आठवणीतली माणसं ‐ 13

ध्येयवादी शिक्षकाचे मूर्तीमंत प्रतीक असणारे - गुरूवर्य सी.एम.कुलकर्णी सर




    आमचा माध्यमिक शिक्षणाचा काळ हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा पहिल्या दशकाचा काळ होता.म.गांधीजींनी त्याकाळातील तरूणांना आदेश दिला की, खरा भारत खेड्यात आहे.म्हणून तुम्ही खेड्याकडे चला. त्याप्रमाणे गांधीजींच्या विचारानेच प्रभावित झालेली शेकडो तरूण मंडळी खेड्याकडे निघाली.त्यातली काही शिक्षण क्षेत्रात गेली. अशा शिक्षण क्षेत्रातील मंडळीनी आमचे आयुष्य ही बदलून टाकले.आपले शुद्ध आचरण,ज्ञानलालसा, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे आमचे आदर्श बनले. अशा आदर्शापैकी एक म्हणजे आदरणीय सी.एम.कुलकर्णी सर होत. सरांची आठवण निघाली की मला एक फार छान कविता आठवते. गाणेच म्हणा ना. साधारण पन्नासवर्षापूर्वी पुण्यातल्या महर्षि कर्वे यांच्या हिंगण्याच्या आश्रमात महाराष्ट्रातील माध्यमिक शिक्षकांचे दहा दिवसांचे शिबीरे होते. त्याला मी आणि माझे सहकारी श्री.लुद्रीक सर असे दोघे गेलो होतो. राजाभाऊ मंगळवेढेकर, शामला वनारसे, मामा क्षीरसागर, शांताबाई किर्लोस्कर आणि राजगुरु आदी नामवंत मार्गदर्शन करण्यासाठी आले होते.ते दहा दिवस अत्यंत भारलेले होते. त्यात " लावियला दीप "या तारा परांजपे यांच्या गीताने शिबीराची सुरूवात व्हायची. ते गीत असे होते, 

"लावियेला दीप" 

लावियेला दीप प्रेमे, तेवता ठेवू चला/बालकांच्या उन्नतीचा, मार्ग हा चालू चला //धृ// 

नंदादीप इथे,मंदिरी शांत/ज्योत ज्ञानाची, तेवते त्यात/झाडुनिया काजळीला, वात ही सारू चला //1// 

बीज जे अपुल्या, लाभले हाती/सुप्त त्या माजी, ईश्वरी शक्ती/प्रेम सिंचन नित्य करोनी,वृक्ष हा हा सजवू चला//2// 

आज ही कलिका, भासते मुग्ध/अंतरी दिव्य, साठवी गंध/पसरायाते परिमळ जगती, पुष्प हे फुलवू चला//3//

हिंद मातेचे हे हिरे मोती, /दौलत राष्ट्राची,/आपुल्या हाती/रक्षण,वर्धन,दौलतीचे, /ध्येय हे साधू चला//4//

ताराबाई परांजपे. हे प्रत्येक शिक्षकाचे ध्येय गीत असले पाहिजे हे आमच्या मनावर ठसवून सांगितले होते. ते सर्व आठवले आणि मन भूतकाळात गेले. आम्हाला लाभलेले शिक्षक हेच तर आमच्यासाठी करीत होते.अगदी मनापासून. अशा मनस्वी शिक्षकामधील ज्येष्ठ शिक्षक म्हणजेच आमचे आदरणीय "सी.एम.कुलकर्णी सर "होत. सर,आमच्या शाळेतील सर्वात ज्येष्ठ शिक्षक होते.एक आदरयुक्त दरारा होता शाळांवर.पण ते कधी कोणावर ओरडले नाहीत की कधी छडीचा मारही कधी कोणाला दिला नाही. पण अत्यंत स्नेहार्द्र नजरेने त्यांनी विद्यार्थ्यांना पाहिले हे विशेष. कुलकर्णी सर हे उंचीने बेताची म्हणावी अशी पाच फूटाची. बारीक अंग काठी, सरळ नाक, निम गोरा रंग ,तांबूस रंगाच्या फ्रेमचा असलेला चष्मा, नेहरू शर्ट, धोतर वर जॅकेट, गांधी टोपी, हातात छत्री,नाकासमोर सरळ चालण्याची पद्धत. तसे मितभाषी पण वर्गात शिकवताना चांगलेच खुलायचे .त्यांची दिनचर्या अगदी आखीव रेखीव होती.टापटीपीचे वागणे .वक्तशीरपणा तर इतका की त्यांच्याकडे पाहूनच कुणीही आपले घड्याळ लावून घ्यावे. एक मिनिटांनी ही फरक पडणार नाही. ते नेहमी एका छोट्या मोपेडवरून जायचे.,पण पुढे पुढे ते पायीच जाता येता दिसायचे. ते आम्हाला "इतिहास-भूगोल-नागरिक शास्र "शिकवायचे.या विषयात त्यांचा हातखंडा होता. भूगोल शिकवायला लागले की ते खूप रंगून जायचे. त्यातला नैसर्गिक भूगोल त्यांनी अप्रतिम शिकवला."खारेवारे-मतल्ई वारे" व त्यांची दिशा शिकवत असतांना नकाशाकडे त्यांचा हात पोचत नसे. तेंव्हा ते टाचा उंचावून उडी मारून दोन्ही हात उंचावून नकाशातील दिशा दाखवायचे तेव्हा मोठी गंमत वाटायची. पण हे सगळे ते रंगून शिकवायचे.इतिहासातील सनावळ्या त्यांनी आम्हाला लक्षात ठेवण्याची युक्तीही सांगून ठेवली होती. आजही ही गोष्ट लक्षात राहिली त्याचे कारण म्हणजे त्यांची तळमळ. आम्हाला गृहपाठाच्या वह्या तपासल्या की ते छान शेरा द्यायचे त्यामुळे आम्हाला हुरूप यायचा.त्यांचे शाळेतील व समाजातील वागणे हे अत्यंत अनुकरणीय असे असायचे. समाजातील त्यांचा वावर अत्यंत आदर्श होता.ते गावचे वतनदार कुलकर्णी होते.पण आपल्या सौजन्यपूर्ण वागण्याने त्यांनी गावात आदराचे स्थान निर्माण केले होते.अनेक सामाजिक घडामोडीत त्यांचा सल्ला अत्यंत मोलाचा असायचा. मग तो शंकराचार्य मठातील सांस्कृतिक कार्यक्रमाबद्दल असो की गावपातळीवरील एखाद्या घटनेबद्दल असो. संकेश्वरला 63 वर्षांनी 1983 साली श्रीमहालक्ष्मी यात्रा करण्याचे ठरले तेव्हा या यात्रेसंबंधीची जुनी कागदपत्रे त्यांच्या जवळ होती ती तपासून त्याचा अर्थ लावून ही परंपरा सुव्यवस्थितपणे चालू केली. प्रदीर्घ काळ यात्रा झाली नसल्यामुळे या परंपराही कोणाला माहित नव्हत्या.63वर्षांपूर्वी ची यात्रा पाहिलेले कोणी हयातही नव्हते.अशा वेळी कुलकर्णी सरांचा सल्ला लोकांनी मानला हे त्यांच्या ठिकाणच्या ऋजु स्वभावाचे दर्शन घडविणारे होते. त्याच प्रमाणे "कल्याण सेवक स्वामी महाराज "यांच्या समाधी नंतर या पीठावर कोणी शंकराचार्य नव्हते .त्याकाळात या देवस्थानची सेवा करून परंपरा चालवण्यासाठी जी समिती नेमली त्या समितीचे प्रमुख या नात्याने कुलकर्णी सरांनी ही धुरा यशस्वीरित्या सांभाळली. शाळा आणि समाज या दोन्ही स्तरांवर सरांनी आपले कौशल्य पणाला लावून समन्वय साधला होता हा मोठा आदर्श आमच्यासमोर होता.हे सर्व पाहतांना कुलकर्णी सरांचेमधील परिपूर्ण आदर्श शिक्षकाचे रूपच आम्हाला दिसले.ते नुसते शिक्षक नव्हते तर ते लोकशिक्षक होते. मला आठवलं बी.एड.चं वर्षं. तेव्हां शिक्षणाच्या व्याख्या पाठ कराव्या लागत. "बीड" नावाचा शिक्षणतज्ज्ञ म्हणतो,,"शिक्षण म्हणजे विश्वाच्या उभारणीची योजना होय." तर टाॅमस हक्सली या शिक्षणतज्ज्ञाने लिहिले की,"सर्वांग सुंदर जीवन जगण्याची तयारी म्हणजे शिक्षण होय." त्यापूर्वी प्लेटो या जगद्विख्यात तत्वज्ञाने सांगितले की,"सत्य,शिव,व सुंदर ही जी जीवनाची अंतिम मूल्ये आहेत ,ती समजण्याची व अनुभवण्याची पात्रता मनुष्याला आणून देते ते शिक्षण होय.""युनेस्को "ने ही शिक्षणाबद्दल म्हटले आहे की, " जीवनाच्या सर्व व्यवहाराकरिता महत्वाचे असणारे ज्ञान, कौशल्य, व जाणीव संक्रमित करणारे संघटित सातत्याचे अध्यापन म्हणजे शिक्षण. होय". या सर्व व्याख्यांचे सार काढले तर " बालकांचा सर्वांगीण विकास करणे "हे ध्येय शिक्षकाचे असले पाहिजे असेच त्याकाळातील शिक्षक मानून काम करीत असत.ही निष्ठा होती ,ध्यास होता.तो आचारधर्मही होता.अशी शिक्षक मंडळी आम्हाला लाभली होती. त्यातलेच एक म्हणजे आदरणीय सी.एम.कुलकर्णी सर. माझ्या 35 वर्षाच्या अध्यापनाच्या काळात या सर्व शिक्षकांना डोळ्यांसमोर ठेवूनच थोडेसे काम माझ्या हातून झाले असे वाटते. अशा थोर गुरूवर्यांच्या सहवास लाभला.संस्कार मिळाले, ही खरी श्रीमंती मला मिळाली.कुलकर्णी सर कधी कधी वाटेत भेटले की ,नेमकेपणाने चौकशी करायचे.प्रगती समजावून घ्यायचे.त्यांचा आमच्या कुटुंबाशी गाढ स्नेह होता. मी शिक्षक झालो याचा त्यांना खूप आनंद झाला. कधी कधी वाटून जाते की खरोखरच आपण चांगला शिक्षक झालो का? त्या त्या वेळी ही सर्व गुरूजन मंडळी डोळ्यांसमोर उभी राहतात. आणि वाटते की मला ती धीर देत आहेत .हीच शक्ती मला बळ देते. ,या सर्व आठवणी आज जाग्या झाल्या. त्या कुलकर्णी सरांचे निमित्ताने. कुलकर्णी सरांना दीर्घायुष्य लाभले होते. त्यांच्या स्मृतीला माझी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तस्मै श्री गुरूवे नमः// 


-प्रा.श्रीकांत नाईक 

गडहिग्लज जि कोल्हापूर

(9405039500)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आठवणीतली माणसं - 17

समाजसेवेचा वसा आणि वारसा जपणारे उमेशराव आपटे !

आठवणीतील माणसं - 5