आठवणीतली माणसं ‐ 12

गुरूवर्य आर.एस.कुलकर्णी - शिक्षक धर्माचे पालन करणारे आदर्श शिक्षक!



    आयुष्यात कांही माणसं अशी येतात की,आपल्याला कायमची ऋणी करून सोडतात.ती आपल्या आयुष्याची कधीही न संपणारी शिदोरी बनून राहतात. आपलं जीवन कृतार्थ होतं.हा सुध्दा एक परमेश्वरी संकेत असतो.अशी माणसं मला लाभली हे माझे भाग्यच होय.अशा माणसांनीच मला समृद्ध केलं.संपन्न केलं.आयुष्याकडे कसे पहावे ते शिकवले.आणि योग असा की ,मी शिक्षक झाल्यावर तर या माणसांचं जीवनातील स्थान अक्षय झालं.त्यांच्याकडे पाहूनच धन्यता वाटावी अशी ही मौल्यवान माणसं हीच माझी श्रीमंती. त्यातलेच एक म्हणजे, " गुरूवर्य आर.एस.कुलकर्णी सर." होय.राष्ट्रसंत,अलौकिक प्रज्ञावंत, प्रचंड व्यासंगी आचार्य विनोबाजी भावे यांनी "शिक्षक-विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना लिहिलेले आहे की" विद्यार्थी, शिक्षक परायण असावा / शिक्षक विद्यार्थ्यी परायण असावा/दोघेही ज्ञान परायण असावेत/ज्ञान सेवापरायण असावे//" विद्यार्थी ज्ञान मिळविण्यासाठी तत्पर असावा. आपल्या शिक्षकांकडून किती शिकू आंणि काय शिकू अशी अवस्था असावी.तल्लीनतेने त्याने ज्ञान मिळवावे.शिक्षकाचीही अशीच अवस्था असावी.आपल्या विद्यार्थ्याला ज्ञान किती देऊ अशी अधीर अवस्था असावी आणि हे ज्ञान देतांना तोही तल्लीन झाला पाहिजे. आणि शिक्षक व विद्यार्थी दोघेही ज्ञान मिळविण्यासाठी तत्पर व तल्लीन असावेत .कारण हे ज्ञान सेवातत्पर असावे.ज्ञानाचा उपयोग समाजाची ,राष्ट्राची सेवा करण्याकरिता त्याचा उपयोग करता यावा. गुरूवर्य आर.एस.कुलकर्णी सर हे याच कोटीतील शिक्षक होते. साधारण पाच-साडेपाच फूटाची उंची, मध्यम बांधा ,गौरवर्ण, सरळ नाक , विलक्षण तेजस्वी डोळे, धीर गंभीर आवाज, बहुतेक वेळा खादीची पॅट,हाप बुश शर्ट, डोक्यावर पांढरी टोपी खादीची ,थोडी तिरकी घातलेली, सोनेरी फ्रेमचा चष्मा, चालताना थोडी तिरकी मान करून चालण्याची लकब,प्रथम दर्शनी साक्षात "नेताजी सुभाषचंद्र बोस "यांची आठवण यावी असे हे प्रभावी व्यक्तीमत्व. सरांचा सगळ्या शाळेवर एक दरारा होता.पण वरून करारी वाटत असले तरी अंतरी निर्मळ झुळूझुळू वाहणार्या प्रेमाचा झरा होता. सरांना "अत्तराचा शौक" होता.अत्यंत नेटकेपणाने ते शाळेत येत असत.कुठेही अव्यवस्थितपणा नाही. "अत्तराच्या छंदामुळे " लांबूनही सर आल्याची वर्दी हा सुवास देत असे .आणि वर्ग एकदम शांत होत असे. "संस्कृत"आणि "इंग्रजी "हे सरांचे आवडीचे विषय. सरांची आत्यंतिक तळमळ व कडक शिस्त ही वैशिष्ट्ये होती. इंग्रजीसाठी तर,"तर्खडकर"यांची पुस्तके मुखोद्गत करून घेतली होती. आमच्या गृहपाठाच्या वह्या अगदी काटेकोरपणे तपासून ते चुका दाखवत असत आणि त्या लागलीच दुरूस्त झााल्या पाहिजेत असा त्यांचा आग्रह असे.त्यात कोणालाही सवलत नाही. त्यांनी कधी काठी वापरली नाही की कधी कठोर शब्द वापरले नाहीत.त्यांच्या तळमळीकडे पाहिल्यावर विद्यार्थ्यांची हिम्मतच होत नव्हती वावगं वागायची.