजेरी लावली आहे. आता महाराष्ट्रभर व्याख्यानमालेचा बोलबाला झाला आहे. त्या नंतर आंतरराष्ट्रीय किर्ती चे शिक्षण तज्ज्ञ पद्मभूषण" डाॅ. जे .पी. नाईक "व विख्यात शिक्षणतज्ज्ञ " दादा नाईक " यांच्या नावाने "गुणवंत शिक्षक पुरस्कार ".हे पुरस्कार सुरू केले. या सर्व उपक्रमांना भक्कम आधार पाटील सरांचा आहे.एखादा कार्यक्रम पार पाडण्यासाठी लागणारी धडाडी, पडेल ते काम करायचे व कार्यक्रम सुरळीत पार पाडायचे एवढे डोळ्यांसमोर. त्यात सिंहाचावाटा पाटील सरांचा. नोकरीच्या काळातील शेवटची चार वर्षे त्यांना कोल्हापूरला आमच्या संस्थेच्या "करवीर प्रशाला " या शाळेत मुख्याध्यापक म्हणून पदोन्नति मिळाली. तेथेही त्यांनी आपली स्वतःची ओळख निर्माण करून दाखवली. येकीकडे हे सगळे करत असतांना आमचे कौटुंबिक संबंधही अधिकाधिक समृद्ध होत गेले.एकमेकांच्या जीवनातील अविभाज्य घटक असेच आमचे नाते राहिले. एकाच्या पायात काटा टोचला तर दुसर्याच्या डोळ्यात पाणी यावे असं नातं.याच कारण म्हणजे "ये ह्रदयीचे तेह्रदयी घातले " असा एक मेकाशी व एकमेकांचा जिव्हाळा आहे.आमच्या घरचे कार्यक्रम टी.के.पाटील यांच्या शिवाय कधी झाले नाहीत आणि त्यांच्या घरच्या कार्यक्रमांना मी नाही असे कधी झाले नाही. समाजकारणातही त्यांनी शुद्धता राखली आहे. 1983 साली ते गावचे सरपंच झाले. जेवढे शक्य तेवढे त्यांनी गावच्या विकासाकरिता काम केले. राजकारणातील तिढे लक्षात आल्यावर ते अलिप्त झाले पण 35 वर्षांनी लोकांनी त्यांना लोकनियुक्त सरपंच केले आहे. लोकांच्या विश्वासाला ते पात्र झाले याचे कारण म्हणजे सानेगुरुजी यांचेवरची भक्ती आणि राष्ट्रसेवादलाच्या संस्काराची शिदोरी. टी.के.पाटील यांची आई-वडीलांच्या ठिकाणी प्रचंड भक्ती आहे. त्यांचा शब्द त्यांनी कधी ओलांडला नाही. पण वडीलांच्या आकस्मिक निधनानंतर सर्व जबाबदारी आली तेव्हा आईने त्याना सावरले. धीर दिला. तेव्हापासून आई हेच त्यांचं विश्व बनलं. आईच्या शब्दात ते होते.एकुलत्या एक भावाचा संसार त्यांनी मार्गी लावला.त्याच प्रमाणे आपल्या दोन बहिणींच्या संसार थाटण्यासाठी पुढाकार घेतला. निष्काम भावनेने करावे तसे केले.जसं कुटुंबीयासाठी तसच मित्रांनाही मदतीचा हात पुढे केला.माझ्या साठी ते पाठचा भाऊच्या भूमिकेत आहेत. टी.के.पाटील सर खरचं भाग्यवान. त्यांच्या बरोबर "ऊन सावल्यांचा"संसार कधीही कुरकुर न करता करणारी व साथ देणारी पत्नी "सौ.सरोजिनी "लाभली.या माऊलीने न बोलता हा संसार गाडा हाकला.आजच्या काळातील हे दुर्मिळ ऊदाहरण आहे.सोपं नाही पण सौ.पाटील वहिनींनी ते केलं.असा हा आमचा जिवलग मित्र...टी.के. पाटील. सुप्रसिद्ध साहित्यिक पु.ल. देशपांडे यांनी मित्र कोणाला म्हणावे ते एके ठिकाणी फारच छान सांगितले आहे. त्यांनी लिहिलं "ज्याच्याजवळ मनांतील भाव व्यक्त करताना लज्जा,संकोच वाटत नाही. खोटे बोलावेसे वाटत नाही. फसवावेसे वाटत नाही, पापपुण्याची कबुली देण्यास मन कचरत नाही, ज्याला आपला पराक्रम कौतुकाने सांगावासा वाटतो, ज्याच्याजवळ पराभवाचे शल्य उघडे करायला कमीपणा वाटत नाही. ज्याच्या सुखदुःखाशी आपण एकरूप होऊ शकतो ,तो खरा मित्र. मित्र ही जीवनातील अत्यावश्यक गरज आहे. मन निकोप राहण्यासाठी, कर्तृत्वाला प्रोत्साहन मिळण्यासाठी मित्र हवाच." पु.ल.देशपांडे. असा हा माझा सहकारी, जिवलग मित्र टी.के.पाटील यांनी नुकतीच वयाची 70वर्षं पूर्ण केलीआहेत. तो शतायु व्हावा हीच इच्छा !!!! जीवेत शरदः शतम!!!!


- प्रा.श्रीकांत नाईक 

गडहिग्लज, जि कोल्हापूर 

(9405039500)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आठवणीतली माणसं - 17

समाजसेवेचा वसा आणि वारसा जपणारे उमेशराव आपटे !

आठवणीतील माणसं - 5