समाजसेवेचा वसा आणि वारसा जपणारे उमेशराव आपटे !

समाजसेवेचा वसा आणि वारसा जपणारे उमेशराव आपटे !          



प्रिय श्री. उमेशराव व सौ. वैशाली ताई, सप्रेम नमस्कार. आज प्रथमच तुम्हाला लिहितो आहे. गेल्यावर्षी पासून "कोरोना महामारीच्या संकटाला " सगळे जग सामोरे जात आहे. हे संकट आता उग्र रूप धारण करीत आहे. अशावेळी कुणाचातरी विश्वासाचा आधार माणसाला हवा असतो. तो ज्याच्याकडून मिळतो त्यालाच श्रद्धावान माणूस "देवदूत" म्हणतो. असे देवदूत बनून तुम्ही उभयता मुमेवाडी ता.आजरा येथील "मुकुंदरावदादा आपटे कोविड सेंटर" वर अहोरात्र काम करीत आहात. या आजाराचे नुसते नाव ऐकले तरी काळजाचा ठोका चुकतो. अशा ठिकाणी अत्यंत धाडसाने आपण काम करीत आहात. खरंतर जीव धोक्यात घालणे म्हणजे काय ते आपल्याकडे पाहिल्यावर कळते. रक्ताची माणसे जवळ जायला घाबरतात तिथे तुम्ही धर्माचे "भाऊ बहिण " बनून सेवा करीत आहात. "सेवापरमो धर्मः" असे वचन आहे. या वचनाचा वस्तुपाठ म्हणजेच तुमचे काम. मी समाजसेवा करतो म्हणून समाजसेवा घडत नाही. तो रक्तातच गुण असावा लागतो. त्यासाठी त्यागही करावा लागतो. हे सारे संस्कार कै.मुकुंदरावदादा यांचेकडून आपल्याला मिळाले आहेत. कै. दादा हे या पंचक्रोशीतल्या हजारो लोकांना आधारवड वाटत होते. घरचेच वाटत होते. चोवीस तास लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी त्यांचा दिवस जात असायचा. ते नुसते नेते नव्हते तर लोकनायक होते. तुमचे घर सदैव जनतेसाठी खुले असायचे. दादांचा सहवास लाभला हेच फार मोठे भाग्य मला मिळाले होते. सांगण्याचा हेतु इतकाच तुम्ही त्यांचे कर्ते वारसदार शोभता. अनेकवर्षे तुमचा कामाचा उरकही मी पाहिला आहे. झपाटल्यासारखे काम करीत आहात. सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक आणि राजकीय या सर्वच क्षेत्रात सहज संचार हे तुमचे वैशिष्ट्यपूर्ण लक्षण. एकदा काम करायचे ठरविले की तिथं मागेपुढे न पाहता किंवा पद प्रतिष्ठा न पाहता त्याकामाची पूर्तता होईपर्यंत तुम्ही थांबत नाही. हे मी स्वतः आमच्या त्रिवेणी संस्थेच्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात अनुभवलेले आहे. आता कोविडच्या या लढाईत सेनापती सारखे सर्वांच्यापुढे उभे आहात.जोडीला तरूण कार्यकर्त्यांची फौज तुमचा आदेश यायची वाट पाहतो आहे. तुमचे नेतृत्व कौशल्य अजोड आहे. दादांच्या प्रमाणे प्रचंड लोकसंग्रह थक्क करून सोडणारा आहे. कोणत्याही कामाचा सर्वांगीण अभ्यास करून मगच त्यात हात घालायचा आणि ते काम तडीस न्यावयाचे ही तुमची हातोटी अपूर्व अशी आहे. अशाच पद्धतीने आपल्याहातून लोककल्याणाची कामे व्हावीत अशी सदिच्छा व्यक्त करतो. जाता जाता एक, मला फोटोत कोविड सेंटर वर जे दिसले ते सांगतो. इथे मात्र आपण उभयता "पीपीई कीट" घालूनच काम करा. ऊतूरकरांचेसाठी तुम्ही आम्हाला हवे आहात. दुर्लक्ष करू नकाच. तुम्ही मनस्वी आहात. कशाची पर्वा करीत नाही. तुमच्या कार्याबद्दल मला नेहमीच अभिमान वाटतो. तुमच्या कार्याला माझ्या अंतःकरण पूर्वक शुभेच्छा. 


आपला स्नेहांकित, 

-प्रा. श्रीकांत नाईक 

गडहिंग्लज, जि. कोल्हापूर (9405039500)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आठवणीतली माणसं - 17

आठवणीतील माणसं - 5