फक्त प्रेमाने त्यांनी मुलांची मनं जिंकली होती. कधी चुकून कठोर शब्द वापरले तर नंतर त्याचे त्यांना खूप वाईट वाटायचं. मग त्याला कधीतरी बोलावून घेत .त्याची चौकशी करीत आणि नकळत त्यानं केलेली चूक पुन्हा करू नकोस अशी सूचनाही देत. "संस्कृत "भाषेवर त्यांचे विशेष प्रेम होते.ते अतिशय सुंदर शिकवित असत.त्यातलं व्याकरण तर ते फारच छान शिकवत.संस्कृत उतार्याचे मराठीत भाषांतर कसे करावे ते त्यांनी इतक्या सुंदर रितीने शिकवले की आजही कधी कधी संस्कृतचा संबंध आला की त्यांची आठवण येते. संस्कृत सुभाषिते, त्यांचा अर्थ,त्या अनुषंगाने आलेल्या कथा,ते इतके रंगून सांगायचे की स्वतःला विसरून जायचे.याच सुमारास म्हणजे,1960/61च्या काळात संकेश्वरला श्री शंकराचार्य मठात जगद्गुरु म्हणून "कल्याणसेवक स्वामी महाराज "आले.ते अनेक भाषांचे तज्ज्ञ होते.त्यांनी मठातर्फे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सुरू केले होते. त्यापैकी एक म्हणजे " गीताजयंती".यानिमित्ताने "गीतेतील"अध्याय पाठांतरावर स्पर्धा ,संपूर्ण "गीता"पाठांतर स्पर्धा, आयोजित केल्या जात असत.त्यात आम्ही भाग घेत असू.मला दोन-तीन वेळा पाठांतराचे बक्षीस ही मिळाले होते. घरी माझी आत्या आणि शाळेत कुलकर्णी सर मार्गदर्शन करीत. कुलकर्णी सरांना अशुद्ध उच्चार आवडत नसत .त्याबाबत ते अत्यंत जागरूक होते. प्रसंगी कठोर शिक्षा ही मिळायची. प्रत्येक शिक्षकाला आपला विद्यार्थी गुणवंत व्हावा,आपण शिकवलेले त्यांने मनापासून आत्मसात करावे. त्यात कोणतीही कसर ठेवू नये ,त्याने आपले नाव काढावे आणि त्याचे यश पाहून आपल्याला धन्यता वाटावी असेच वाटत असते.त्यासाठी ते जीव ओतून,आपले सारे कौशल्य पणाला लावून शिकवत असतात. आदरणीय कुलकर्णी सर असेच मनस्वी शिक्षक होते.त्यांचे सर्व मुलांवर सारखेच प्रेम होते.आपला विद्यार्थी कोठे कमी पडला तर त्यांना खूप दुखःद व्हायचे.असे निराश झालेले मी पाहिलेले आहे. 1960 चा तो काळ.या काळात शाळांमधून दरवर्षी "शाळा तपासणी "व्हायची .ही तपासणी 3/4 दिवस चालायची प्रत्येक वर्गाची व प्रत्येक विषयाची सखोल तपासणी व्हायची. ही शिक्षक, विद्यार्थी आणि शाळा यांचीच खरी परीक्षा असायची. या "शाळा तपासणी चा"खूप दबदबा असायचा.खात्याकडून तारीख आली की सगळ्यांचीच धावपळ उडायची. अगदी युध्दपातळीवर काम सुरू व्हायचे. या तपासणीमुळेच मला आयुष्यातील एक फार मोठा धडा शिकायला मिळाला. त्याचे झाले असे, तपासणीची तारीख लागली .गृहपाठाच्या वह्या तपासल्या गेल्या, इंग्रजी, गणिताची उजळणी झाली,इतिहासाच्या सनावळ्या पाठ होऊ लागल्या.संस्कृतचे व्याकरण घटवून घेतले जाऊ लागले, मैदानावरील सराव व सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी सुरू झाली. आणि तो दिवस उजाडला. बरोबर 10वाजता मान.शिक्षणाधिकारी आणि त्यांचे पाचसहा सहकारी यांना घेऊन गाडी शाळेच्या आवारात आली .आमचे मुख्याध्यापक व ज्येष्ठ शिक्षक त्यांच्या स्वागतासाठी पुढे सरसावले. मुख्याध्यापकांच्या दालनात त्यांची व्यवस्था केली होती. चहापाणी झाले आणि प्रार्थनेसाठी आम्ही रांगेने उभे होतो तेथे सर्व अधिकारी आले. प्रार्थना अतिशय सुंदर झाली. साहेबांनी सर्वांचे कौतुक केले. नंतर सुरू झाले सर्व वर्गातील विविध विषयांच्या पाठांचे निरीक्षण. आमच्या इयत्ता आठवीच्या वर्गावर "संस्कृत चा" तास होता.गुरूवर्य कुलकर्णी सर समरसून शिकवत होते.आम्ही मुलंही तल्लीन होऊन गेलो होतो. इतक्यात एक उप शिक्षणाधिकारी साहेब वर्गात आले. आम्ही उभे राहून त्यांचे स्वागत केले. साहेबांनी कुलकर्णी सरांना तास पुढे सुरू करण्यास सांगितले. सर शिकवू लागले .शिकवता शिकवता व्याकरणाचा भाग आला.आणि सरांनी सगळ्या वर्गाला " देव "हा शब्द चालवून दाखवण्याचे आवाहन केले. कांही मुलांनी हात वर केले. त्यात मीही होतो.सरांना खूप आनंद झाला.त्यांनी मोठ्या विश्वासाने मला उभे करून " देव" शब्द चालवायला सांगितला.मी प्रत्येक विभक्तीत "देव " शब्दाचे रूप सांगू लागलो. आणि सप्तमी विभक्तीला आलो. मी गोंधळून गेलो.दडपणाखाली मला कांही सुचेना. मी खाली मान घालून उभा.साहेब मला म्हणाले", सांग बाळ,घाबरू नकोस ,आठवून सांग " पण मला कांही सांगता आले नाही.मी भितीने मान खाली घालून उभा राहिलो.नंतर दुसर्या मुलाने ते पूर्ण केले.मला कुलकर्णी सरांकडे पाहण्याचे धाडस झाले नाही. पाठ संपला.दोन दिवसांनी तपासणी संपली. पुढे दोन दिवसांनी कुलकर्णी सर वर्गात आले. मला उभे केले. खूप बोलले. अगदी ह्रदय पिळवटून बोलत होते. म्हणाले,"किती तळमळीने, जीव ओतून शिकवले मी.तू साधी चूक केलीस पण माझ्या अंतःकरणाला खूप वेदना झाल्या .तुला किती विश्वासाने मी उभे केले .तू हुशार मुलगा आहेस ,चुकणार नाहीस याची खात्री होती मला.पण चुकलास हे शल्य मला फार लागले आणि पुढे म्हणाले," वर्गातला प्रश्न असो अगर पुढे आयुष्यातला प्रश्न असो. तुम्हा सर्वांना कळेल की, आपण जीव तोडून काम केले पण आपल्या मुलांनी ते मनापासून केले नाही. तेव्हा माझी आठवण येईल."". मी सरांची क्षमा मागितली. त्यांनीही मला क्षमा केली. योग असा की मी पुढे शिक्षक झालो.सरांनी सांगितलेल्या गोष्टी आठवल्या. त्याची प्रचिती अनेक वेळा आली.माझ्या शिक्षकी जीवनात कसोटीचे प्रसंग आले.खूप तळमळीने शिकवले पण कांही वेळा प्रतिसादही मिळाला नाही. पण मी संयम पाळला. पुन्हापुन्हा समजावून सांगत गेलो. त्यांना शिकण्याची संधी दिली. प्रोत्साहन दिले. त्याचा परिणाम झाला. आता सेवानिवृत्तीनंतरही अनेक विद्यार्थ्यी भेटतात. कृतज्ञता व्यक्त करतात तेव्हा मला गुरूवर्य आर.एस.कुलकर्णी सर आठवतात. ही सगळी त्यांच्या मार्गदर्शनाची पुण्याई आहे.अशा गुरूजनांमुळेच आयुष्याला आकार आला असे वाटते. मी इतकंच म्हणतो, "तस्मै श्री गुरूवे नमः !!!!! 


प्रा. श्रीकांत नाईक 

गडहिग्लज (9405039500)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आठवणीतली माणसं - 17

समाजसेवेचा वसा आणि वारसा जपणारे उमेशराव आपटे !

आठवणीतील माणसं - 5