आठवणीतील माणसं - 10
पुस्तकवाले जोशी - श्री. रवींद्र जोशी! आपल्या आयुष्यात माणसं भेटणं याला काही प्रेरणा असावी लागते असे वाटते. कांही माणसं प्रत्यक्ष भेटल्यावर ती काही ऋणानुबंध घेऊन येतात. या सर्वामागे एक ईश्वरी प्रेरणा असते एवढं मात्र खरं. त्याच झालं असं की,मी ऊत्तूरला तिथल्या माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून नोकरीला लागलो. साधारण पन्नास वर्षे झाली. मी नवखा होतो. एक दिवस सकाळी 11वाजता प्रार्थना झाली आणि मी माझ्या पहिल्या तासाला निघालो होतो. इतक्यात मागून हाक आली, "अहो,नाईक सर ,जरा ऑफिसमध्ये येता का? थोडं बोलायचं आहे. "आमचे बबनराव ठाकूर सर मला म्हणाले. म्हणून मी त्यांच्या मागून गेलो." एक पाच- साडेपाच फूटांची उंची असलेले, गोरेपान ,सरळ नाक ,केस अकाली पांढरे झालेले, पण मागे विंचरलेले, डोळ्यावर काळ्या फ्रेमचा चष्मा, पॅट व पांढरा शुभ्र हाप मॅनिला असे एक गृहस्थ ठाकूर सरांचे समोर खुर्चीवर बसले होते.ठाकूर सरांनी माझा त्यांच्याशी परिचय करून दिला, "हे आमचे नाईक सर, यांना साहित्याची आवड आहे." आणि समोरच्या गृहस्थांकडे वळून ते मला म्हणाले, हे रवींद्र जोशी सर .कोल्हापूरला असतात. मौज प्रकाशन गृह यांच...