आठवणीतली माणसं - 17

निःष्काम कर्म हेच जीवन मानून आयुष्य समर्पित करणारे आदरणीय डॉ. सु.ब. देशमाने साहेब!!!





ॠणानुबंधाच्या कुठून पडल्या गाठी | भेटीत तुष्टता मोठी || हे पं.कुमार गंधर्व यांनी गायिलेले गाणे अनेकवेळा ऐकले आहे. आजही ऐकतो. अशी आयुष्यात माणसं भेटतात आणि एकदा भेटली की ती आपलीशी कधी होतात हेही कळत नाही. अशा मोजक्या माणसांपैकी एक म्हणजे आदरणीय डॉ. सु.ब.देशमाने साहेब. ते आमच्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून आम्ही त्यांना साहेब म्हणत होतो.पण आम्ही त्यांच्या परिवारातील सदस्य केव्हा झालो ते कळलेच नाही. तेव्हापासून आम्ही त्यांना "दादा" म्हणून संबोधू लागलो आणि परकेपणा गळूनच पडला. मी त्यांना पहिल्यांदा केव्हा पाहिले त्याचा विचार करू लागलो आणि लहानपणीचा तो प्रसंग आठवला. माझं बालपण आणि प्राथमिक शिक्षण ऊत्तूरलाच झालं. ऊत्तूरला माझ्या आजोबांचे घरासमोर बाजारपेठेत बापूसाहेब धुरे यांचे घर. डॉक्टरांचे जिवलग मित्र म्हणजे बापूसाहेब धुरे. डॉक्टर तेंव्हा शिक्षणासाठी पुण्याला होते.सुट्टीला ऊत्तूरला यायचे.असेच एका सुट्टीला ते ऊत्तूरला आले होते.मी प्राथमिक शाळेत तिसरीला होतो. एके दिवशी सकाळी नऊ वाजता डॉक्टर धुरे यांचे घरी आले होते. दारातूनच त्यांनी हाक मारली, "बापूसाहेब ",!! बापूसाहेब बाहेर येऊन पाहतात तर डॉक्टर ऊभे. "सुरेशबाबू "तुम्ही!! या या असे म्हणून त्यांचे स्वागत केले आणि त्यांना घेऊन घरात गेले.हे त्यांचे पहिले दर्शन मला फारच भावले. देशमाने घराणे हे मोठे तालेवार घराणे म्हणून ओळखले जात होते.पंचक्रोशीतल्या लोकांच्या मनांत त्यांच्याबद्दल अतीव आदर होता आणि आजही आहे. जमीनदार,सावकार म्हणूनही ते प्रसिद्ध होते. बाजारपेठेत त्यांच्या अनेक इमारती आजही आहेत. गोरगरिबांना मदत करणारे,त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी धावून जाणारे घराणे म्हणून त्यांचा लौकिक होता आणि आजही आहे. या पहिल्याच दर्शनाने मी प्रभावित झालो होतो. "साधारण सहा-साडे सहा फूट उंची, भरदार शरीरयष्टी, मजबूत बांधा,निम गोरा असा रंग, गोल चेहरा, नासिका सरळ पण छोटीसी, कुरळे तसेच काळेभोर केस ,पांढरा शर्ट व पांढरी पॅन्ट, चेहर्यावर स्मितहास्य, पाहताच समोरच्या माणसाला मुग्ध करून टाकणारे व्यक्तिमत्व." पुढे वरचेवर ते दिसू लागले.आम्ही लहान शाळकरी मुलं.त्यांच्याशी बोलण्याचा कधी प्रसंग आला नाही. माझ्या आजोबांना "किनरेमामा" असे सगळे गाव म्हणत असे. त्यामुळे कधी कधी ते माझ्या आजोबांशी बोलायचे. त्यांच्या वडीलांशी आजोबांचा स्नेह होता. डॉक्टरांचे मित्र जसे बापूसाहेब धुरे तसेच अनंतराव आजगावकर, विनायकराव व्हनबट्टे , प्रा.पी.जी.कुलकर्णी, सी.ए., के.बी.ढोणुक्षे,हिराचंद हजारे , बी.जी.हळवणकर, दिनेश कदम, असा खूप मोठा मित्र परिवार होता. मला आठवते बाजार पेठेत के.बी.ढोणुक्षे यांचे किराणा दुकान होते. आम्ही मुलं मधल्या सुट्टीत त्यांच्या दुकानातून गोळ्या आणत असू एक पैसा दिला की पसाभर गोळ्या मिळत असत. माझे आजोबा मला सांगायचे की, सुरेशबाबू पुण्याला डॉक्टरकी शिकायला असतात. नंतर मी शिक्षणासाठी संकेश्वरला गेलो. त्यामुळे ऊत्तूरशी संपर्क कमी झाला. साधारण 1952/53 सालच्या सुमारास ऊत्तूरला चावडीच्या प्रांगणावर "माझे वाचनालय " या नावाचे वाचनालय बापूसाहेब धुरे व त्यांच्या मित्रानी सुरू केले.आम्ही गोष्टीची पुस्तकं आणायला जात असू तेंव्हा सुरेशबाबू ही तेथे दिसायचे. 1950 च्या दशकात ऊत्तूरला दळणवळणाची फारशी साधनंही नव्हती. ऊत्तूरच्या पंचक्रोशीतल्या 30/35गावाशी ऊत्तूर जोडले होते.पण सगळा व्यवहार पायी किंवा बैलगाडीने चालायचा.वैद्यकीय सेवा ही नियमित नव्हती. आजर्याहून डॉ. , खटाव , डॉ.पाध्ये, गडहिग्लजहून डॉ. संकपाळ अशी डॉक्टरमंडळी आठवड्यातून ठराविक दिवशी यायची आणि उरलेल्या दिवशी कंपाउंडर पाहत असत.पूर्णवेळ रूग्णसेवा देणारे डॉक्टर नव्हते. ही याभागाची फार मोठी गरज होती. ही सर्व परिस्थिती डॉ. देशमाने साहेबांनी पाहिली. ते खूप अस्वस्थ झाले. शहरातील मोठमोठ्या हाॅस्पिटल मध्ये संधी चालून आली होती. ती लाथाडून आपल्या गावाला आपली खरी गरज आहे म्हणून ऊत्तूर मध्ये राहून रूग्णसेवा करायची हा निश्चय त्यांनी केला. याच्या आधी डॉक्टरांचे स्नेही अनंतराव आजगावकर, वसंतराव पाटील, डी.डी.कांबळे, बाबूराव पाटील आदींनी सहकार आणि शिक्षण क्षेत्रातच काम करायचे असे ठरवूनच चालून आलेल्या नोकर्या सोडल्या. शहराच्या आकर्षणापासून दूर आपल्या खेड्यात काम करायचे असेच ठरविले होते. राष्ट्रसेवादलाच्या संस्कारानी व पू.सानेगुरुजींच्या विचारांनी सारे भारावलेले होते.तसेच डॉक्टरांनी आपले वैद्यकीय क्षेत्र निवडले. ऊत्तूर आणि पंचक्रोशीत माध्यमिक शिक्षणाची सोय नव्हती. ती उणीव भरून काढण्यासाठी "ऊत्तूर विद्यालय ऊत्तूर "या माध्यमिक शाळेची सुरू केली. डॉक्टरांनी या कामासाठी फारमोठे योगदान दिले.ते "आंतर भारती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष "बनले ते अखेरपर्यंत. सहकार क्षेत्रातील विकास अर्बन सोसायटी, जनता कुक्कुट पालन व दुग्ध व्यवसाय संस्था यातही त्यांनी सहकार्य केले. आपल्या वैद्यकीय कामा बरोबरच सहकार्य करीत राहिले. हे एक कुटुंब बनले. याच काळात डॉक्टरासाहेबांची खेडोपड्यातून वैद्यकीय कौशल्याची किर्ती पसरत चालली होती. गर्दी वाढत चालली होती. म्हणून 26 मार्च 1963 रोजी ऊत्तूर मधील बाजार पेठेतील स्वतःच्या जागेत प्रशस्त अशा जागेत 20 बेडचे सर्व सोयीनेयुक्त असे "सुशीला मॅटर्निटी अॅन्ड जनरल हाॅस्पिटल " सुरू केले. डॉक्टरांचे कौशल्य,रूग्णसेवेची तळमळ आणि रूग्णाशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध यामुळे अल्पावधीतच या परिसरातील लोकांची श्रद्धा डॉक्टरांवर बसली.सर्वसामान्यांना परवडेल अशा अल्प खर्चात औषधोपचार मिळू लागल्यामुळे खेडोपड्यातील गोरगरिबांना ते देवदूतच वाटू लागले. आपल्याकडे आलेल्या पेशंटला बाहेर जावे लागू नये म्हणून. अवघड शस्रक्रियाही बाहेरून तज्ज्ञ डॉक्टरांना बोलावून इथेच करीत असत.30/40 खेडोपड्यातील घराघरात डॉक्टरांचे नाव पोचले.गरीबांचे डॉक्टर म्हणूनच लोक त्यांना ओळखू लागले. 1972 साली "विजय मेडिकल अॅन्ड जनरल स्टोअर्स "हे औषध दुकान सुरू केले.त्याची फार गरज होती. एका बाजूला वैद्यकीय क्षेत्रात नावलौकिक वाढत असतानाच त्यांनी शिक्षणक्षेत्रातही आजगावकर सरांचे बरोबर लक्ष घातलेले होते."आंतर भारती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष म्हणून "जबाबदारी स्वीकारली. पण त्यात त्यांनी कधीही हस्तक्षेप केला नाही. पण मनापासून मदत केली. मग चिमणे,पिंपळगाव, बारवे आणि कोल्हापूर येथे माध्यमिक शाळा सुरू केल्या. ऊत्तूरला प्राथमिक शाळा, ज्युनियर काॅलेज आणि डॉ. जे.पी.नाईक महाविद्यालयात सुरू केले. या सर्वांसाठी डॉक्टरांनी सहकार्य केले पण कधी अधिकार गाजवले नाहीत. हे सर्व निर्णय आजगावकर सरच घ्यावयाचे. आजगावकर सर, वसंतराव पाटील, बी.एम.पाटील, यांनी आपल्या शिक्षकांकडून शाळांच्या प्रगती साठी काम करून घेऊन शाळांचा नाव लौकिक वाढवला. महाराष्ट्र भर किर्ती पसरली.याचा देशमाने साहेबांना खूप अभिमान वाटायचा. चांगले निकाल लागले की स्वतः शाळेत येऊन कौतुक करीत. या त्यांच्या शिक्षणप्रेमामुळे पुढे ऊत्तूर विद्यालय ऊत्तूर या शाळेला स्वतःची इमारतीची गरज भासू लागली. तेव्हा सर्वांच्यापुढे सहकार्याचा हात घेऊन डॉक्टरसाहेब होते. संकल्प सोडला आणि बांधकाम सुरू झाले. तीन वर्षे शाळेचे बांधकाम चालले होते. 22 खोल्यांची, भव्य इमारत, एक मुक्तांगण हाॅलची इमारत ऊभी राहिली. डॉक्टरसाहेब, वसंतराव पाटील डोळ्यात तेल घालून पाहणी करीत होते.डॉक्टरांना मुळातच भव्यतेचे वेड. कोणतीही गोष्ट भव्य दिव्यचं करायची असा त्यांचा ध्यासच होता.सर्वस्व पणाला लावून ते काम करीत असत.या काळातला एक प्रसंग आहे,"एकदा सकाळी बांधकामासाठी मागवलेला सिमेंटचा ट्रक आला होता. कामगार अजून यायचे होते. पण डॉक्टरसाहेब त्यासाठी अडून बसले नाहीत, चटकन अंगातला शर्ट काढला आणि स्वतः पाठीवर सिमेंटचे पोते घेऊन जागेवर आणून ठेवू लागले. तेथे बबनराव ठाकूर व वसंतराव पाटील सर होते.त्यांनी साहेबांना थांबण्याची विनंती केली पण त्यांनी काम सुरूच ठेवले.त्यावेळी ते म्हणाले, "या ज्ञान मंदीराची मला थोडी सेवा करू द्या."आम्ही सर्व आश्चर्यचकित झालो. आमचीच आम्हाला लाज वाटली. एका संस्थेचा अध्यक्ष इमारत बांधत असताना स्वतःच्या पाठीवरून सिमेंटची पोती वाहून नेतो ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट होती. मनोमन मी नतमस्तक झालो.इतकं त्यांच शाळेवर प्रेम होतं. डॉक्टरसाहेबांचे आणखी एक श्रद्धेचे ठिकाण म्हणजे आपली शेती.काळी आई.तिचीही मनोभावे त्यांनी सेवा केली. शेतीत त्यांनी अनेक प्रयोग केले. मोठमोठ्या विहिरी खोदल्या. यासाठी त्यांना गुरू लाभले ते म्हणजे शिरोळच्या दत्त साखर कारखान्याचे शिल्पकार व शेतीतज्ज्ञ सा.रे.पाटील साहेब.त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीत सुधारणा केली. त्यात त्यांना बंधु ,देशभूषण, शिरीष कुमार यांनी अहोरात्र मेहनत घेतली. ते म्हणत असत, "शाळा, माझा दवाखाना आणि माझी शेती ही माझी दैवतंआहेत. यांची सेवा हेच माझ्या जीवनाचे एकमेव कार्य आहे.ते शेवटपर्यंत मी करीत राहणार. विविध क्षेत्रातील नामवंत मंडळींना ऊत्तूरला आणून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ परिसरातील शेतकरी,शिक्षक यांना व्हावा असा त्यांचा सतत प्रयत्न असायचा. साहित्य, संगीत आणि कला यांची अभिजात आवड त्यांच्या ठिकाणी होती.मराठी,इंग्रजी आणि संस्कृत साहित्याचा त्यांचा व्यासंगही होता.निपाणीचे प्रा.गुमास्ते पती-पत्नी, वेंगुर्ल्याचे प्रा.शिरगुप्पे, कवी प्रा.वसंत बापट, थोर विचारवंत नानासाहेब गोरे, एस.एम.जोशी, शाम पटवर्धन,यदुनाथजी थत्ते, शाहिर लीलाधर हेगडे, प्रा.वसंत सावंत.अशी अनेक नामवंत मंडळींशी त्यांचा स्नेह होता .मळ्यातील पर्णकुटीत आजगावकर सर, पाटील सर ,केव्हा केव्हा सा.रे. पाटील साहेब अशी मैफल रंगायची. आम्हा शिक्षक वर्गालाही त्यांचे विचार ऐकायला मिळाले हे आमचे भाग्यच होय. एकदा 1974 साली "इचलकरंजी "येथे पन्नासावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरणार हे नक्की झाले. ते वाचल्यावर डॉक्टरांना खूप आनंद झाला. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध लेखक आणि विचारवंत श्री. पु.ल.देशपांडे यांची निवड झाली होती. साहेबांचेबरोबर मी आणि पाटील सर असे मिळून तिघेजण त्यांच्या प्रिमीयर पद्मिनी गाडीतून इचलकरंजीला गेलो.तीन दिवस साहित्यिक उपक्रमांना हजर राहून आनंद लुटला.या मधुर आठवणी आजही ताज्या आहेत. साहेबांचे शिक्षकांवर अतिशय प्रेम.पण ते अध्यक्ष म्हणून नव्हे तर स्नेही म्हणून. शाळेचा निकाल लागला की पहिले अभिनंदन साहेबांचे हे ठरलेले असायचे. शिक्षक व त्यांचे कुटुंबीय आणि विद्यार्थी यांना औषधोपचार मोफत असे.त्यांचे एक स्वप्नं होतं की शाळेच्या आवारातच शिक्षकांची निवासस्थाने असावित. आणि हे एक मोठे कुटुंबच बनेल.पण काळाच्या ओघात ते त्यांचे स्वप्नंच राहिले....साहेबांनी आयुष्यभर जे केले ते सर्व अत्यंत निःस्वार्थीपणे केले.निरपेक्ष सेवावृत्तीने केले.स्वार्थाचा कधी लवलेशही शिवला नाही त्यांना. आज 5 माध्यमिक शाळा, एक प्राथमिक शाळा, एक ज्युनियर काॅलेज आणि एक डॉ. जे.पी.नाईक महाविद्यालय. आजगावकर सर व पाटील सर यांची साथ त्यांना मिळाली. साहेब कृतार्थ झाले. साहेबांनी आम्हाला भव्य स्वप्नं पाहायला व ती खरी करण्यासाठी अपार मेहनत घ्यायला शिकवले.असा दृष्टा माणूस आमच्या मागे उभा होता याचा आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो. साहेब अत्यंत श्रद्धाळु होते.त्यांचा परमेश्वरावर दृढ विश्वास होता .तरी त्यांनी कधी कर्मकांडात वेळ घालवला नाही.पण सढळ हाताने धार्मिक उपक्रमांना उदंड मदत केली.ऊत्तूर मध्ये पार्श्वनाथाचे सुंदर मंदिर त्यांनी उभे केले. आपल्या आयुष्यात जी जी गोष्ट त्यांनी केली ती अगदी मनस्वीपणे केली.शाळेची इमारत पूर्ण होईपर्यंत आपल्या शेतातील विहीरीचे पाणी चार वर्षे अखंडपणे इमारतीसाठी दिले.त्यासाठी आपला ऊस वाळला तरी त्यानी फिकीर केली नाही.आजही शाळेतील हजारो विद्यार्थ्यांची तहान भागवण्यासाठी याच विहीरीचे पाणी लागते. एकदा स्नेह जुळला की तो आयुष्यभर तो निभवायचा. त्यात अंतर येऊ द्यावयाचे नाही हे व्रत त्यांनी शेवटपर्यंत निभावले. त्यांच्या मित्र परिवारात आदरणीय बंडामामा, वसंतराव पाटील, आजगावकर सर, हिराचंद हजारे, बी.जी.हळवणकर, के.बी.ढोणुक्षे, बापूसो धुरे, सांगलीचे टी.के.पाटील, बी.एम.पाटील सर, सा.रे.पाटीलसाहेब, गणपतराव पाटील, विनायकराव व्हनबट्टे, अशी अनेक मित्र मंडळी त्यांना लाभली. अतुट मैत्रीचे एक उदाहरण मला आठवले ते असे, 1967 साली कोल्हापूर जि.प.निवडणुकीसाठी आजगावकर सर उभे राहिले. त्यांच्यासमोर जी.के.इंगळे यांच्यासारखा एक तडफदार उमेदवार उभे राहिले होते. निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. शेवटच्या प्रचार सभेत प्रचंड गर्दी समोर देशमाने साहेब बोलत होते.भावनाविवश झाले होते. आणि कुणाला कळायच्या आतच त्यांनी आपल्याहाताचे बोट कापून घेतले व रक्ताचा टिळा आजगावकर सरांचे कपाळी लावला. या प्रसंगानंतर सारे वातावरण बदलले. आजगावकर सर विजयी झाले. साहेबांचे हे उत्कट मित्रप्रेम,बंधुप्रेम उदात्त व निरपेक्षही होते. साहेबांनी आपल्या शेवटच्या काळात असेच एक भव्य स्वप्न पाहिले होते. सावंतवाडीपासून ते कोल्हापूर पर्यंतच्या प्रदेशात मध्यवर्ती अशा ऊत्तूरला एक भव्य असे 100 बेडचे "मल्टीस्पेशालिटी "हाॅस्पिटल उभे करून खेडोपड्यातील रूग्णांना माफक दरात उपचाराची सोय करून द्यायची. आज कोल्हापूर येथे अॅस्टर आधार हाॅस्पिटल कोल्हापूर जसे आहे तसे हे व्हावे अशी साहेबांची 35/40वर्षांपूर्वी डोळ्यांसमोर कल्पना होती.याच बरोबर वैद्यकीय क्षेत्रात संशोधनही इथे चालावे यासाठीही सोय करण्याचे त्यांनी ठरविले होते. एस.टी.स्टॅन्ड जवळील आपल्या जागेत त्याची उभारणी करावयाची ठरवून त्याची सुरूवातही केली होती. बरेचसे बांधकाम ही झालेले आहे. पण त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते काम काही काळाकरिता थांबले ते पुन्हा उभे राहिले नाही.पण त्यांनी भविष्यकाळातील आरोग्य सेवेचे एक अतिभव्य स्वप्नं पाहिले होते. त्याच्या खुणा पाहिल्या की अंतःकरण गदगदून जाते. त्यांची भव्य दृष्टी, दृष्टेपणा आणि दूरदृष्टी पाहून थक्क व्हायला होतं. हे स्वनं पूर्ण व्हायला हवे असे राहून राहून वाटते. आज साहेबांचे चिरंजीव डॉ. ब्रह्मनाथ देशमाने हे स्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम करीत आहेत.या क्षेत्रात त्यांनी आपला असा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. भविष्यात ते आपल्या वडीलांचे स्वप्न पूर्ण करतील याची खात्री वाटते. साहेबांनी आपले सारे जीवन निःष्काम समाजसेवा या भूमिकेतून अर्पण केले. त्यांनी आपल्या जीवनाचे तत्वज्ञान एका श्लोकाचा आधार घेऊन सांगून ठेवले आहे. "नत्वहं कामये राज्यं न स्वर्गं ना पुनर्भवम् / कामये दुखः तप्तानां ,प्राणिनामार्तिनाशनम्// याचा अर्थ असा की, ---"हे प्रभु! मुझे राज्यकी कामना नही, स्वर्ग सुखकी चाहना नही/ तथा मुक्ती की भी इच्छा नही /एक मात्र इच्छा यही है की,दुखःसे संतप्त प्राणियोंका कष्ट समाप्त हो जाये // अशा या थोर विभूतीचा सहवास अनेकवर्षे लाभला हेच समाधान मानायचे. त्यांच्या स्मृतीला माझे विनम्र अभिवादन! 


-प्रा.श्रीकांत नाईक, 

गडहिग्लज. जि. कोल्हापूर (9405039500)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समाजसेवेचा वसा आणि वारसा जपणारे उमेशराव आपटे !

आठवणीतील माणसं - 5