आठवणीतली माणसं - 15
एक अलौकिक प्रतिभावंत व अफाट प्राध्यापक - गुरूवर्य डाॅ. पी.जी.कुलकर्णी सर
मी 1963/64 एस.एस.सी.परीक्षा उत्तीर्ण झालो.त्या काळात डिस्टींग्क्षणचे गुण मिळाले. आता पुढे कुठे शिकायला जायचे त्याची घरी चर्चा सुरू झाली. माझ्या काकांनी सांगितले की, तू काॅमर्स शाखेला जा.पण जवळ काॅलेज नव्हते. मे महिना संपत आला आणि अचानक एक आनंदाची बातमी आली की,येत्या जून महिन्यापासून गडहिग्लजला "कला आणि वाणिज्य "महाविद्यालय सुरू होणार आहे. खूप आनंद झाला .शेवटी "काॅमर्स "शाखेला प्रवेश घेतला. मोजक्या मुलांनी प्रवेश घेतला. काॅमर्स शाखेला मुली नव्हत्या. एम.आर.हायस्कूलच्या इमारतीत सकाळचे वर्ग भरणार होते. प्राध्यापक वर्गही नवीन होता.प्राचार्य म्हणून ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक, प्राध्यापक अरविंद याळगी सर यांची नेमणूक झाली. ते माझ्या काकांचे मित्र. जून 15 ला काॅलेज सुरू झाले. नव्याचे नऊ दिवस संपले. आणि अभ्यास सुरू झाला. पण दोन महिने झाले तरी "अकौंटन्सी "विषयाला प्राध्यापक च मिळेना. हा विषय शिकवण्याकरीता " चार्टर्ड अकौंटंट "चीच नेमणूक केली पाहिजे ही विद्यापीठाची अट होती. अशी माणसे त्याकाळात अत्यंत दुर्मीळ. अगदी योगायोगाने नुकतीच सी.ए.ची पदवी मिळविलेले एक प्राध्यापक मिळाले पण त्यांची अट होती की आपण आठवड्यातून दोनच दिवस येईन. संस्थेने त्यांची अट मान्य केली. शेवटी सप्टेंबरला ते येणार असे प्राचार्यांनी जाहीर केले. ही सी.ए.ची परीक्षा पास होणे फार कठीण होते. संपूर्ण देशात एक टक्का निकाल लागायचा.अत्यंत बुद्धिमान लोक च ही परीक्षा पास व्हायचे. साधारण पणे काॅमर्स शाखाही कठीणच होती. आणि एके दिवशी सकाळी 9.30 वाजता एक उंचेपुरे सहासाडेसहा फूट उंची असलेले, भरदार शरीरयष्टी लाभलेले, सावळ्यारंगाचे, तरूण असूनही अकाली पांढरे झालेले केस भूरुभुरू उडत असलेले, पांढरा शर्ट, काळी पॅन्ट,काळा कोट ,गोल चेहरा, नासिका फार लांब नाही पण सरळ, विरळ मिशी, असे व्यक्तिमत्व लाभलेले प्राध्यापक वर्गात आले. पाठोपाठ शिपायाने खडू व डस्टर आणून टेबलावर ठेवला. आम्ही सर्वांनी उठून त्यांचे स्वागत केले. त्यांनी सर्वांना बसायला सांगितले. सुरूवातीला सगळ्यांचा परिचय झाला. आपलाही परिचय करून दिला. आणि काॅमर्स शाखेचा परिचय, अभ्यासक्रम, पुढील शिक्षण, याविषयी ते बोलत होते.अगदी अस्खलित इंग्रजी भाषेत.एकही शब्द मराठीत वापरला नाही. आमच्या डोक्यावरून च सगळे गेले. पण पुढे पुढे त्यांनी आमची अडचण लक्षात घेऊन ते अधून मधून मराठीत बोलायचे पण त्यांचा आग्रह होता की आम्ही इंग्रजी भाषेत बोलण्याचा प्रयत्न करावा. पहिल्या तासाला मोजून 14/15 विद्यार्थी. "ते आले, त्यांनी पाहिले आणि त्यांनी जिंकले.असेच झाले." ते बोलायला लागले. जणू धबधबा कोसळावा. तसा शब्दांचा धबधबा कोसळत होता. फळ्यावर मोठ्या लफ्फेदार अक्षरात ते मुद्दे लिहित होते.खडूने पॅन्ट काळ्याची पांढरी झाली तरी त्यांचे त्यांना भान नव्हते. त्यांची रसवंती एकदा सुरू झाली की थांबत नसे. त्याकाळात काॅलेजमध्ये प्राध्यापक टिकणे अवघड असायचे. खेडे गाव म्हणून इकडे येण्याचा ओढा कमी. काॅमर्स ही अत्यंत कठीण शाखा होती. अभ्यासक्रमही कठीण होता.निकालही कडक लागायचे.प्रथम श्रेणीत एखादा विद्यार्थी असायचा तोच विद्यापीठात प्रथम क्रमांकाने असायचा. द्वितीय श्रेणीत किरकोळ विद्यार्थी व पास श्रेणीत काही विद्यार्थी असत.बाकीचे नापास. आमच्या सुदैवाने गुरूवर्य डाॅ. पी.जी.कुलकर्णी सर आम्हाला लाभले. आणि आमचे जीवन उजळून गेले. परिसच लाभला. ते आठवड्यातून दोनदा यायचे. या दोन दिवसात ते चार पाच तास घेत. त्यांचे शिकवणे अप्रतिम. कितीही मोठी संख्या असली तरी ते चुटकी सरशी ते बेरीज करून दाखवत असत. तेव्हा "कॅलक्यूलेटर "नव्हते. त्यांनी आम्हाला अंकगणित पक्के करा .येत नसेल तर पाढे पाठ करा असा सल्ला दिला. त्यांनी "काॅमर्स " ची भिती घालवून टाकली. विषय लिलया सोपा केला.ही किमया त्यांच्या शिकवण्याची. काॅमर्स विषयाचे जादूगारच ही त्यांची ख्याती दूरवर पसरली होती . आजही त्यांचे आम्ही विद्यार्थी जमलो की अभिमानाने चर्चा करतो. अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय पी.जी. कुलकर्णी सर. अशक्य हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नव्हता. गुरूवर्य डाॅ. पी.जी.कुलकर्णी सर मूळचे ऊत्तूरचे. माझेही आजोळ ऊत्तूर. त्यांच्या घराण्याचा आमच्या आजोळच्या घराण्याशी घनिष्ठ संबंध होता.मी लहानपणी आजी किंवा मावशी बरोबर सरांचे घरी अनेक वेळा गेलो आहे. सर त्यावेळी बेळगाव-पुणे येथे शिक्षणासाठी होते. कधीतरी सुट्टीला ऊत्तूरला आले की मी त्यांना पाहत असे.कधी ते माझ्या घरी आजोबाना भेटायला येत. ते माझ्या आजोबांना "किनरेमामा", व आजीला "काकी " म्हणत असत. तेव्हा ते माझी आस्थेने चौकशी करायचे. त्यांच्या बहिणी, सुमनताई, शालनताई, मालनताई ,यांचा माझा परिचय होता.सुमनताई तर संकेश्वरला राहत होत्या. सरांचे वडील "गोविंदरावकाका " हे ऊत्तूरचे पहिले प्रगतीशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध होते.त्यांनी आपल्या शेतीत अनेक प्रयोग केले होते. आम्ही स्काऊटचे विद्यार्थी त्यांचेकडे मदत मागायला जात असू तेव्हा ते एक "आणा " द्यायचे. त्यावेळी एक आणा ही रक्कम फार मोठी वाटायची. पुढे मी हायस्कूल शिक्षणा साठी संकेश्वरला आलो. त्यामुळे प्रदीर्घ काळ झाल्यावर एकदम काॅलेजमध्येच गाठ पडली. तीही काॅलेजच्या वर्गात.पहिली तीन वर्षे मी त्यांचा विद्यार्थी होतो.पुढे मी काॅमर्स काॅलेजला गेलो.विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून ते प्रसिद्ध होते. जिल्ह्यातील अनेक संस्थांचे ते ऑडिटरही होते.या क्षेत्रातील त्यांचा अधिकार फार मोठा होता व ते एकमेव होते. इंग्रजी, मराठी साहित्याचा त्यांचा व्यासंग फार मोठा होता. विविध क्षेत्रातील नामवंत मंडळींशी त्यांचा स्नेह होता. त्यांच्याशी चर्चा व्हायच्या. साहित्यातील उतारे त्यांना पाठ होते.संदर्भ माहीत होते. त्यांच्या मैफिली रंगत असायच्या.आंतरराष्ट्रीय किर्तीचे शिक्षणतज्ज्ञ डाॅ. जे.पी.नाईक यांचे स्मारक विद्यापीठात व्हावे म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. इचलकरंजीच्या फाय फौंडेशनचे ते मार्गदर्शक होते. माझे आजोबा मला नेहमी म्हणायचे की, "बघ,गोविंदराव कुलकर्णी यांचा प्रभाकर किती हुशार आहे. तसा अभ्यास कर." विद्यार्थी दशेत पी.जी.सरांनी प्रचंड मेहनत घेतली. 12/12, 14/14 तास ते स्वतःला कोंडून घेऊन अभ्यास करायचे. मराठी व इंग्रजी भाषेवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. या भाषेतले संदर्भ ते क्षणार्धात देत असत. काॅमर्स विषयाच्या बाबतीत तर साक्षात सरस्वतीचा वरद हस्तच त्याना लाभला होता. जागतिक किर्तीचे अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, शास्रज्ञ, कलावंत, साहित्यिक त्यांच्या घनिष्ठ परिचयाचे होते. त्यांच्याशी ते तासनतास फोनवर बोलत असत.मला एकदा ते म्हणाले, "हे बघ,श्रीकांत, तुला डाॅ. अब्दुल कलाम साहेबांशी बोलायचे आहे का? एकदा घरी ये.फोन लाऊन देतो?". माझे काका दादा नाईक हे शिक्षणतज्ज्ञ, साहित्याचे मर्मज्ञ ,संगीताचे रसिक, आणि अध्यात्म क्षेत्रातील अधिकारी म्हणून ओळखले जात. अनेकदा पी.जी.सर कोल्हापूरला दादांना भेटायला यायचे. त्यांच्याशी चर्चा रंगत असे. शिवराज काॅलेजमध्ये असतांना "अनामिका"या हस्तलिखित भित्तीपत्रकामध्ये मी गझल सम्राज्ञी बेगम अख्तरांचेवर एक कविता लिहिली होती. ती वाचून त्यांनी मला बोलावून घेतले होते आणि कवितेचे खूप कौतुक केले होते. हे आजही आठवते. असेच लिहित रहा असा सल्लाही दिला होता. सर अत्यंत मनस्वी होते.कोणतीही गोष्ट ते मनापासून करायचे.कौतुकही हातचे न राखता करायचे.एकदा झपाटल्यासारखे त्यांनी एक नाटक लिहून काढले.मला त्याचे कथानक सांगितले व मला म्हणाले, नाव सुचव. मी कांही बोललो नाही पण तेच लगेच म्हणाले, "ज्या गावच्या बोरी ,त्याच गावच्या बाभळी " हे नाव तुला कसे वाटते ते सांग. संगीत मैफलीचे रसग्रहण ते फार छान करायचे. आपल्या कामाचा उरक तर थक्क करणारा होता. त्याबाबत त्यांचा हात धरणारा कोणी नव्हता. समाजकारण, राजकारण,यातही त्यांचा अधिकारवाणीने वावर होता.या क्षेत्रातील नामवंतांचे बरोबर ते असायचे. आपलं माणूस कोठेही भेटलं की त्याच्याबरोबर किती बोलू अन् किती नको असे त्याना होतसे.असेच एकदा गडहिग्लजला कांही कामानिमित्त ते आले होते. मला रस्त्यात पाहिले आणि काम विसरून माझ्या बरोबर दीड-दोन तास बोलत राहिले. अगदी मनापासून माझी विचारपूस केली.कोल्हापूरला घरी एकदा ये असे म्हणाले. मी पदवीधर झाल्यावर नोकरीच्या शोधात होतो.तेव्हा एकदा आजोबांना भेटायला आले होते.तेव्हा ते म्हणाले," किनरेमामा , काकी, श्रीकांतला माझ्याकडे सोपवा मी पाहतो त्याला काय करायचे ते".नंतर मला खूप समजावून सांगितले पण तो योग काही आला नाही. पण मी शिक्षक झाल्यावर एकदा भेट झाली तेव्हा काय करतोस असे त्यांनी विचारले.मी ऊत्तूरला शिक्षक झालो असे सांगितले. त्याचा त्यांना आनंद झाला.मन लावून, झटून काम कर म्हणजे तुला त्याचा आनंद कळेल.व्यासंग कसा वाढवावा हेही त्यांनी सांगितले. काॅलेजमधील दिवसात आम्ही, पु.ल.देशपांडे यांचे "तुझे आहे तुजपाशी "नाटक बसवले.त्यात प्राचार्य पोतदार सर ,प्रा.विठ्ठल बन्ने, आणि आम्ही कांही विद्यार्थी-विद्यार्थीनी नी काम केले होते. त्या नाटकाला कोल्हापूरहून पी.जी.कुलकर्णी सर आवर्जून आले होते. नाटकाचे भरभरून कौतुक करून गेले. प्रचंड व्याप असतांना ही त्यांनी आपली रसिकता जोपासली होती.व्यासंग ठेवला होता. आणि अचूक संदर्भ सांगून ते आम्हाला थक्क करून सोडत. आमच्या ऊत्तूर विद्यालयावरही त्यांचे खूप प्रेम होते.भेट होईल तेव्हा ते शाळेच्या प्रगतीबद्दल नेहमी विचारायचे. असामान्य बुद्धिमत्ता, हरहुन्नरी स्वभाव, कामाचा प्रचंड निपटारा हे पाहिलं की,त्यांना अफाट प्राध्यापक म्हणावे लागेल. त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. खूप ओळखी झाल्या. त्याचा आयुष्यात उपयोग झाला.मी जरी शिक्षक झालो असलो तरी पी.जी.सरांचे मार्गदर्शन मला वेळोवेळी मिळत गेले हे माझे भाग्यच समजतो.मी निवृत्त होण्याच्या आधी त्यांना एक पत्र लिहिलं होतं. त्याला त्यांनी उत्तरादाखल एक सुंदर पत्र पाठवलं होतं.ते मी अत्यंत जपून ठेवलं आहे.त्यात त्यांनी माझं कौतुक केले होते आणि यापुढेही कार्यरत रहा असा सल्लाही दिला होता. एक दिवस कळवून भेटायला ये.मला तुझ्याशी बोलायचे आहे असे म्हणाले. पण तो योग कांही आला नाही. ती माझी इच्छा अपुरी राहिली. असं असलं तरीही अलौकिक प्रतिभावंत, सच्चा माणूस, अफाट बुद्धिमत्तेचा धनी माझ्या आयुष्यात गुरू म्हणून लाभला यासारखे दुसरे भाग्य ते कोणते!!! त्यांच्या स्मृतीला माझे कोटी कोटी प्रणाम!!!!
-प्रा.श्रीकांत नाईक
गडहिग्लज, जि. कोल्हापूर
(9405039500)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा