आठवणीतील माणसं - 10
पुस्तकवाले जोशी - श्री. रवींद्र जोशी!
आपल्या आयुष्यात माणसं भेटणं याला काही प्रेरणा असावी लागते असे वाटते. कांही माणसं प्रत्यक्ष भेटल्यावर ती काही ऋणानुबंध घेऊन येतात. या सर्वामागे एक ईश्वरी प्रेरणा असते एवढं मात्र खरं. त्याच झालं असं की,मी ऊत्तूरला तिथल्या माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून नोकरीला लागलो. साधारण पन्नास वर्षे झाली. मी नवखा होतो. एक दिवस सकाळी 11वाजता प्रार्थना झाली आणि मी माझ्या पहिल्या तासाला निघालो होतो. इतक्यात मागून हाक आली, "अहो,नाईक सर ,जरा ऑफिसमध्ये येता का? थोडं बोलायचं आहे. "आमचे बबनराव ठाकूर सर मला म्हणाले. म्हणून मी त्यांच्या मागून गेलो." एक पाच- साडेपाच फूटांची उंची असलेले, गोरेपान ,सरळ नाक ,केस अकाली पांढरे झालेले, पण मागे विंचरलेले, डोळ्यावर काळ्या फ्रेमचा चष्मा, पॅट व पांढरा शुभ्र हाप मॅनिला असे एक गृहस्थ ठाकूर सरांचे समोर खुर्चीवर बसले होते.ठाकूर सरांनी माझा त्यांच्याशी परिचय करून दिला, "हे आमचे नाईक सर, यांना साहित्याची आवड आहे." आणि समोरच्या गृहस्थांकडे वळून ते मला म्हणाले, हे रवींद्र जोशी सर .कोल्हापूरला असतात. मौज प्रकाशन गृह यांची पुस्तके घेऊन आले आहेत. नमस्कार वगैरे झाला. ठाकूर सर म्हणाले, नाईक सर तुम्ही पुढच्या ऑफ तासाला पुस्तके पहा तोपर्यंत आम्ही जेवून येतो. मी ठीक आहे म्हणालो .मी पुस्तके घेऊन स्टफरूम मध्ये आलो.दुपारी मी,ठाकूर सर व रवींद्र जोशी एकत्र बसून चर्चा करून पुस्तकांची निवड केली. मीही 2/3पुस्तके घेतली. मग आमच्या अवांतर गप्पागोष्टी झाल्या. तेव्हा, रवींद्र जोशी म्हणाले, आम्ही औदुंबरचे जोशी. कोल्हापूरला आला की या खरी काॅर्नरला अरूण गाडगीळ यांचे गुलमोहर बुक डेपो आहे. त्यांचीही ओळख होईल. पुढे कोल्हापूरला फेरी झाली की आपोआप च पावलं गुलमोहरकडे वळू लागली. रवींद्र जोशींच्या भेटी होऊ लागल्या. आणि कधी ऋणानुबंध जुळले ते कळलेच नाही. त्याला आज पन्नास वर्षे झाली. अरूण गाडगीळांचाही स्नेह मिळाला. औदुंबर चा ऊल्लेख आल्यामुळे एक आठवण सांगाविशी वाटते.मी 5/6वी मध्ये असेन त्यावेळी. 1958/59सालच्या दरम्यान एकदा माझ्या सांगलीच्या आजीने मला सुट्टीला सांगलीला बोलाविले. मे महिन्याचे दिवस. खूप मज्जा करायला मिळणार म्हणून आनंद झालेला. त्या आजीकडे एक एक बॅंडचा ट्रांझीस्टर होता. त्याच्यावर एकच स्टेशन लागायचे. भक्तीगीते ऐकायला मिळायची. आमच्याघरी दत्त ऊपासना असल्यामुळे दत्ताची गाणी आम्हाला पाठच होती.काही गाणी अशी-----"अनसुयेच्या धामी आले /इथेच आणि या बांधावर/गोकुळाला वेड लाविले/जय जय दत्तराज माऊली/दत्त दिगंबर दैवत माझे /दिगंबरा दिगंबरा/देव माझा विठू सावळा /भुकेला भक्तिला भगवान/मनी माझिया नटले गोकुळ/स्मरा स्मरा हो दत्तगुरू// ही अवीट गोडीची गाणी आम्ही ऐकत होतो.सकाळच्यावेळी प्रसन्न वाटायचे. आजी तल्लीन होवून ऐकायची. एक दिवस आजी म्हणाली, ऊद्या आपण औदुंबरला जायचे आहे. दत्तदर्शनाला. आम्हाला खूप आनंद झाला. सकाळच्या लवकरच्या गाडीने आम्ही निघालो. 10 वाजता औदुंबरला पोचलो. कृष्णामाईचे दर्शन घेतले. हातपाय धुऊन दत्तदर्शनाला निघालो.मंदिराच्या सभागृहात आलो.मनापासून दर्शन घेतले. तीर्थप्रसाद घेतला.पायर्या चढून वर आलो. एका भल्यामोठ्या वडाच्या झाडाखाली सावलीत खुर्चीत एक तेजस्वी ज्ञानर्षी बसले होते. गोरेपान ,तेजःपुंज असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. आजी म्हणाली चला आपण त्यांचे दर्शन घेऊ.त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याकडे गेलो. दर्शन घेतले. त्यांनी विचारपूस केली. आम्ही आता परतीसाठी बस स्टॉप कडे निघालो. तिथे आमच्या ओळखीचे कोणीच नव्हतं. गाडीतून परत येतांना आम्ही आजीला विचारलं .आजी ते आजोबा कोण. आजी म्हणाली, अरे,ते सुप्रसिद्ध कवी "सुधांशु".तुम्ही दररोज सकाळी जी गाणी ऐकता ती यांनीच लिहिली आहेत.फार मोठे कवी आहेत ते. रवींद्र जोशी म्हणाले की आम्ही औदुंबरचे याची अशी संगती लागली. मला नवलच वाटले. आता पुन्हा आपण रवींद्र जोशी यांच्याकडे जाऊया. ज्या ज्या वेळी मी कोल्हापूरला जायचो तेव्हा रवींद्र जोशी यांना भेटायचेच हे ठरूनच गेले होते. पुढे कोळेकर तिकटीला त्यांनी "श्रीनाथ बुक डेपो "सुरू केला. हळूहळू त्याचा विस्तार वाढायला लागला. जागा अपुरी पडू लागली. आणि योगायोगाने समोरच त्यांना एक प्रशस्त जागा ऊपलब्ध झाली. तेथे भव्य असे व आगळे वेगळे "अक्षर दालन "हे अभिनव ग्रंथ दालन ऊभे राहिले. कोल्हापूर येथे याची उणीव होती. वाचकानी यावं ,स्वतः पुस्तके चाळावीत, काही वेळा तिथे बसून संदर्भ पहावे. अशी त्याची रचना. या सर्व धडपडीच्या मागे रवींद्र जोशी यांचे अपार कष्ट दिसून येतात. मी केलं हा भाव कधीही नाही. याच्या जोडीला ग्रंथप्रदर्शने ही जोशींनी भरवली. गडहिग्लज, कागल, जयसिंगपूर, येथे दरवर्षी व्याख्यानमालेत अशी प्रदर्शने भरवून वाचन चळवळीला चालना देण्याचे काम त्यांनी केले.रवींद्र जोशी हा सर्व व्याप अत्यंत शांतपणे व कुशलतेने सांभाळतात. त्यांना सौ.जोशी यांची भक्कम साथ आहेच. जोशीबुवांना कधी रागावलेले, चिडलेले आम्ही पाहिलेले नाही. "अजातशत्रू मित्र " हीच त्यांची ओळख. सर्व सहकार्यानां विश्वासात घेऊन काम करून घेतील. रवींद्र जोशी येणार्या ग्रंथ प्रेमींचे स्वागत अत्यंत आत्मीयतेने करतात. त्यात जराही कृत्रिमता नाही. " ऐसी कळवळ्याची जाती/ करी लाभावीण प्रीति/ हाच त्यांचा स्वभाव. " या सर, असे स्वागत करून त्यांना पाणी आणून देतील. त्यांना कोणती पुस्तके घ्यावयाची आहेत, त्यानुसार दालनातील तो विभाग दाखवतील .एवढं करूनही पुस्तक आवडो न आवडो "अनिल चा चहा" मात्र नक्कीच पाजवतील. या "अक्षर दालन चे "भाग्य थोर.जागा घेतली ती सुप्रसिद्ध विचारवंत, लेखक व अमोघ वक्ते प्राचार्य राम शेवाळकर यांचे आशीर्वादाने, आणि दालनाचे उद्घाटन झाले ते सुप्रसिद्ध कवी प्रा.इंद्रजित भालेराव रा. परभणी, सुप्रसिद्ध ललित लेखक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या शुभहस्ते. अशा या शुभंकर हातांनी सुरू केलेल्या दालनात गेली पंधरा वर्षे साहित्य, संगीत व कला यांची चर्चा चालते आणि रसिकांना तृप्त करून टाकते.रविवार सुट्टीच्या दिवशी अक्षर दालन अधिक गजबजलेले असते. बाहेरगावच्या रसिकांना भेटण्याची संधी मिळते. येरवीही दालन सतत वाचकांनी .वाहत असते. इथे किती अवलिये भेटतात. निपाणीचे सुधाकर पोतदार सर आज ऐंशीच्या घरात आहेत. ते येतात पुस्तके घेतात. पुस्तकांना मुलांसारखं सांभाळतात. त्यांना छानसा कव्हर घालतात. कोणी पुस्तक मागायला आला की नकार देतात पण माझ्या घरात बसून वाच. मी बाहेर देणार नाही. कधीतरी इंजिनिअर चौगुले येतात एकदमच पंचवीस/तीस पुस्तके घेऊन जातात. आम्ही एक पुस्तक घेतांना विचार करतो.ग्रंथदालन स्थीर स्थावर झाल्यावर एकदा अशीच सहज चर्चा सुरू होती, मी, रवींद्र जोशी, रामभाऊ देशपांडे, रजनी हिरळीकर , टी. डी.कुलकर्णी बोलता बोलता अशी कल्पना सुचली की महिन्यातल्या एका रविवारी सायंकाळी पाच वाजता एकत्र जमून वाचलेल्या पुस्तकांवर चर्चा करावी, अनुभव सांगावेत. असा एक गप्पागोष्टींचा कार्यक्रम करावा. आज त्याची नितांत गरज आहे. रवींद्र जोशी यांनी ही कल्पना ऊचलून धरली. केवळ साहित्यावरच चर्चा असावी आणि एक तासाची वेळ.पुढे कार्यक्रम निश्चित करतांना झालेल्या बैठकीत प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सायंकाळी बरोबर पाच वाजता ची वेळ नक्की झाली. कार्यक्रम संपल्यावर लोकांना घरी वेळेवर पोचता यावे. आणि सुरू झाल्या "अक्षर गप्पा".. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व परिचय हे काम आमचे तरूण पत्रकार मित्र श्री समीर देशपांडे हे पाहू लागले. आभार रवींद्र जोशी यांनी करावे असे ठरले. वक्त्यास एक ग्रंथभेट द्यावी असे ठरले. हळूहळू गप्पांचे नाव होऊ लागले. रसिक वाट पाहू लागले. कार्यक्रमाचे शेवटी चहापान. रवींद्र जोशी मात्र पडद्यामागे राहून काय हवे नको ते पाहत. रवींद्र जोशी रसिकासाठी कधी मसाला दूध ,तर ऊन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून कोकम सरबत तर कधी पन्हं. असा सगळा थाटमाट करायलाही ते मागे पुढे पाहत नाहीत. ग्रंथाच्या जगात इतका विरघळून गेलेला माणूस दुसरा मी पाहिला नाही . .आता भारतीय बैठकीच्या ऐवजी खुर्चीत आरामात बसून ऐकताना ज्येष्ठांना समाधान वाटू लागले. या अक्षरगप्पांमुळे किती साहित्यिक, कवी,पत्रकार,उद्योजक, गायक. सामाजिक कार्यकर्ते, यांची ओळख झाली. त्यांची जडणघडण समजली, यातली काही नावं सांगतो, --प्रा.विठ्ठल बन्ने, डाॅ.भीमराव गस्ती, कन्नड लेखक भैरप्पा, डाॅ अमर आडके, मोहन आपटे,निळूदामले, डाॅ.रघुनाथ माशेलकर, नूतन गंधर्व, आप्पासाहेब देशपांडे, संगीत दिग्दर्शक कौशल इनामदार. अशी अनेक नावे सांगता येतील. स्वातंत्र्य सैनिक दत्ता शिंदे, या सर्वांचे अनुभवातून आम्ही खूप शिकलो. आता या अक्षरगप्पांनी 105 गप्पांचा टप्पा ओलांडून पार केला आहे. याशिवाय दालनामध्ये आलेल्या नामवंतांच्या सहवासाने आनंद मिळाला. त्यात, -डाॅ.अभय बंग,ना.धों.महानोर, मंगेश पाडगावकर, लीना मेहंदळे, आणि हो आणखी एक दुर्मिळ भेट व सहवास व गप्पांची संधी मिळाली ते प्रख्यात कवी "ग्रेस". विजयाताई वाड,पोलीस महासंचालक अरविंद इनामदार, अशी अनेक. तसेच नेहमी भेटणारे, डाॅ सुनीलकुमार लवटे, वसंत पाठक,रजनीताई हिरळीकर, स्नेहा वाबळे या ग्रंथ प्रेमींचे परिचय व विचारांची देवाण घेवाण याचा मला खूप उपयोग झाला तो रवींद्र जोशी यांच्यामुळे.पाहता पाहता आमचा स्नेह पन्नास वर्षाचा झाला. माझा एक मित्र म्हणतो की," पुस्तक वाले जोशी म्हणजे, "लयी भारी माणूस"त्यांच दालन म्हणजे स्वर्गच जणू" तिथं जाऊन आलं की खूप ताज तवानं वाटतं.आतिथ्यशीलता व विनयशीलता हा अक्षर दालन मधील सर्व सदस्यांचा स्वभाव धर्म च.अमेय व आलोक ही रवींद्र यांची मुलं,दीपक नलवडे, श्रीमती नानिवडेकर,श्रीमती कामत,विजय,भाचा व प्रकाशक राहुल कुलकर्णी, ही मंडळी अक्षरदालनात असली की दालन कसे भरल्यासारखे वाटते. त्यांची नम्रता, शालीनता ही कौतुकास्पद आहेच.त्यावर रवींद्र जोशी यांनी केलेले संस्कारच दिसून येतात. कधीतरी अधूनमधून आमचे चंद्रशेखर बटकडली अण्णा हेही डोकावून जातात ,चर्चेत सहभागी होतात. आज "अमेयने"प्रकाशन क्षेत्रात प्रवेश केला आहे. अनेक दर्जेदार पुस्तके त्याने प्रकाशित केली आहेत. आशय व दर्जा या बाबतीत पुण्या, मुंबई च्या तोडीचे काम कोल्हापूरलाही होते हे त्याने सिद्ध केले आहे. या पन्नास वर्षाच्या सहवासात सर्व जोशी बंधुंचा परिचय झाला. श्री रवींद्र जोशींना धरून हे न्ऊ बंधु म्हणजे "नवनाथच".विलक्षण योगायोग म्हणजे "हे सगळेच पुस्तकवाले जोशी".कोल्हापूरच्या पाठोपाठ सांगली येथे भव्य असे "प्रसाद ग्रंथ वितरण दालन "श्री त्रिलोकनाथ जोशी यांनी सुरू केले. तर कराडला "विजया ग्रंथ वितरण दालन " श्री त्रिनेत्रनाथ जोशी यांनी सुरू केले आहे. तेथे श्री अमरनाथ जोशी ही असतात. कोल्हापूरला श्री त्रिभुवननाथ जोशी यांनी "अभिनंदन प्रकाशन कोल्हापूर "सुरू करून आता पर्यंत सुमारे 200 पुस्तके प्रकाशित केली आहेत. 12रूपये या अत्यंत अल्प किमतीत "श्याम ची आई "हे साने गुरूजींचे पुस्तक प्रकाशित करून जवळ जवळ दोन लाखाहून अधिक प्रती अगदी खेडोपड्यातून ती मुलांना दिली आहेत. त्याच प्रमाणे संपूर्ण साने गुरुजी वांग्मय ही स्वस्तात दिलेले आहे. गांधीजींचे "आत्मकथन "ही स्वस्तात दिलेले आहे. या सर्व भावंडानी या ग्रंथ चळवळीसाठी आपले जीवित कार्य समजून त्यांनी ही अक्षर सेवा करावी हा परमेश्वरी संकेत असावा. दीनानाथ हे उपक्रम शील शिक्षक, प्रसननाथ व सुरेंद्र नाथ हे औदुंबर ला शेती सांभाळून ग्रंथ सेवाही करतात. मानवेंद्रनाथ हा दीनानाथ यांचा मुलगा याने "गमभन" यामधून शैक्षणिक साधन निर्मिती उद्योग चालविला आहे. श्री गुरूनाथ सर्वात जेष्ठ बंधु मार्गदर्शकाची भूमिका बजावत आहेत.रवींद्रांच्या सहवासात अनेकवेळा औदुंबरला जाण्याचे योग आले. कवीवर्य "सुधांशु "यांनी सुरू केलेल्या "सदानंद साहित्य संमेलनाला अनेकवर्षे आम्ही जातो. ते रवींद्र जोशी यांच्यामुळे. रामभाऊ देशपांडे व जगन्नाथ कुलकर्णी हेही असत. इथे आणखी एक परिवार जोडला गेला. ह.रा.जोशीं, पुरुषोत्तम जोशी, कवडे सर, वासुदेव जोशी ही जिवाभावाची मंडळी मिळाली."अक्षर दालनात "आमच्या म्हणजे रामभाऊ देशपांडे, रवींद्र जोशी व मी यांच्या सुखदुःखाच्या गोष्टी रंगतात चार एक दिवस बोलणं झालं नाही तर आम्ही बेचैन होतो. असा आमचा स्नेह आता मुरला आहे. यातूनच आम्ही "आनंदवन,हेमलकसा ,सोमनाथ, सर्च, सेवाग्राम,वर्धा अशी एक कौटुंबिक सहल काढली. 10/15 मंडळी होतो. अतिशय सुंदर सहल झाली बाबा आमटे यांचे कार्य पाहून नतमस्तक झालो. साधनाताई, डाॅ विकासभाऊ, डाॅ प्रकाश भाऊ इतर परिवार, डाॅ. राणी बंग , डाॅ तात्याराव लहाने या सर्वाशी बोलता आले. आम्ही धन्य झालो. या सर्व गोष्टी जमवून आणल्या त्या रवींद्र जोशी यांनी. आणखी फार महत्वाची गोष्ट या जोशी मंडळीनी केली आहे ती म्हणजे, "औदुंबर येथे त्यांच्या वडिलांनी सुरू केलेले "अन्नदाना "चे व्रत आजही या सर्व बंधुनी चालू ठेवले आहे. मला सर्वात जास्त भावले ते आपल्या कामावरील निष्ठा, ग्रंथावरील व वाचकांवरील अतुट प्रेम."माझ्या जिवीची आवडी /पंढरपुरा नेईन गुढी/"या माऊलींचे उक्तीला अनुसरून चाललेले कार्य असेच चालू राहू देत. अक्षर दालन, "निर्मलाय प्लाजा ",मंगळवार पेठ, कोळेकर तिकटी बसस्टाॅप कोल्हापूर (0231--2646424/2646423) इथे एकदा भेट द्या. म्हणजे पुन्हापुन्हा जाल.
-प्रा.श्रीकांत नाईक
गडहिग्लज, जि कोल्हापूर
(9405039500).............


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा