आठवणीतली माणसं ‐ 11
थोर समाजशिक्षक व माझे सदगुरू - श्री. श्रीपाद नागेश जोशी ऊर्फ बंडामामा !
एकोणीसशे पन्नासचे दशक. मी ऊत्तूरला आजोळी राहत होतो. माझे वय पाचसहा असावे .त्यावेळची गोष्ट. दसरा झाल्यावर कोजागिरी पौर्णिमा झाली की वेध लागायचे ते दिवाळीचे.तसेच आणखी एका गोष्टीची ओढ असायची ती म्हणजे "विठ्ठल मंदिरातील काकडआरतीची. अजूनही मला ती ऊत्तूरातील विठ्ठल मंदिरातील काकड आरती अगदी स्पष्ट ऐकू येते.काकड आरतीचा संस्कार इतका खोलवर रूजला आहे की ,आपोआपच मन भूतकाळात जाते.ऊत्तूरला त्या काळात अद्यापही वीज आली नव्हती. संध्याकाळी अंधार पडू लागला की ग्रामपंचायतीचा शिपाई प्रत्येक गल्लीच्या कोपर्याला एक खांब असायचा त्या खांबावर एक कंदील असायचा तो लावण्याचे काम हा शिपाई करीत असे. एवढा उजेड सोडला तर सारे गांव मिट्ट काळोखात गुडुप्प होऊन गेलेले असायचे. पहाटे चारच्या सुमारास कोंबडा आरवला की गांव जागं व्हायचं. पण कोजागिरी पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा हा महिना भर मात्र "काकड आरतीनं" जाग यायची.पहाटे चारच्या सुमारास माझी "आजी" जागी होऊन मला ऊठवायची आणि आंघोळ करून आम्ही दोघे त्या अंधारात कंदील घेऊन विठ्ठल मंदिरात जात असू.विठ्ठल मंदिराच्या आवारात सडा घालून छान रांगोळ्या घातलेल्या असायच्या, मंदिरात आणि बाहेर मंदिराभोवती पणत्या आणि मेणबत्त्यानी मंदिर आवार उजळून जायचे. ते नेत्रदीपक दृश्य पाहण्या सारखे असायचे. अशा मंगलमय वातावरणात काकड आरतीला सुरूवात व्हायची.आपल्या संतांनी काकड आरतीचे अभंग रचलेले आहेत .संतांनी कल्पना अशी केली आहे की, आपल्या घरी नातंवंडाना आपण आंजारून गोंजारून उठवतो. त्याच्या गुणांचे कौतुक करतो.त्याचप्रमाणे विठ्ठलालाही आपण उठवूया. संतांचा तो अधिकारच होता.म्हणूनच सकाळी विठ्ठलाला उठवण्यापासून ते पोषाख घालून तयार होईपर्यंतच्या सर्व क्रिया अभंगातून वर्णन केल्या आहेत. त्याचप्रमाणे वारकरी भजन सुरू करतात आणि गाभार्यात आमचे बंडामामा त्यानुसार विठ्ठलाची पूजा करतात. खणखणीत व स्पष्ट उच्चार, संस्कृत मंत्रोच्चार ,शोडषोपचारी पूजा पाहतच रहावी. कधी कधी भाविक श्रीखंड आणून देत असत .त्यारूपात विठ्ठलाला पाहणे म्हणजे डोळ्यांचे पारणे फिटल्याचा साक्षात्कारच वाटायचा इतके सुंदर दृश्य असायचे. सभामंडपात भजन रंगात आलेले असते .यावेळी सादर केलेले अभंग उदाहरण म्हणून देत आहे. ते असे --
1) रूप पाहता लोचनी | सुख झाले वो साजनी ||
तो हा विठ्ठल बरवा | तो हा माधव बरवा ||
बहुता सुकृताची जोडी | म्हणोनी विठ्ठली आवडी ||
सर्व सुखाचे आगर | बापरखुमादेवीवर ||
2) सुंदर ते ध्यान उभे विटेवरी | कर कटावरी ठेवूनिया ||
तुळसीहार गळा कासे पितांबर | आवडे निरंतर हेच ध्यान ||
मकरकुंडले तळपती श्रवणी | कंठीकौस्तुभ मणि विराजित||
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख | पाहीन श्रीमुख आवडीने ||
3) ये ग ये ग विठाबाई | माझे पंढरीचे आई ||
4) उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा | झाला अरूणोदय सरली निद्रेची वेळा ||
संत साधु मुनि अवघे झालेती गोळा | सोडा शेजे सुख आता पाहु द्या मुखकमळा ||
रंगमंडपी महाद्वारी झालीसे दाटी | मन उतावेळ रूप पहावया दृष्टी ||
झाले मुक्तद्वार लाभ झाला रोकडा | विष्णुदास नामा उभा घेऊनी काकडा ||
ओवाळी आरती माझ्या पंढरी नाथा | दोन्ही कर जोडूनी चरणी ठेविला माथा ||
झाले समाधान तुमचे देखिले चरण | आता उठावेसे मनां येत नाही नारायणा ||
भजन चालू असतांना अभंगातील वर्णनानुसार बंडामामा विठ्ठल रखुमाईची पूजा करीत असत .असा तो जवळ जवळ दोन तासांचा नेत्रदीपक सोहळा भाविक आपल्या अंतःकरणात साठवून ठेवण्यासाठी धडपडत असत.मंदिर खचाखच भरलेले असायचे. शेवटी सालंकृत पोषाखात विठ्ठलाचे दर्शन घेऊन भाविक घरी जात असत.दर वर्षी मला ही पर्वणी साधायला मिळायची.ऊत्तूरला त्याकाळात पौरोहित्य करणारे दोन पुरोहित होते एक केशवमामा जोशी व दुसरे नागेशमामा जोशी . हे दोघेही माझ्या आजोबांचे स्नेही. त्यापैकी केशव मामाना एक मुलगा तेच आज गडहिग्लजला डाॅ. डी.के.जोशी प्रसिद्ध डाॅक्टर आहेत.ते माझे बालमित्र. नागेश मामाना तीन मुलगे 1)श्रीपाद ऊर्फ बंडामामा 2)गोपाळराव 3) प्रभाकर. यातला प्रभाकर हा माझा बालमित्र. कधी केशवमामा तर कधी नागेशमामा शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात आमच्या घरी "तिथी" सांगायला येत असत .त्या पंधरा दिवसातील विशेष मुहूर्त, सण, संकष्टी,एकादशी,केव्हा आहेत ते सांगत असत. त्यांना माझी आजी दक्षिणा,शिधा देत असे. प्रभाकर माझा बालमित्र त्यामुळे त्यांचे घरी खेळायला जात असे तर कधी तो आमच्याकडे येत असे मामांच्या परसात राय आवळ्याचे झाड होतं. त्याला भरपूर आवळे लागायचे. त्याचे आम्हाला खूप आकर्षण वाटायचं. त्याचप्रमाणे आमच्या घरी ही बंपराचे मोठे झाड होते .त्याला भोपळ्याच्या आकाराचे बंपर लागत असत.आंबट गोड असे ते फळ असे त्यात साखर घालून खाण्यात खूप मजा यायची. माझी आजी अधून मधून मला घेऊन विठोबाला जायची. तेव्हा बंडामामा दिसायचे. प्रभाकर त्याना "अण्णा "म्हणायचा.मीही त्याना अण्णा म्हणत होतो. नागेश मामांच्या नंतर पौरोहित्याची जबाबदारी बंडामांचेवर आली.गणेश चतुर्थी, अनंत चतुर्दशी, यानिमित्ताने त्यांचे आमच्या घरी येणे जाणे व्हायचे.ऊत्तूरच्या बाजारपेठेत बंडामामांचे "बालविकास स्टोअर्स " हे स्टेशनरी व शालेय साहित्याचे दुकान होते.तेथून आम्ही मुलं वह्या,पेन,टाक शाईची दौत, परीक्षा पेपर्स, कंपास पेटी,अशा वस्तु खरेदी करीत असू. पेन वापरायला बंदी होती.टाकाने लिहिले पाहिजे असा दंडक होता. त्या दुकानात गोळ्याही मिळत. पेपर वर,वह्यावर सुरेश छाप वह्यांचे कागद कधीच फुटत नाहीत. असे छापलेले असायचे. मला मोठी गंमत वाटायची. शाळेत गुरूजी सुरेश छाप वह्या आणि परीक्षा पेपर्स आणायला सांगत.कसे होते त्यांचे व्यक्तिमत्व? साधारण साडेपाच/सहा फूटाची उंची, गोरेपान , व्यायामाने बनलेली दणकट शरीरयष्टी, नाक सरळ पण शेंड्याकडे थोडे फुगीर, डोळे अत्यंत बोलके, केस काळेभोर मागे विंचरलेले, काळ्या फ्रेमचा चष्मा, पांढरा नेहरू शर्ट, पांढरे शुभ्र धोतर, डोक्यावर काळी टोपी, संघाच्या शाखेवर व्यायामाने बनलेले शरीर, घरची शेती करावी ,पौरोहित्य करावे असे साधे जीवन .मिस्किल बोलणे.शास्राची परिपूर्ण माहिती वडीलांच्या कडून मिळाली.त्याच्या जोडीलाज्योतिषाचा गाढा व्यासंग, हस्तसामुद्रिक शास्र ,कुंडलीशास्र ,रत्नशास्र ,आणि फेस रिडींग यांचाही त्यांचा अभ्यास फार मोठा होता. ते दत्तोपासक म्हणून ओळखले जात असत.या सर्वामुळे लोकांना ते मार्गदर्शन करीत असत. त्याकाळात घरोघरी पंचांग नव्हते. गावात फक्त भटजी कडे पंचांग असायचे. ग्रामीण भागात अडीअडचणी, शंका,कुलाचार, मुहूर्त, शुभ तिथी, कार्यारंभ, इत्यादी अनेक प्रसंगी मार्गदर्शनासाठी भटजी कडे जावे लागत असे.बंडामामांकडे माणसांची रिघ लागलेली असायची. मामा त्या सगळ्यांना शंका निरसन करून पाठवत असत.कधीही निराश करायचे नाहीत .त्यांनी अंधश्रद्धेला कधीही थारा दिला नाही तसेच कोणालाही कर्मकांडात अडकवले नाही. आपल्या अवतीभवतीच्या परिस्थितीचे व वातावरणाचे त्यांचे ऊत्तम निरीक्षण होते. ते खरे विज्ञानवादी होते.त्यामुळेच समोरच्या माणसाला पाहिले की त्यांना अनेक गोष्टींचे स्मरण व्हायचे. त्याच्याशी बोलून ,दाखले देवून ते ऊपायही सांगत असत. बंडामामा आमच्याकडे "अनंत"पूजेला यायचे. त्याच्या आधी पुजेला लागणारी पत्री आणून ठेवायला सांगत. त्याचा हेतु निसर्ग परिचय व्हावा. झाडांची माहिती व्हावी. मग मी मित्रांना घेऊन सकाळी सकाळी पत्री गोळा करायला जात असे. अनंत पूजेची पत्री अशी -- 1) पिंपळ 2) जाई 3) अर्जुन 4) रूई 5) मारवा 6) कण्हेर 7) देवदार 8) डोरली 9) डाळिंब 10) आघाडा 11) विष्णुकांता 12) शमी 13) दुर्वा 14) तुळस 15) धोतरा 16) बेलपत्र 17) माका 18) मधुमालती 19) बोराचे पान 20) हादगा (अगस्ती) 21) केवडा. पूजा सुरू झाली की मामा या पत्री बद्दल माहिती सांगत होते. हे एक शिक्षणच होतं. माझं ऊत्तूरचं प्राथमिक शिक्षण संपून मी हायस्कूल शिक्षणा साठी संकेश्वरला आलो. पुढे काॅलेज शिक्षण गडहिग्लजला व कोल्हापूरला जाऊन घेतले .ही आठदहा वर्षे मी ऊत्तूरापासून लांबच होतो. सुट्टीच्या काळात येत असे. संकेश्वरला घरा समोरच विठ्ठल मंदिरात काकड आरतीची संधी मिळायची. त्यामुळेच मामांचा संपर्क थोडा कमी झाला.या मधल्या काळात बंडामामांचे नाव पंच क्रोशित पसरले होते. दररोज शेकडो लोक त्याना भेटायला येऊ लागले होते.मामांना वेळ अपुरा पडू लागला. जेव्हा पहावे तेव्हा मामा माणसांच्या गराड्यात दिसायचे. पण कोणालाही ते निराश करीत नसत.असेच दिवस जात होते. या पंचक्रोशीतल्या धार्मिक कार्यात मामांचा शब्द अखेरचा मानला जाई. पंचांग विचारायला मोकळ्या हाताने जायचे नाही ही श्रद्धा. त्यामुळे लोक पंचांगावर यथाशक्ती पैसे ठेवत.पण मामांनी कधी त्या पैशाला हात लावला नाही. त्यांच्या खोलीत एका खांबाला एक पेटी लावून ठेवली. लोक पुढे त्या पेटीत पैसे टाकू लागले. शेवटी त्या पेटीतील पैसे समोरच्या विठ्ठल मंदिरात खर्च करीत.बंडामामा दत्तभक्त होते.दर पौर्णिमेला ते नरसोबाच्या वाडीला न चुकता जात असत.तेथे त्यांच्या दोन बहिणी होत्या. एकदा असंच काहीतरी कामानिमित्त मी त्यांना भेटायला गेलो होतो. गप्पागोष्टी करत आम्ही परसात आलो. तिथे औंदुंबराचे झाड आहे. ते दाखवून मला म्हणाले, "राजाभाऊ, इथे मी मंदिर बांधून नरसोबावाडीला जशी पूजा अर्चा चालते तशी इथे मी करणार आहे. महाराजांची तशी सूचना आहे. "त्याप्रमाणे मामांनी दत्त मंदिराचे काम झाले. मोठा समारंभ झाला. आणि दत्तपादुकांची स्थापना झाली. हजारो लोक हा देवदुर्लभ सोहळा पाहण्यासाठी जमले होते. विविध प्रकारचे याग झाले.चार दिवस कीर्तन, भजन,प्रवचन झाले. या निमित्ताने दहाबारा हजार भाविकांना महाप्रसाद दिला. इथून पुढे अनेक वर्षे हा वर्धापन दिन मोठ्याप्रमाणात साजरा केला जात होता. हा ऊत्सव हे ऊत्तूर चे वैभव ठरले.बंडामामांचे दोन गुरू होते .एक निपाणीचे शिप्पूरकर मामा आणि दुसरे बहिरेवाडीचे वसंतराव जोशी. मामांना या दोघांकडून खूप शिकायला मिळाले. कधीतरी माझे वडील ऊत्तूरला आले की बंडामामांचेकडे संध्याकाळी ज्योतिषावर चर्चा व्हायची .दोघेही कुंडली शास्रात पारंगत.मी माझे शिक्षण संपवून ऊत्तूरला हायस्कूलला शिक्षक म्हणून नोकरी स्विकारली. ही गोष्ट त्यांना समजली. मी एक दिवस त्यांना भेटायला गेलो होतो. दारात मला पाहिल्याबरोबर त्यांनी हाक मारली, "या नाईक सर". मला संकोच वाटला. मी म्हणालो, मामा,तुम्ही मला सर म्हणू नका. जसा प्रभाकर तसा मी .त्यांनी मला जवळ बसवून घेऊन पाठीवर हात ठेवून अभिनंदन केले.बंडामामानी जो ऊत्सव सुरू केला त्याला लोकोत्सवाचे रूप त्यांनी दिले. गावातील प्रतिष्ठित नागरिकांना बोलावून त्यांच्या ताब्यात हा सर्व भार देवून टाकला.
असेच दिवस जात होते. कांही विचारायचे असले की मी त्यांचेकडे जात असे. मला त्यांचा सहवास आवडायचा. पुढे पुढे मधुमेहाने त्यांना ग्रासले. दृष्टी मंद झाली. लोकांच्या भेटीवर मर्यादा आल्या. अगदीच कोणी भेटीला आले की त्यावेळी जवळच्या माणसाला कुंडलीतील बारा घरात कोणते ग्रह आहेत ते विचारून घेत आणि अचूक निदान करीत. इतकी तळमळ त्यांना होती. शेवट पर्यंत त्यांचे हे समुपदेशन चालू होते.
मामांचे माझ्या आयुष्यातील स्थान हे अनन्यसाधारण आहे. ते माझे सदगुरू च आहेत.मामांची भूमिका ही समाज शिक्षकाची होती. या पंचक्रोशीतल्या माणसाला प्रत्येक क्षणी त्यांची आठवण आल्या शिवाय राहत नाही. ते सन 2003 साली गेले .पण दत्तमंदिराचे रूपाने ते सर्वांना प्रेरणा देत आहेत. त्यांच्या स्मृतीला माझी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो 🙏
-प्रा. श्रीकांत नाईक
गडहिंग्लज (9405039500)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा