आठवणीतली माणसं - 18
"करके देखो " हा म.गांधीजींचा संदेश शिक्षकांना देवून कार्यप्रवण करणारे कुशल प्रशासक - मुख्याध्यापक, म्हणजे - गुरूवर्य अ. वि. आजगावकर सर!
एक विलक्षण व्यक्तिमत्व. म.गांधीजींचा विचार, आचार्य विनोबाजींचा शिक्षक धर्म, आणि पू.सानेगुरुजींची आंतरभारतीची कल्पना रूजविण्याचा प्रयत्न करणारे दृष्ट्रे असे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय अ.वि.आजगावकर सर. ध्येयनिष्ठा, कर्मनिष्ठा आणि जीवननिष्ठा यांचे सुंदर दर्शन घडविणारे व्यक्तिमत्व म्हणजे अ.वि.आजगावकर. आयुष्यभर आपली निष्ठा प्राणपणाने जपणारे सर आज 91 व्या वर्षातही जीवननिष्ठा आचरत असल्याचे पाहून मनअचंबित झाल्याशिवाय राहत नाही. एखाद्या ऋषीकुळातील योग्यासारखी साधी जीवनपद्धती आजही ते अवलंबित आहेत.स्वार्थाचा जराही लवलेश त्यांना शिवलेला नाही. मी प्राथमिक शाळेत शिकत होतो त्यावेळची गोष्ट आहे.साधारण 1952/53 साल असावे. तेव्हा ऊत्तूरला माध्यमिक शिक्षणाची सोय नव्हती. एवढेच नव्हे तर संपूर्ण आजरा तालुक्यात फक्त आजरा येथे एक शाळा होती. तसेच गडहिग्लज तालुक्यातही फक्त एक शाळा गडहिग्लजला होती. ऊत्तूर परिसरातील 30/35 खेड्यातील मुलं गडहिग्लज जवळ असल्यामुळे तिकडे जात असत. याच सुमारास ऊत्तूरला एक प्रयत्न व्ही.टी.पाटील यांनी केला होता. इयत्ता आठवीचा एक वर्ग होता.पण कांही काळाने तो बंद पडला.त्यामुळे माध्यमिक शाळेची या भागात नितांत गरज होती. मुलींचं शिक्षण सातवी नंतर बंदच झालं होतं. आजगावकर सरांचे घराणे आणि माझे आजोळ यांचे अत्यंत घनिष्ठ ऋणानुबंध होते. पन्नासच्या दशकात महाविद्यालयात शिक्षणासाठी कोल्हापूरच गाठावे लागायचे. आजगावकर सर तेव्हा "राजाराम काॅलेज, कोल्हापूर " येथे शिकत होते.सुट्टीला आले की आमच्या आजोळी येत असत.त्यांचे वडील माझ्या आजोबांचे स्नेही. त्यामुळे घरोब्याचे संबंध. मी तेव्हा तिसरी/चौथीत शिकणारा मुलगा. तेव्हा मी त्यांना प्रथम पाहिले होते. पण बोलण्याचा कांहीच संबंध येत नसे.ते आमच्या घरी येत .आजोबांशी बोलत इतकंच मला कळत होतं. बी.ए.झाल्यावर ते ऊत्तूरला आले आणि पुढे गडहिग्लजला "गणिताचे" क्लास घेऊ लागले. हे करीत असतानाच गडहिग्लज नगरपालिकेतील कर्मचार्यांची संघटना स्थापन केली. त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. तो काळ स्वातंत्र्य मिळाल्यावरचा भारावलेला काळ होता.देशासाठी काहीतरी केलं पाहिजे ही भावना होती. स्वातंत्र्य मिळून 4/5 वर्षे झाली होती. पहिली सार्वत्रिक निवडणूक होणार होती. सगळ्या जगाला ऊत्सुकता होती. हे वर्ष होते 1952 वातावरण भारावलेले होते.म.गांधीजींचा आग्रह होता,"खेड्याकडे चला. खरा भारत तेथे आहे. त्याला बलशाली बनवूया.". काॅलेजमध्ये असतांनाच आपल्या भागातील होतकरू आणि समविचारी मित्रांचा शोध त्यांनी सुरू केला होता. अशा मित्रांची संख्या वाढू लागली. इकडे ऊत्तूरमध्ये व्ही.टी.पाटील यांनी हायस्कूल चा एक वर्ग हावळ गल्लीत सुरू केला होता. पण तो फारसा यशस्वी ठरला नाही म्हणून एके दिवशी ट्रक भरून बेंच घेऊन गारगोटीला निघाला होता. ट्रक नेहरू चौकात आला आणि अचानक थांबला. गाडीला आडवे येऊन एक मध्यम वयाचे खादीधारी गृहस्थ उभे राहिले. ते होते "शंकर अण्णा करंबळी ". म.गांधीजींच्या विचाराचे गृहस्थ. स्वातंत्र्य प्रेमी. त्यांनी गाडी अडवली. गारगोटीहून आलेल्या माणसांना विनंती केली की,"आमच्या गावची मुलं शिकू देत.शहाणी होऊ देत.शाळा बंद करू नका. "पण ते काही करू शकत नव्हते. हे पाहून शंकर आण्णा अनंतराव आजगावकर यांचेकडे गेले.आणि त्यांना विनंती केली की तुम्हीच आता शाळा सुरू करा. अण्णांची ही तळमळ पाहून ते अण्णांना म्हणाले, प्रयत्न करतो. पुढे लवकरच आपल्या सहकारी मित्रांचा विचार घेऊन 1958 साली "ऊत्तूर विद्यालय ऊत्तूर "या माध्यमिक शाळेची सुरूवात झाली. हळूहळू सहकारी मिळू लागले. वसंतराव पाटील, बी.एम.पाटील, डी.डी.कांबळे हे अत्यंत विश्वासू मित्र आले. शाळेचे सर्व अधिकार अर्थातच आजगावकर सर यांचेकडे आले. ते सांगतील त्यानुसार सर्वांनी काम करायचे.त्यात कोणतीही कसर ठेवायची नाही. लक्ष्मणराव यमगेकर, विष्णुपंत यमगेकर, सदानंद देवरू,हिराचंद हजारे,डाॅ सु.ब.देशमाने, बी.जी.हळवणकर अशी अनेक मित्र मंडळी धावून आली. ही शाळेची बाल्यावस्था . एकत्र बांधणारा धागा एक होता.तो म्हणजे राष्ट्रसेवादलाच्या संस्कारानी घडलेली मने.सानेगुरुजींच्या साहित्याने सर्वजण प्रभावित झाले होते. पगार नव्हताच. एक मोठे कुटुंबच. शाळेला आकार येऊ लागला. त्यासाठी निश्चित अशी दृष्टी आजगावकर सर यानी मनात ठेवली होती. ती सर्वांना समजावून सांगितली. "राष्ट्रप्रेम,सुसंस्कार, चारित्र्य, आणि शिस्त "या चतुःसूत्रीला अनुसरून विद्यार्थी घडवायचे आणि त्याला सुशिक्षित व सुसंस्कारित नागरिक बनवायचे हेच ध्येय ठेवले. विद्यार्थ्यांच्या अंगी श्रमसंस्काराची वृत्ती निर्माण करण्याचा सर्वांनी मिळून प्रयत्न करायचे असे ठरवले. दररोज संध्याकाळी शाळा सुटल्यावर राष्ट्रसेवादलाच्या शाखा सुरू झाली. मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थीनी मैदानावर जमू लागले. दरवर्षी सेवादलाचे शिबीर आयोजित केले जाऊ लागले. त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील नामवंत लेखक, विचारवंत शाळेत येऊ लागले. त्यांची बौद्धिकं मुलांना, शिक्षकांना ऐकायला मिळू लागली. समूहगीते बसवली. श्रमसंस्काराची शिबीरेही होऊ लागली. असा भारावलेला काळ होता हा.शाळेकडे मुलामुलींचा ओघ वाढू लागला. पंचक्रोशीतल्या मुली सातवी नंतर घरीच बसत होत्या. त्या आता शिकू लागल्या.सर्वानाच आता महाविद्यालयात जाण्याची संधी मिळणार होती. शाळेचे संस्कार आणि शिस्त याची किर्ती पसरली. जादा तासांचे नियोजन करून मागे राहणार्या मुलांचा अभ्यास शिक्षक करून घेवू लागले. या सर्वांवर अर्थातच आजगावकर सर यांची बारीक नजर असायची. मुलांचा युनिफॉर्मही विशेष होता. गांधी टोपी मुळे ती ओळख झाली होती. शिक्षकही साधेपणाने राहत असत. आणि 1964 साली ऊत्तूर विद्यालय ऊत्तूर या शाळेची पहिली बॅच एस.एस.सी.ला बसणार होती. वर्षभर विद्यार्थी खूपच राबले आणि शिक्षकांनीही आपले सर्व कौशल्य पणास लावले. केंद्र गडहिग्लजला होते. गडहिग्लजला एका शाळेत मुलांची व्यवस्था केली होती. ऊत्तूर हून मुलांचे डबे घेऊन शिपाई आणि एका शिक्षकाने जायचे असे नियोजन केले होते. त्या शिक्षकाने मुलांच्या अडचणी पाहायच्या व पेपर झाल्यावर परत यायचे. आणखी एक ऊपक्रम सरांनी राबवला. मुलं अकरावीच्या वर्गात गेली की वर्षभर त्यांना सुट्टी नाही. त्यांनी गावात खोली घेऊन राहायचे. गावाकडून डबा मागवून घ्यायचा. सकाळी चार वाजता मुलांनी ऊठले पाहिजे. असा नियमच होता. ही मुलं सतत शाळेत असली पाहिजेत.शिक्षकांच्या संपर्कात असली पाहिजेत. आमचे बबनराव ठाकूर सर पहाटे साडेचार वाजता चावडीच्या मैदानावर जावून बिगुल वाजवित असत. तो ऐकून खोल्यामधून राहिलेले विद्यार्थी दहा मिनिटात मैदानावर जमत. 45मिनिटे व्यायाम घेत असत.हे पहायला आजगावकर सर स्वतः हजर असत.मग हजेरी घेतली जायची. गैरहजर मुलांची चौकशी केली जात असे. कधी कधी सर मुलांचे खोलीवर जाऊन मुलं कशी राहतात, सकाळी ऊठतात की नाही त्यांच्या अडचणी समजून घे असत. त्यामुळे त्यांचा दरारा होता. शिस्तीला पर्याय नाही. पण वातावरण मात्र एकाद्या कुटुंबासारखे. जून 1964. परीक्षेचा निकाल जाहीर झाला. पहिल्याच प्रयत्नात घवघवीतपणे यश मिळाले. सगळीकडून कौतुकाचा वर्षाव झाला. इथून पुढे यशाची एक एक पायरी चढत चढत शाळा पुढे चालली. हे सर्व करीत असतानाच "आंतर भारती शिक्षण मंडळाची स्थापना झाली ". प्रथम "चिमणे ",नंतर "पिंपळगाव, बारवे, आणि कोल्हापूर "याठिकाणी शाळा सुरू केल्या. ऊत्तूर येथे प्राथमिक शाळा आणि ज्युनियर काॅलेज ऊत्तूर व डाॅ. जे.पी.नाईक महाविद्यालय असा शिक्षण विस्तार होत गेला. गुणवत्ता, सुसंस्कार, चारित्र्य आणि शिस्त यांचा आग्रह धरत कोल्हापूर जिल्ह्यात एक स्वतःचे स्थान निर्माण केले. दरम्यान 1967साली ऊत्तूर जि.प.ची निवडणूक लागली .सर ऊभे राहिले आणि निवडून आले. पंचायत समिती आजराचे सभापती झाले. इथेही लोकप्रतिनिधीचा आदर्श निर्माण केला. मानधन घेतले नाही व सरकारी गाडीने प्रवास न करता एस.टी.ने प्रवास केला. हे राज्यातले दुर्मिळ ऊदाहरण ठरले. त्यांच्या भोवती एक आदर्शाचे वलय निर्माण झाले होते. इथपर्यंतचा हा प्रवास मी दुरून पाहत होतो. ऐकत होतो.अनुभवत होतो. कधीकाळी मीहि या शिक्षणसंकुलाचा भाग होईन असे वाटले नव्हते.जिल्ह्यातून शिक्षणक्षेत्रातील अनेकमंडळी शाळा पाहायला येत असत. मी संकेश्वरला हायस्कूलला जात होतो.पण प्रत्येक सुट्टीत ऊत्तूरला आजोळी येत असे. तेव्हा माझा बराच वेळ शाळेत जायचा. माझे बालमित्र तिथे भेटायचे. शिवाय आणखी एक आकर्षण म्हणजे ग्रंथालय. इथे पू.सानेगुरुजींपासून ते खांडेकरांपर्यंत अनेक लेखकांची पुस्तके होती.आणि जवळ जवळ 72 प्रकारची नियतकालिके, मासिके, पाक्षिके, साप्ताहिके असायची. इतकी नियतकालिके घेणारी ही जिल्ह्यातील एकमेव शाळा होती.यानिमित्ताने माझे येणे-जाणे वाढले.आजगावकर सर चौकशी करायचे.व्ही.के.पाटील सर यांच्याशी मनमोकळेपणाने बोलणे व्हायचे.त्यांनाही पुस्तक वाचनाची प्रचंड आवड. पुढे मी काॅलेजला गेल्यावरही शाळेत जात होतोच. तेव्हा श्रीपाद जोशी, एस.के.कुलकर्णी बंधु ,एम.ए.कुलकर्णी . ही मंडळी परिचयाची झाली. आजगावकर सर मितभाषी होते. अगदी कमी बोलायचे. हायस्कूलमधील एक आठवण सांगण्यासारखी आहे. ती अशी, या हायस्कूल मधील बहुसंख्य विद्यार्थी माझे बालमित्र होते. ते भेटायचे म्हणून मला ओढ जास्त वाटायची. प्रभाकर जोशी, शशिकांत चिपरीकर,मधुकर येसादे,वसंत देसाई, अंता घोरपडे, झेंडेबंधु, श्रीकांत धुरे , वसंत व्हनबट्टे अशी अनेक. साधारण 1962/63 साली "तालुका क्रीडामहोत्सव भरविण्याची संधी "ऊत्तूर विद्यालय ऊत्तूर ला. "मिळाली होती. आजगावकर सर यांनी आपल्या सहकार्याना घेऊन या संधीचे सोने केले. सरांचे अचूक नियोजन, व दूरदृष्टी ,शिक्षकांचे जीव तोडून घेतलेले परिश्रम आणि विद्यार्थी विद्यार्थीनीनी केलेला प्रचंड सराव यामुळे हा क्रीडा महोत्सव गाजला. एक वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेतील सर्व क्रीडा प्रकारात , वैयक्तिक व सांघिक ऊत्तूर विद्यालय ऊत्तूर च्या मुलामुलीनी भाग घेतला होता आणि सर्व विभागात प्रथम क्रमांक मिळवून जनरल चॅम्पियनशीपही मिळविली ही अपूर्व व अद्भुत घटना होती. श्री.बी.के.पुजारी हे मुख्य मार्गदर्शक होते. हे सर्व सामने लक्ष्मीमंदीराजवळील शेतात खास तयार केलेल्या मैदानावर झाले. यात मी दत्ता सावळे सर, भरत लाटकरसर. यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवक म्हणून काम केले होते. हे सामने बघायला पंचक्रोशीतल्या शेकडो लोकांनी मैदान भरून गेले होते. सगळा तालुका लोटला होता. त्यानंतर मात्र असा क्रीडा महोत्सव झाला नाही. माझ्या बालमित्रांचा मला हेवा वाटायचा.आपणही याच शाळेत शिकायला हवे होते असे वाटायचे. कधी कधी योग जुळून येतात आणि आपली इच्छा पूर्ण होऊन जाते. माझी इच्छा विद्यार्थी म्हणून नाही पण शिक्षक म्हणून पूर्ण झाली. मी या शैक्षणिक परिवाराशी जोडला गेलो. पुढची 34/35वर्षे एकरूप झालो. ही सुद्धा एक मजेशीर कथा आहे. या शाळेत माझी धाकटी बहिण, "मंगल " शिकत होती. ती दहावी च्या वर्गात गेल्यावर एक दिवस पालकांना मिटींगसाठी बोलावून पालकांच्या कडून पाल्या विषयी, त्याच्या प्रगती विषयी माहिती घेऊन शाळा त्यासाठी काय करीत आहे आणि पुढे काय करणार आहे यासंबंधी चर्चा केली जायची. असेच एकदा एके दिवशी शाळेचा शिपाई लिंगाजी गुरव, आजगावकर सर यांचा भेटू जा. असा निरोप आला.मी बरं येतो असे म्हणून कपडे घालून जायचे असे ठरवत होतो.मनांत विचार आला "मंगलच्या"अभ्यासाबाबत बोलावले असेल. मी शाळेत गेलो. सकाळचे 10 वाजले होते. शिपायाने सर माडीवर आहेत म्हणून सांगितले. मी माडीवर गेलो. सर एकटेच पुस्तक वाचत बसले होते. मला पाहिल्यावर "या बसा" म्हणाले. घरची चौकशी केली, मंगलच्या अभ्यासा बद्दलही विचारले. आणि अचानक म्हणाले,"सद्या काय करता?" मी म्हणालो, "नुकताच बी.काॅम.झालो आहे. मला एम.काॅम. करायचे आहे. कोल्हापूरला पार्ट टाइम नोकरी मिळाली तर बरे होईल. ती पाहतो आहे. त्यांनी शांतपणे ऐकून घेतले. नवीन पुस्तके कोणती वाचली वगैरे गप्पागोष्टी झाल्या. चहा घेतला आणि सरांचा निरोप घेऊन निघालो. ही गोष्ट मी विसरून गेलो. पंधरा दिवसांनी एका सकाळी सकाळी बबनराव ठाकूर सर घाईघाईने मला बोलवायला आले. म्हणाले," चला लवकर,आजगावकर सरांनी बोलावले आहे. "मी आहे त्याच कपड्यांवर गेलो.सर एकटेच होते.मला पाहून ते बसा म्हणाले,. पाचदहा मिनिटे काहीच बोलले नाहीत. पुढे एवढेच म्हणाले,"कोल्हापूरला जावू नका. इथेच थांबा. व्ही.के.पाटील सरांना भेटा. ते सांगतील सगळे ".एवढे बोलून ते निघून गेले. थोड्या वेळानं पाटील सर आले.मला पाहून म्हणाले,"राजाभाऊ, आजपासून तुम्ही आता आमच्या परिवारात आलात.घरी जाऊन थोडे खाऊन या.प्रार्थना झाल्यावर मी सगळं सांगतो. " मला खरचं कांही कळेना. खूप आनंद झाला पण दडपणही आले. नवा अनुभव होता.मी घरी आलो. देवाला,आजीआजोबाना नमस्कार केला. सर्वांना खूप आनंद झाला. मी 10.45 वाजताच शाळेत आलो. सर्वजणं मला ओळखणारे होते.त्यांनाही आनंद झाला. आता मला सर्वजण" सर" म्हणू लागले.प्रार्थना झाल्यावर मला पाटील सर यांनी बोलावून घेतले, "तुम्ही इ.8वी,9वी समाजशास्र आणि 11वी चे स्पेशल नागरिक शास्त्र घ्या." "बबनराव, सरांना पुस्तके द्या.वेळापत्रक सांगा." पहिल्या दिवशी दोन तीन तास झाले. हीच माझ्या नवीन जीवनाची सुरुवात. आणि इथूनच पुढे मी सरांचे मार्गदर्शनाखाली शिक्षक म्हणून घडत गेलो. या 33/34 वर्षात खूप खूप शिकायला मिळालं. आदरणीय आजगावकर सर!एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व. सेनापती बापट एकदा म्हणाले होते की, "देशाचा संसार माझ्या खांद्यावरी एवढे तरी भान असू द्या हो!"याच भूमिकेत ते जगलेले आहेत. "साडेपाच-सहा फूटाची उंची, गव्हाळ रंग, बारीक शिडशिडीत बांधा ,सरळ नाक ,निळसर डोळे, साधारण उभटख चेहरा,पांढरे केस भूरुभुरू उडत असलेले, अंगात फुल्ल हाताचा शर्ट,पॅन्ट,आता अलीकडे नेहरू शर्ट आणि पायजमा पण खादीचं.असा पेहराव.अत्यंत मितभाषी पण विद्यार्थ्यात मनमोकळेपणाने गप्पामारणारे असे व्यक्तिमत्व. सर शिक्षकांशी सूचकतेने व कमीतकमी बोलणार पण त्यांच्या कामाकडे सूक्ष्म निरीक्षण करत मूल्यमापन करणार."गणित आणि इंग्रजी "हे त्यांचे आवडते विषय.एका ठिकाणी न बसता ते सतत फिरत असत. त्याफिरण्यातही त्यांचा कांही तरी हेतु असे.समाजातील शिक्षकांचे स्थान काय आहे. शाळेबद्दल लोक काय बोलतात याचे निरीक्षण करत शिक्षकांना मार्गदर्शन करीत असत. शिक्षकांच्या मनांत एक आदरयुक्त दरारा होता. आपल्या कृतीतूनच अनेकदा शिक्षकांना मार्गदर्शन करीत असत. एखाद्या शिक्षकाकडे एखादी गोष्ट सोपविली की ती उत्तमरितीने तो पार पाडणार याबद्दल त्यांना खात्री असायची. विश्वास असायचा. शिक्षकांची निवड करण्याची त्यांची पद्धतही अत्यंत वेगळी होती. ते शोध घेत असत.अनेक दिवस त्याचे निरिक्षण करत. त्याच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा अभ्यास करतील.आणि जेव्हा त्यांना असे वाटेल की,हा माणूस प्रामाणिकपणे कामकरीलच तसेच आपल्या कुटुंबीयांना मदत करेल,त्यांचा सांभाळ करेल.त्यांच्या एकदा घेतलेल्या निर्णयात कधीच बदल होत नसे. आणि तो निर्णय चूकतही नसे. साधारण 1975साला पर्यंत नेमून घेतलेले शिक्षक असे होते. विषज्ञानाबरोबरच त्याचे चारित्र्य, कामाविषयी प्रेम ,इत्यादी गोष्टी त्यांना महत्वाच्या वाटत. शिक्षकाची अभ्यासूवृत्ती, त्याचा ग्रंथसंग्रह याबद्दल ते आग्रही असत. शाळेत अनेक सहशालेय उपक्रम राबविले जात असत.त्याचा उद्देश, नियोजन, कार्यवाही, परिणाम याचा अभ्यास शिक्षकाने केला आहे का याचा ते बारकाईने विचार करीत. आपली शाळा ग्रामीण भागातील. गरीब कष्टकर्यांची मुलं शिक्षण घेताहेत. त्यांना शिक्षणाचा खर्च पडू नये .म्हणून त्यांना श्रमसंस्काराची सवय लागली पाहिजे. यासाठी सुगीच्या काळात मुलांनी सुट्टीच्या दिवशी शेतात काम करून मजुरी मिळवून शैक्षणिक खर्च आपला आपण भागवावा अशी त्यांची कल्पना असे.यातूनच श्रमाचे महत्व आणि स्वावलंबनाचे मूल्य शिकायला मिळाले पाहिजे असे त्याना वाटे. माझ्या नोकरीच्या पहिल्याच वर्षी 1972साली महाराष्ट्रात दुःष्काळ पडला होता.त्याच वर्षी महाराष्ट्र शासनाने नवा अभ्यासक्रम लागू केला होता. नवी पुस्तके आली होती.ती घेणे विद्यार्थ्याना खर्चिक होते.हे सर्व सरांनी पाहिले. त्यांची तगमग होत होती. पण स्पष्ट बोलत नव्हते. ते एक दिवस कोल्हापूरला गेले. मान.जिल्हाधिकारीसाहेबांना भेटले. सर्व परिस्थिती सांगितले. एक निवेदनही दिले. साहेबांनी शांतपणे निवेदन वाचले .सरांची तळमळ जाणली. नंतर ऊत्तूरच्या गाव तळ्याचा गाळ काढण्याचे काम मिळाले. त्यासाठी लागणारे साहित्यही मिळाले. ते कोल्हापूरहून आले. मिटींग घेतली आणि कामाचे नियोजन केले व त्याची व्यवस्थापक म्हणून सर्व जबाबदारी माझेकडे दिली.200 विद्यार्थी आणि 19शिक्षक सलग 19 दिवस गाळ काढण्याचे काम केले. शेवटी विद्यार्थी व शिक्षक यांना मजुरी म्हणून रूपये9000/ मिळाले. त्याची शालेय बचत बॅंकेची (संचयिका)स्थापना करून पैसे ठेवले.शिक्षकानी आपली मजुरी गरीब मुलांच्या करिता दिली. त्या वर्षाचा शैक्षणिक खर्चाची व्यवस्था झाली. मुलांना श्रमाचा आनंद मिळाला. पालकांना शैक्षणिक खर्चाचा भार पडला नाही याचा आनंद झाला. मी जबाबदारी चोख पार पाडली. माझे काम पाहून त्यांना समाधान वाटले. इथून पुढे अनेक वर्षे वेगवेगळ्या कामातून माझा विश्वास वाढत गेला. ही एकूणच माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट ठरली. या एका जबाबदारीने त्यांनी मला मी निवृत्त होईपर्यंत अत्यंत महत्त्वाची कामे सोपविली. मान.आजगावकर सरांचे पत्रलेखन अत्यंत काटकोर व मुद्देसूद असे. खूपविचार करून ते वाक्यरचना करीत असत. माझे अक्षर चांगले असल्यामुळे पत्रलेखनासाठी ते मलाच बोलवित. शासकीय अगर खाजगी अशी अनेक पत्रे मी लिहून दिली. त्यातून मला खूप शिकता आलं. शैक्षणिक कामाबरोबरच, सर,सामाजिक आणि राजकीय कार्यातही याच निष्ठेने काम करीत असत.विकास अर्बन को.ऑप.सोसायटी,जनता कुक्कुट पालन व दुग्ध व्यवसाय संस्था या संस्था त्यानी स्थापन केल्या.इथले कामकाजही तत्वनिष्ठ मूल्याना अनुसरूनच चालले होते. 1972/73 साली दुःष्काळी परिस्थिती मुळे शासनाकडे दाद मागण्यासाठी ऊत्तूर ते आजरा असा लाॅन्गमार्च काढावयाचे ठरले.शासनाला एक निवेदनही द्यावयाचे ठरले. ते अभ्यासपूर्ण निवेदन आजगावकर सर करणार होते. आदल्या दिवशी दुपारी सरांनी मला बोलावले व म्हणाले, "थोडे लेखन करावयाचे आहे "आपण चार वाजता बसूया. मी बरं अस म्हणालो. सरांनी सांगायचे आणि मी लाहायचे असा तो प्रकार होता. ते बोलत होते आणि मी लिहित होतो.संध्याकाळचे सहा वाजले. जवळ जवळ 32 पूर्ण आकाराची पाने झाली.दोघांनीही चहा घेतला. नंतर सर तपासायला बसले.त्यांचे समाधान होई पर्यंत ते सतत वाक्यरचना बदलायचे. नवीन भर घालायचे. शब्द ही बदलायचे. अस करत रात्रीचे 9 वाजले आणि फायनल ड्राफ्ट तयार झाला. आजगावकर सर म्हणाले, "सर, जेवून या. मग लिहून काढा. मी आणि सर जेवून आलो तेव्हा रात्रीचे 10 वाजले होते. त्यांच्या मनांत पुन्हा पुन्हा नवे नवे मुद्दे घोळत होते. त्यांनी ते पुन्हा ठीक ठीकाणी खुणा करून लिहिले आणि मला लिहा म्हणून सांगितले. रात्रीचे 11.30 वाजले होते आणि मी फायनल निवेदन लिहायला बसलो. झेराॅक्स, टायपिंग वगैरे सुविधा तेव्हा नव्हत्या.हातानेच लिहावे लागायचे. मला ती 35 पानांची पक्की प्रत तयार करायला रात्रीचे 2.30 वाजले. ती सरांनी अगदी बारकाईने वाचून पाहिली. छान झाले आहे म्हणाले. मला खूप आनंद झाला. सरांनी स्वतः चहा तयार करून मला दिला व आपणही घेतला.त्यानंतर मी दुसरी प्रत तयार करायला बसलो.डोळ्यात झोप मावत नव्हती.सरही जवळच बसले होते. बोटंही प्रचंड दुखत होती.त्याही अवस्थेत मी ती दुसरी प्रत तयार केली तेव्हा पहाटेचे 5.30 वाजले होते. दोघांनाही क्षणभर ही झोप घेता आली नाही.....सर म्हणाले,नाईक सर आता इथच थोडावेळ झोपा. नंतर चहा घेऊन घरी जा. साडे सहा वाजता गुरव शिपाई आला .त्याला चहा आणायला सांगितले. दोघांनीही चहा घेतला आणि मी घरी आलो. सकाळी 7 वाजता लाॅन्गमार्चला सुरूवात व्हायची होती. अशी ही निवेदनाची कथा. शब्द किती तोलून मापून वापरायचे असतात हे मी त्यांच्याकडून शिकलो. चिकाटीने घेतलेले काम कसे पूर्ण करायचे तेही मी शिकलो. स्वावलंबन हा त्यांच्या आचरणाचा अविभाज्य भाग होता.त्यांना स्वयंपाकही छान करता येत होता......."मेतकूट "आंणि "डांगर"हे त्यांचे आवडते पदार्थ. हे पदार्थ ते स्वतः करीत असत. डाळ आणण्या पासून सर्व कांही ते स्वतःच करीत.तयार झाले की आपल्या परिचित मित्रांना पाकिटे करून देत असत.कधी कधी आम्हा शिक्षकांना देत असत. एकदा सुप्रसिद्ध विचारवंत नानासाहेब गोरे यांनी शाळेला भेट दिली. तेव्हा लक्षात ठेवून त्यांना पुरणपोळी खायला घातली. थोर शिक्षणतज्ज्ञ ,माजी शिक्षण संचालक वि.वि.चिपळूणकर हे सरांचे गुरू. आपल्या विद्यार्थ्याची शाळा पहायला आले, सोबत महाराष्ट्रातील सर्व शिक्षणाधिकारी यांना ही घेऊन आले. त्यांचा यथोचित सन्मान व पाहुणचार करण्यासाठी सर स्वतः डोळ्यांत तेल घालून धावपळ करीत होते. आणखी एकदा तत्कालीन शिक्षण मंत्री प्रा.सदानंद वर्दे साहेब शाळा पहायला आले. त्यावेळी सुद्धा सर पडद्यामागे राहून त्यांची सेवा करीत होते.श्रेयासाठी धडपड करायचे हे त्यांच्या रक्तातच नव्हते. एस.एस.सी.चे विद्यार्थी वर्षभर अभ्यासात स्वतःला गुंतवून घेतात. त्यामुळे ताण आलेला असतो तो हलका व्हावा म्हणून दोन दिवसांची एक छोटीशी सहल दर वर्षी आंबोली या ठिकाणी काढली जात असे.या दोन दिवसात मुलांनी मोकळे पणाने हिंडावे, खेळावे आणि इकडे शिपायाना घेऊन सर स्वयंपाक करत असत. आपल्या सहकारी शिक्षकांवर त्यांचा प्रचंड विश्वास होता. आपल्या शाळेत विविध क्षेत्रातील नामवंत मंडळींना निमंत्रित करून त्यांच्याशी विद्यार्थी व शिक्षकांची भेट घडवून द्यावयाची. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ सर्वांना व्हावा हीच तळमळ होती.त्यांच्यामुळेच फार मोठी माणसे आम्हाला ऐकायला व पाहायला मिळाली. त्यात-नानासाहेब गोरे,एस.एम.जोशी, यदुनाथजी थते,राजाभाऊ मंगळवेढेकर, प्रा.ग.प्रा.प्रधान, शाहिर लिलाधर हेगडे,प्रा.वसंत बापट,माधव कोंडविलकर,प्रा.मधु दंडवते, प्रमिलाताई दंडवते,लक्ष्मण माने, राम गोसावी, बाबा आढाव, प्रा.नरेंद्र दाभोलकर, बाबासाहेब पुरंदरे, प्राचार्या लीलाताई पाटील इत्यादी. या पाहुण्यांची शिस्त, पाहुणचार, स्वतः करणार. ही सेवावृती त्यांनी आयुष्यभर जोपासली. सरांना महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार व फाय फौंडेशनचा हे प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले.पण त्यांचा साधेपणा आहे तसाच आहे. मी यापूर्वी म्हणालो त्याप्रमाणे अनेक गुणवंत शिक्षकांना आपल्या शाळेत आणले ते सन्मानपूर्वक. त्यामुळेच शाळेचा नावलौकिक वाढला आहे. त्यात प्रसिद्ध विचारवंत दत्ता सावळे, दत्ता बुवा, शशिकांत महाडेश्वर, ए.के.कुलकर्णी, भरत लाटकर, गांधीवादी विचारवंत दिवाकर हरिदास, सुनीलकुमार लवटे ,व्ही. के.कुलकर्णी, श्रीमती .सुलभाताई पाटील, श्रीमती शोभा दिक्षीत, एस.एम.खन्ना , भि.द.ढोणुक्षे ,टी.के.पाटील. चिंचणीत, परूळेकर गंगाराम राजाराम, लुद्रीक ,अशी किती नाव सांगावीत. यांच्यामुळे अनेक पिढ्या घडल्या. शेखर कासारसर, वसंतराव पाठक सर ही खास मित्र मंडळी असे मधे येऊन मुलांना मार्गदर्शन करीत असत ते केवळ आजगावकर सर यांच्याप्रेमामुळे. श्रीमती आजगावकर बाई अकाली गेल्या. सर एकटे पडले. त्यांची आपल्या आईवर अपार श्रद्धा. पण वयोमानपरत्वे त्याही गेल्या.त्यांचे एकटेपण जरा वाढले. आता ते शाळेच्या दुसर्या मजल्यावर दोन खोल्यात राहतात.आता ते विरक्तीकडे झुकले आहेत. "इदं न मम"-यावृत्तीने ते जीवनाला सामोरे जातात. आपली निष्ठा, साधेपणा त्यांनी सोडलेला नाही. आता काळ बदलला, शिक्षणक्रमातही बदल झाला आहे. पिढीचं अंतर पडलं आहे.....आपले जिवाभावाचे सहकारी वसंतराव पाटील, डी.डी.कांबळे, डाॅ.सु.ब.देशमाने, चंद्रकांत केसरकर, शशिकांत महाडेश्वर, राजाराम सर ,आपल्याला सोडून गेले याची खंत त्यांना वाटत असते. पण ते बोलून दाखवत नाहीत. ती मनात ठेवतात. मला आठवण आली की मी भेटायला जातो . सोबत माझी पत्नीही असते. आता त्यांना ऐकायला कमी येते.अशक्तपणाही आहे. पण भेटल्यावर त्यांना समाधान वाटते हे त्यांच्या चेहर्यावर दिसते. अर्धातास बसून खुशाली विचारून जायला निघतो. आम्ही दोघेही वाकून नमस्कार करतो. दारापर्यंत पोचवायला आधाराने येतात तेव्हा मन गलबलून जाते. त्यांना माझ्याबरोबर बोलायचे असते . पण त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे ते कमी बोलतात पण "शब्देविन संवादु " सतत चालू असतो.त्यांच्याबद्दल लिहायचं म्हणजे खूप लिहावे लागेल. माझ्या जडणघडणीत त्यांचा वाटा मोठा आहे. पाय उचलत नाही. पुन्हा येतो असे कसे बसे म्हणतो तेव्हा डोळ्यांत अश्रू उभे राहिलेले असतात. या ऋषीवर्यास माझे कोटी कोटी प्रणाम!ते शतायु होवोत अशी परमेश्वरचरणी मी प्रार्थना करीत आहे.
-प्रा. श्रीकांत नाईक
गडहिग्लज, जि. कोल्हापूर (9405039500)



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा