आठवणीतली माणसं - 16

सहधर्मचारिणी 



आज मी अगदी वेगळ्या विषयावर लिहिणार आहे. 27 मार्च हा दिवस माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. अनेक अर्थांनी हा दिवस मला सतत आठवण देतो. त्यातला एक म्हणजे आमच्या सहजीवनाला सुरूवात झाली तो दिवस म्हणजे 27 मार्च होय. "27 मार्च 2021" आमच्या सहजीवनाला 45 वर्षे पूर्ण झाली तो दिवस.वार शनिवार. बरोबर 45 वर्षांपूर्वी ही म्हणजे " 27 मार्च 1976" या दिवशीही "शनिवार च" होता. हाही एक योगायोग. ही सहजीवनाची वर्षं आम्ही दोघांनी अत्यंत कष्टपूर्ण काढली. आणि सुफळ संपन्न बनवली.यात अर्थातच सर्वात मोठा वाटा माझ्या पत्नीचाच आहे.ती सतत सावलीसारखी माझ्याबरोबर राहिली म्हणून ते शक्य झाले. "महाभारतात यक्षाने "युधिष्ठीराला " विचारलेल्या प्रश्नामध्ये एक प्रश्न होता ---"देवाने पुरूषासाठी निर्माण केलेला उत्तम मित्र कोण?" त्याचे युधिष्ठीराने उत्तर दिले. "त्याची बायको "(पत्नी). हजारोवर्षापूर्वी घडून गेलेल्या महाभारतातील ही कथा आहे. आणि अगदी खरं आहे. आजही लागू पडते. संसारात पत्नीला अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात .पत्नी,भावजय ,नणंद, आई, बहिण, आत्या,मावशी,सासू,सून.इत्यादी भूमिका ती समर्थपणे निभावते. या सर्वात पतीच्या मित्राची अनोखी भूमिकाही तिला पार पाडावी लागते.मित्र ही माणसाच्या आयुष्यातील अशी एक गोष्ट आहे की तिचे अनन्यसाधारण महत्व आहे. हा मित्र सर्वार्थाने आपले जीवन व्यापून टाकतो.आपल्याला सावरतो, धीर देतो ,खंबीरपणे उभे राहायला मदत करतो.सुखदुःखात वाटेकरी असतो .तो सतत आपल्याजवळ असतो.हीच भूमिका पत्नी आपल्या आयुष्यात निभावत असते. मी 1972 साली ऊत्तूर विद्यालय ऊत्तूर येथे शिक्षकाची नोकरी स्विकारली. आणि तीन-चार वर्षांनी घरी लग्ना संबंधी चर्चा सुरू झाली.मी आजोळी उत्तूरला राहत होतो.तेव्हा घरी आजोबा, त्यांची दत्तक आई गंगाबाई, तिची धाकटी बहिण गोदूमावशी, माझी मावस बहिण रोहिणी इतकीच मंडळी राहत होतो. मला मामा नव्हते, गंगाआजीची माझ्यावर अपरंपार माया होती.या सर्व परिस्थिती मुळे आजोबांनी मला उत्तूरलाच ठेऊन घेतले. गंगाआजीचा व सर्वांचाच मी लाडका झालो होतो.आजीशिवाय मला करमत नसे. तीही मला नजरेआड होऊ.देत नसे .अशीच वर्षे गेली.  माझे प्राथमिक शिक्षण उत्तूरला झाले आणि माध्यमिक शिक्षणासाठी संकेश्वरला आलो. पण ओढ मात्र उत्तूरचीच होती.प्रत्येक सुट्टीत ऊत्तूरला आजोळी येत असे. पुढे काॅलेजचे शिक्षण गडहिग्लज व कोल्हापूरला काॅमर्स काॅलेजमध्ये झाले. अत्यंत योगायोगाने मला ऊत्तूरला मान.आजगावकर सरांनी बोलावून घेतले व ऊत्तूर विद्यालय ऊत्तूर येथे नोकरी दिली.माझ्यावर विश्वास ठेवला .आजी,आजोबांनाही आनंद झाला. पुढे आजीने लग्नाचा विषय काढला. संकेश्वरला वडीलांना सांगितले. वडील व आजोबांनी आजीला सांगून टाकले, "काकी, तुम्हीच आता सून निवडा." माझे शाळेतील सहकारी आणि दोन्ही कुटुंबीयांना ओळखणारे कै.व्ही.के.कुलकर्णी सर यांनी गडहिग्लजचे एक स्थळ आणले.आजोबांना भेटले."मुलगी चांगली आहे, माणसंही चांगली आहेत शिवाय ती शिक्षिका आहे." अशी माहिती सांगितली. योग असा की हे सर्व नाते संबंध जवळचे निघाले. त्यामुळे सर्वांनाच आनंद झाला.माझ्या काकांनी कुंडली पाहिली. उत्तम जुळते म्हणाले. त्याच प्रमाणे काकांचे साडूच्या भावाची मुलगी. अशीही माहिती मिळाली. आता फक्त मुलगी पाहायचा कार्यक्रम तेवढा करायचा बाकी होता. तो जुना काळ होता.माझी अट एकच होती. गंगाआजीने मुलगी पाहावी आंणि तिला आवडली की झालं. एक दिवस उत्तूरलाच मुलगी पाहण्याचा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने झाला.मुलगी शिकलेली व शिक्षिका असूनही आजोबांनी तिच्याकडून वाचून घेतले.तेंव्हा तिने कराडच्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा दुर्गाबाई भागवत यांच्या अध्यक्षीय भाषणातील उतारा वाचून दाखविला. चालायला लावले. नेहमीप्रमाणे प्रश्न विचारले. शेवटी गंगाआजीने तिला जवळ बसवून पाठीवरून हात फिरवला आणि घरची चौकशी प्रेमाने केली. कार्यक्रम संपला .चहापाणी झाले. पुढे तीन चार दिवसांनी निरोप द्यायचा होता.वडील-आजोबांनी मला विचारले. माझे ठरले होते की,गंगाआजीला पसंत असेल तर माझा होकार. जुन्या पद्धतीनुसार आणखी 4/5 मुली पाहाव्यात आणि मग निर्णय घ्यावा. असा घरात सूर निघाला. माझा त्याला नकार होता. शेवटी गंगाआजीने च सर्वांना सांगितले की, मुलगी चांगली आहे. चांगला संसार करेल,हीच ठरवून टाका .तिच्या मताला विरोध करण्याचे धाडस कुणातच नव्हते. माणूस गुणावरून पारखावा ,त्याच्या रंगावरून नाही. असे तिचे ठाम मत होते. शेवटी घराणे चांगले आहे. माणसं माहितीची आहेत.शेवटी हीच मुलगी ठरली.मुला-मुलीने एक मेकाशी बोलून विचार समजावून घ्यावेत असा तो काळ नव्हता. आमच्या पुरोहितांनी सांगितले की,शेवटचा मुहूर्त 27 मार्च रोजी आहे.त्यानंतर मुहूर्त नाहीत. गडहिग्लज, कोल्हापूर, निपाणी इथे कार्यालये मिळेनात. शेवटी निपाणी जवळ तवंदी घाटात शिप्पूर या खेडे गावाला लागून असलेल्या रामलिंग मंदिरात लग्न समारंभ करण्याचे ठरले. मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत शनिवार दिनांक 27 मार्च 1976 रोजी आमचे लग्न झाले..ही आमच्या सहजीवनाची सुरूवात. कुंदा हणमंतराव बेकनाळकर ची सौ.अनुराधा श्रीकांत नाईक बनून ती आमच्या घरी आली.आजीला खूप आनंद झाला. पाच फूटांची उंची, निमगोरा रंग,साधारण उभट चेहरा, सरळ नाक, मध्यम अंगकाठी, साधे व्यक्तिमत्व.,पुढे समजले की, शिवराज काॅलेजला प्री-डिग्री ला आमच्या बरोबर होती. मी काॅमर्स ला असल्यामुळे कधी बोलण्याचा संबंध आला नाही. ती मात्र एका मैत्रिणीला घेऊन सतत असायची. संकेश्वरला आमचे एकत्र कुटुंबातील वातावरण. सात भाऊ,चार आत्या, आजी असे 50माणसांचे कुटुंबीय. आमचे एक औषध दुकान, दळप,कांडप,आणि तेलाचा घाणा अशी एक मोठी गिरणी, आजूबाजूच्या जवळ जवळ 30/35 गावासाठी एक च गिरणी होती.वाड्यासारखे मोठे घर.आमच्या पिढीतील सौ.कुंदा तथा अनुराधा ही पहिली सून. घरात पाच सासवा,एक आजी सासू,आणि सख्याचुलत बहिणी अशा नऊ नणंदा, व दहा भाऊजी हे सगळे एकत्र पाहून ती सुरूवातीला गांगरून गेली. पण नंतर रूळुन गेली.मी तिला जुन्या नावानेच हाक मारीत असे. माझी नोकरी ऊत्तूरला असल्यामुळे तिला ऊत्तूरलाच राहावे लागणार होते आणि तिथून गडहिग्लजला नोकरीला जावे लागणार होते. गडहिग्लज शहरातातील एका प्राथमिक शाळेत ती शिक्षिका म्हणून नोकरी करीत होती. असे असलेतरी सणासुदीला, समारंभाला ,शनिवार/रविवारी संकेश्वरला जात असू. रीतीपरंपरा यांची माहिती तिने करून घेतली होती. संकेश्वरला व ऊत्तूरला दोन्ही ठिकाणी दोन्ही आज्जींना या नव्या सुनेचे कौतुक वाटायचे. सौ.कुंदाचे बालपण, शिक्षण कष्टातच गेले.वडील प्राथमिक शिक्षक जुन्याकाळातले ,चार मुलगे,दोन मुली असा त्यांचा संसार. तसा ओढ गस्तीचा. त्यामुळे आहे त्यात समाधान मानायचे आहे आणि काटकसरीने संसार सुखाचा व्हावा यासाठी धडपडायचे हे लहानपणापासून च तिला शिकायला मिळाले. शिक्षकाला पगारही फारच कमी मिळायचा. नोकरी करीत असली तरी काटकसर करून संसार कसा करावा हे तिनेच मला शिकविले. एखादी गोष्ट पुरवून वापरावी हे बालपणापासून तिने आत्मसात केले होते. दिवस जात होते.माझे बी.एड.अजून व्हायचे होते.दरम्यान गडहिग्लज शहरातील प्राथमिक शाळा नगरपरिषदेकडे वर्ग झाल्यामुळे तिला शहर सोडून आजूबाजूच्या गावात नोकरी स्वीकारावी लागली.त्याकाळात दळणवळणाची.साधने पुरेशी आणि शाळेच्या वेळेत जाणारी साधने नव्हती. प्रसंगी चालत जावे लागणार होते. ऊत्तूरला आजीचे लाड असायचे. गडहिग्लजहून संध्याकाळी केव्हा येते याकडे डोळे लावून बसायची. सांभाळून जा असे ती सांगायची. एकदा आजी म्हणाली, "हे बघ, राजा, तुला पहिली मुलगीच होऊ दे.लक्ष्मी येऊ दे घरी. " आणि झालेही तसेच. 10 मे 1977 रोजी मुलगीच झाली. तिचे नाव "योगिता "ठेवले.आजीला खूप आनंद झाला. ती खूपच थकली होती. तिने मुलगी झाली म्हणून जिलेबी खाण्याची इच्छा व्यक्त केली.ती आणून दिली. मला बी.एड.ला प्रवेश मिळाला त्याचे पत्र आले. पुढे आठ दिवसांनी ती गेली. नोकरी सांभाळून वर्ष भारतातील सर्व सणसमारंभ, गौरीगणपती, दसरा ,दिवाळी, आणि एकूणच सर्व रिती परंपरा मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने सासवांच्या मार्गदर्शनाखाली ती करीत आली. चि.योगिता च्या पाठीवर योगेश आणि वनिता यांचा जन्म झाला. या सर्व मुलांचं करत करत घरचं सर्व करायचं आणि पुन्हा शाळेला जायचं. ही सर्व कसरत खरोखरच अवघड. पण ती लिलया पार पाडीत असायची. आजही ती करीत असते. मुलं लहानाची मोठी झाली. शिक्षणं पूर्ण झाली. आणि सर्वांचे सुंदर संसारही सुरू झाले .पण यासाठी तिने मला दिलेली साथ आणि ढोर मेहनत मला विसरता येत नाही. मोठी मुलगी डाॅक्टर झाली. ती कोल्हापूर येथील एका मोठ्या हाॅस्पिटल मध्ये आहे.मुलगा चि.योगेश हा एका कंपनीत असिस्टंट मॅनेजर असून अमेरिकेत सहा वर्षे राहून पुण्यात आला आहे.धाकटी मुलगी वनिता ही हैद्राबाद येथे रामोजी फिल्मसिटीत तिचा नवरा काम करतो.दोन नातू आणि दोन नाती यांनी घर भरून जाते.गुरूराज आणि इशा व वैभवी आणि आदित्य ही त्यांची नावं. असेच दिवस जात होते. बरीच वर्षे भाड्याच्या घरात राहून कंटाळा आला होता. आपले स्वतःचे हक्काचे घर असावे असे तिला वाटायला लागलं. पण हातात तर पैसे नाहीत. नोकरी ही थोडीशी राहिलेली. बॅंकतही हवी असलेली रक्कम कर्जाऊ मिळेना. याच वेळी माझा एक मित्र भेटायला आला होता.त्याने सल्ला दिला की , आताच धाडस कर ,थोडी ओढाताण होईल पण घर होऊन जाईल.चहा देत असतांना सौ.कुंदाने ते ऐकले.मित्र गेल्यानंतर मला म्हणाली, " हे पहा, मला दागिन्यांची हौस नाही. ते घ्या.आपले घर होईल. तोच मोठा दागिना !!! आम्ही धाडस करून निश्चय केला की,घर बांधायचेच. नगरपरिषदेची परवानगी वगैरे सोपस्कार झाले आणि घराचे बांधकाम सुरू झाले. आणि घरच्या भेद्यांनी कोर्टाची पायरी चढायला भाग पाडले.माझ्या आयुष्यात मला उमेदीच्या काळात जवळ जवळ 27 वर्षे कोर्टकचैर्या कराव्या लागल्या. त्यासाठी पैसा,मान अपमान,मनस्ताप, भोगावा लागला. त्याकाळात खंबीरपणे उभी राहिली ती माझी पत्नी सौ.कुंदा. ही वर्षे सत्वपरीक्षा पाहण्यासाठीच आली असे वाटते. माझे जिवलग स्नेही, धावून आले. माझ्या मुख्याध्यापकांनी मला सांभाळून घेतले. हा काळ अत्यंत कसोटीचा आणि परीक्षा पाहणारा असाच होता.काढलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठीच पगारातील मोठी रक्कम जावू लागली. हातात जे शिल्लक राहत होते त्यात तिने न कुरकुरता संसार केला.मुलांची हौसमौज करता आली नाही पण मुलांनीही समजावून घेतले.म्हणूनच दिवस सुसह्य झाले. घराचा इंजिनिअर हा माझा विद्यार्थीच होता. त्याने असे कामगार दिले की त्यांनी सूट्टी न घेता आठ महिन्यात घर बांधून दिले.आम्हाला सिमेंट, वाळू, खडी , स्टील देणारे आमच्या गल्लीतले व्यापारी यांनी फार मोठे सहकार्य केले. "सरांचे घर आधी झाले पाहिजे. "ही त्यांच्या मनांत फार मोठी भावना होती.हीच आमची पुण्याई. देखणे दुमजली घर पूर्ण झाले.वास्तुशांत समारंभात पहिला मान दिला तो या सर्व राबणार्या हातांना. मग सर्वांना. "शर्वाणी, ", या आमच्या घरात रहायला आलो त्याला आता 24 वर्षे झाली. पुढच्या वर्षी "रौप्यमहोत्सव"साजरा करणार आहोत. या सर्व आनंदाची खरी हक्कदार आहे ती सौ.कुंदा. तिच्या चेहर्यावरचे समाधान ही माझी खरी कमाई आहे. कोर्टकचेर्या अजून संपल्या नव्हत्या.चालूच होत्या.मला खरोखरच आश्चर्य वाटते की माझ्यामागे कांहीही कारण नसतांना या कटकटी का लागाव्यात?पण श्री दत्तप्रभुंचे आशीर्वादाने यातून निभावलो. सगळं जीवन पूर्ववत झाले. मी पहिल्यांदा निवृत्त झालो. हातात प्राॅव्हीडंट फंड ,ग्रॅच्युइटी इत्यादी मार्गाने मोठी रक्कम हातात आली. आमच्या मित्रमंडळींनी सुचविले की आता म्हातारपणाची तरतूद करा.गुंतवणूक करा.निरनिराळ्या योजनाही सुचविल्या. पण त्यांना काय माहीत आमचे दुःख ! आम्ही दोघांनी रात्री विचार केला. काय करूया. मी तिला म्हटलं, "तू दागिने दिलेस म्हणून घर झाले.आता दागिने बनवूया. "त्यावेळी सौ.कुंदाने जे मला सांगितले ते जीवनाचे खरे सार होते."ती म्हणाली,,"हे बघा ,कर्ज शिल्लक ठेवून दागिने केले तर आपल्याला सुखाची झोप लागणार नाही. त्यापेक्षा सर्व कर्ज फेडूया. त्या दिवशी सुखाने झोपता येईल. हाच खरा दागिना. " त्यानुसार दुसर्या दिवशी कोठून कोठून कर्जे घेतली आणि आता शिल्लक किती आहेत त्याचा हिशोब केला .आणि पुढच्याच दिवशी सर्व कर्जांची रक्कम भरून पावत्या घेऊन घरी आलो. सौ.कुंदाला हाक मारली, म्हणालो, या पावत्या बघ,या क्षणाला सर्व कर्ज भरून आलो आहे. आता आपण कर्जमुक्त झालो आहोत."ही सर्व त्या परमेश्वराची कृपा. त्याच्या समोर ठेव त्या पावत्या." देवाला उयतांनी हात जोडले.तुझी कृपा अशीच राहू दे म्हणून दंडवत घातला. त्या रात्री अत्यंत कृतार्थतेने झोपलो. खरचं सांगतो शांत झोप लागली. तेव्हापासून कोणापुढे हात पसरला नाही. यापूर्वीही नाही.घरही अत्यंत समाधानाने भरलेले आहे. हे केवळ आणि केवळ सौ.कुंदा मुळे.कोणत्याही अलंकाराविना सुख ओसंडून वाहतांना मी पाहत होतो तिला.यापेक्षा आणखी सुख ते कोणते? या 45 वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. जुनी-जाणती काळाच्या पडद्याआड गेली.पण त्यांचे संस्कारच आम्हाला आधार देत आहेत.त्यांना आम्ही कधीही विसरू शकत नाही. प्रत्येक पुरूषाच्या मागे एक खंबीर, कणखर स्री असते म्हणतात ,नव्हे असायलाच हवी.माझ्या बाबतीत ही भूमिका सौ.कुंदाने निभावली आहे. तसं पाहिलं तर मी साहित्य, संगीत, कला आणि सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमात रमणारा माणूस.माझे छंद जोपासणे,माझे ग्रंथप्रेम ,माझ्याकडे येणारी माणसे, त्यांना हव नको पाहणारी सौ.कुंदाच. मुलांच्या शिक्षणाकडेही तिचचं लक्ष. असं सगळं जीवन व्यापून टाकणारी माझी सखी, मैत्रीण, पत्नी सर्व कांही तीच.सौ.कुंदा. आज तिचाच सन्मान करायला हवा.तिचं खरी हक्कदार आहे. पण तिच आपलं एकच.माझ आपलं घरचं बरं. खरा सुखाचा शोध घ्यायला कुठे लांब जायला नको.तुमच्या आस पासचं असते.फक्त आपण ते वेचायला विसरता कामा नये. "अवघाचि संसार, सुखाचा करीन /आनंदे भरीन तिन्ही लोक". हीच आमची भावना आहे. यासाठीच परमेश्वराने आम्हाला बळ द्यावे हीच इच्छा!!


-प्रा. श्रीकांत नाईक

गडहिग्लज, जि. कोल्हापूर (9405039500)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आठवणीतली माणसं - 17

समाजसेवेचा वसा आणि वारसा जपणारे उमेशराव आपटे !

आठवणीतील माणसं - 5