आठवणीतील माणसं - 5

निर्मळतेचा झरा -- गुरूवर्य प्रा. विठ्ठल बन्ने !!! 



    1960/61 चा काळ असावा. आजरा तालुक्यातील "ऊत्तूर" या छोट्याशा गावात राष्ट्रसेवादलाच्या पदवीधर मित्रांनी "ऊत्तूर विद्यालय ऊत्तूर" या माध्यमिक शाळेची स्थापना केली. त्यावेळची प्रतिकूल परिस्थिती ,शाळा चालविण्यासाठी अनेक तडजोडी कराव्या लागायच्या, पण हे सर्व करण्यात एक आनंद होता.त्याचे कारण म्हणजे एकतर हे सर्व मित्र पू.साने गुरुजींच्या व राष्ट्रसेवादलाच्या विचाराने भारलेले होते. त्यांना मदत करायला जिल्ह्यातून मित्रमंडळी येत असतजमेल त्यापद्धतीने हातभार लावत होते.या सर्व तरूण मित्रांच्यापुढे "गांधीजींच्या खेड्याकडे चला" या मंत्राने भारावलेले विश्व होते.असेच एकदा एप्रिल महिन्यात ऊत्तूरला "शिक्षक-विद्यार्थी-पालक "यांचा मेळावा "आयोजित केला होता .खेड्यापाड्यातील शेतकरी, अडाणी पालक आपल्या मुलांसाठी आलेले होते.सगळी तयारी झाली आणि एवढ्यात, एक "साडे पाच ,सहा फूट उंची ,गव्हाळ रंग, गोल चेहरा, विलक्षण बोलके डोळे, अंगात सळसळणारा उत्साह ओसंडून वाहत होता असे ते गृहस्थ बोलायला ऊभे राहिले. सुरूवातीलाच त्यांनी " सदैव सैनिका पुढेच जायचे" गीत सर्वांकडून म्हणून घेतले. त्यात पालकही सामिल झाले. सभागृहात एक एक उत्साहाची लाट पसरली. सर्वजण कान टवकारून ऐकू लागले. पालकांना आपल्या मुलांचं कल्याण करणारं अस काहीतरी ऐकतो असं वाटत होतं. मुलांना नव काही तरी केलं पाहिजे असं वाटतं होतं. शिक्षकांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून देत होतं. वक्ता एकच पण तो बोलत होता ते सर्वांसाठी. किती विलक्षण आनंदायक अनुभव होता तो. पुढच्या काळात अनेक व्याख्याने मी ऐकली. त्या तासाभराच्या व्याख्यानात खळखळून हसविणारा विनोद होता.पालकांशी हितगुज होते.सहकारी शिक्षकांना जागं करणारी ताकद होती. पालकांना शाळा आपल्याच मुलांचं कल्याण व्हावं म्हणून सुरू झाली आहे हा विश्वास होता. त्यांनी त्याच ठिकाणी भरभरून मदत करण्याचे आश्वासन दिले.सभा संपली. मी भानावर आलो. नंतर मला कळले हेच ते सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते प्रा.विठ्ठल बन्ने. मी पाहतच राहिलो. ही माझी त्यांची पहिली भेट. पुढे ते महाविद्यालयात माझे शिक्षक म्हणून भेटले. गुरूशिष्य या पलीकडे जाऊन आमचे ऋणानुबंध होते. ते अखेरपर्यंत होते. " देवदासी चळवळीचे अग्रणी "ही त्यांची राष्ट्रीय स्तरावरील ओळख. ऊत्तूरला अधून मधून यायचे मुलांना गोष्टी सांगायचे. ऊत्तूर नंतर गडहिग्लजला महाविद्यालयात मी त्यांचा विद्यार्थी म्हणून मला सहवास लाभला.पन्नास-पंचावन च्या दशकात कोल्हापूरच्या सुप्रसिद्ध राजाराम कॉलेजमध्ये शिकत असताना "मराठी" व "संस्कृत" या विषयांचा त्यांनी व्यासंग केला. महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांनी कोल्हापूरला एका मुलींच्या हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणून नोकरी सुरू केली. कांही दिवसानंतर "पहिले ज्ञानपीठ पुरस्कार "प्राप्त कादंबरीकार" वि.स. तथा भाऊसाहेब खांडेकर अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या "आंतरभारती हायस्कूल, कोल्हापूर येथे शिक्षकाची नोकरी स्विकारली. प्रा.बन्ने सर जन्मजात कलावंत होते. त्यांना राष्ट्रसेवादलाच्या सांस्कृतिक चळवळीची जोड मिळाली आणि त्यांच्यातला कलाकार बहरून आला. कोल्हापूर च्या वास्तव्यात तेव्हा मेळे, सांस्कृतिक कार्यक्रम, शिबीरे. काॅलेजची गॅदरींग अशा अनेक ठिकाणी प्रा.बन्ने सर असणारच. हे ठरूनच गेले होते. अनेक नाटकातून आपल्या अप्रतिम अभिनयाने त्यांनी रसिकांना वेडं लावलेले होते. राष्ट्रसेवादलाच्या गाजलेल्या पु.ल.देशपांडे यांच्या "पुढारी पाहिजे "या वगैरे नाट्याचा प्रयोग त्यानी "गडहिग्लजला " आपल्या मित्रांना घेऊन "सुभाष चित्र मंदिरात " सादर केला. अलोट गर्दी जमली होती. त्यातल्या "रोंग्याची " मुख्य भूमिका स्वतः प्रा.बन्ने सर यांनी केली होती. अत्यंत अविस्मरणीय अनुभव होता तो. राष्ट्रसेवादलाच्या चळवळी, शाखा,समूह गीते गायन, शिबीरे, यातून या अवलियाची ओळख दृढ होत गेली. आणि पुढे महाविद्यालयात ते मराठीचे प्राध्यापक म्हणून आले. इथूनच आमचे ऋणानुबंध दृढ होत गेले.ते अखेरपर्यंत.काॅलेजच्या पहिल्या दोन वर्षानंतर मी काॅमर्स विभागाकडे गेलो. मग काॅलेज सुटल्यावर सेवादल छात्रभारती च्या कामातून सरांशी संपर्क कायमच राहिला.सरांच्या सहवासात मला त्यांनी "समाजभान "दिले. त्याचप्रमाणे त्यांच्या ठिकाणी असलेली "विद्यार्थी निष्ठा"मला फार महत्वाची वाटते. मला शिक्षक म्हणून ती आयुष्यभर मार्गदर्शन करीत राहिली आहे. आपल्याप्रमाणेच कष्टाने शिकणार्या मुलांचे शिक्षण अर्धवट राहू नये. म्हणून सर डोळ्यांत तेल घालून लक्ष देत असत.अडलेल्या विद्यार्थ्यांना मदत करणे, तसेच अन्यही कांही मदत करणे असे त्यांचे आयुष्यभर चालले होते. अशी मदत त्यांनी किती जणांना केली हे सांगता येत नाही.सरांच्या ठिकाणी असलेला नैसर्गिक ऊत्साह आम्हां विद्यार्थ्यांना प्रेरणादायी होता.यातूनच एकदा आपण "किल्ले रायगडची " सहल काढायची अशी कल्पना त्यांना सुचली. पाहता पाहता 80 विद्यार्थी तयार झाले. सर मला म्हणाले, श्रीकांत नाईक, "नुसतं पिकनिक करून यायचं नाही. आपल्याला रायगडचा इतिहास जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. ते रोमांचकारी अनुभव ऐकायचे आहेत. त्यासाठी इतिहासाचे जाणकारांनी आपल्याला मार्गदर्शन करायला हवे. तू ठरव व सांग.त्याचप्रमाणे नियोजन करूया. "सुप्रसिद्ध कादंबरीकार, इतिहासकार ,शिवभक्त गो.नी. दांडेकर "यांना संपर्क साधून विनंती करावी असे ठरले. मलाच ते काम सरांनी दिले. मी "गो.नी.दांडेकर "यांना पत्र लिहून विनंती केली. त्यांनी लागलीच संमती दिली. नियोजन केले .ठरल्याप्रमाणे सहल निघाली. "रायगड"च्या पायथ्याशी रात्री 10वाजता पोचलो. बन्ने सरांची आणखी एक कल्पना होती की रात्री हातात मशाली घेऊन ,"हर हर महादेव, छ.शिवाजी महाराज की जय " अशा घोषणा देत गडहिग्लज चढायचा. त्याकाळातील मावळ्यांना कसा अनुभव आला असेल याची कल्पना करायची. त्याप्रमाणे आम्ही मध्यरात्री निघालो ते पहाटे पाच वाजता गडावर पोचलो. "गो.नी.दांडेकर " आदल्या दिवशी च तिथे पोचले होते. आम्ही थोडी विश्रांती घेतली आणि "गो.नी.दा.तथा आप्पा "यांचे बरोबर गड पाहायला निघालो. तहान भूक हरपून उत्स्फूर्तपणे पाहत होतो.,ऐकत होतो. सर्वजण भारावलो होतो. असा एक अनुभव सरांच्यामुळे मिळाला.तो आजही आठवतो. अशा अनेक आठवणी मी जपून ठेवल्या आहेत.पुढे पदवीनंतर मी "ऊत्तूर विद्यालय ऊत्तूर "येथे शिक्षकाची नोकरी स्विकारली. सरांच्या भेटी कमी झाल्या. मधल्या काळात सरांच्या सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय कामाचा पसारा खूपच वाढला. इकडे मी शिक्षक झाल्यावर "फक्त शिक्षण व विद्यार्थी निष्ठा "यावरच लक्ष केंद्रित करावयाचे ठरविल्यामुळे मला त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणे जमेना. हे त्यांनी जाणले होते. आमचे ऋणानुबंध दृढ होत गेले ते अखेरपर्यंत राहिले.सरांच्या कामाची व्याप्ती दिवसे दिवस वाढत होती देवदासी चळवळ, भटके, विमुक्त, यांच्या न्यायासाठी मोर्चे,आंदोलने,उपोषणाला, जेलभरो अशी अनेक आंदोलने सरांनी न थकता केली. " सेनापती बापट, म्हणत, "देशाचा संसार माझ्या खांद्यावरी /एवढे तरी भान राहू द्या हो / " बन्नेसरांनी आयुष्यभर हेच केले. आपल्या सामाजिक चळवळीला बळ मिळावे म्हणून त्यांनी राजकारणात ही भाग घेतला. देवदासी हा समाजाला लागलेला कलंक आहे. तो पुसला गेला पाहिजे यासाठी त्यांनी अखेरपर्यंत लढा दिला. भारतभर हिंडले. शासनाचे दरवाजे ठोठावले. अखेरीस सन 2005साली "देवदासी निर्मूलन कायदा मंजूर झाला." पण प्रत्यक्षात देवदासीना सन्मान मिळत नाही तोपर्यंत लढत राहायचे हात्यांचा दृढ निश्चय होता .तो शेवट पर्यंत राहिला.गेली जवळ जवळ चाळीस/पंचेचाळीस वर्षे झाली मी त्यांच्या सहवासात आहे.मला सतत असे जाणवत आले आहे की," सरांच्या ठिकाणी एक खेळकर,खोडकर मूल लपलेले आहे. त्यामुळे ते कधी निराश झाले नाहीत. आपली स्वाभाविक नारागसता त्यानी कधी सोडली नाही ."मूलांत मूल.आणि मोठ्या मोठं असा खेळ ते खेळत असत. निखळ आनंद देणारा विनोद ते करीत.आयुष्याला सकारात्मकतेने सामोरे कसे जायचे ते त्यांच्याकडून शिकावे.पू.सानेगुरुजी हे दैवत आणि सेवादलाचा विचार ही निष्ठा घेऊन ते आयुष्यभर जगले.त्यासाठी त्यांनी तडजोड केली नाही. हे एक प्रकारचे वेडच .पण अशी जगावेगळी वेडी माणसेच समाजासाठी काही तरी करू शकतात. असे माझे गुरूवर्य प्रा.बन्ने सर.सामाजिक चळवळीतील एक राष्ट्रीय किर्तीचे म्हणून त्यांना ओळखले जाते. मी गेल्यावर्षी अमेरिकेला (शिकागोला)गेलो होतो. तेथे सरांच्या दुखःद निधनाची बातमी वाचली आणि धक्काच बसला होता. आपल्या जीवनातील काही हरवलं हीच भावना झाली. आज 18 ऑगस्ट त्यांची पहिली पुण्यतिथी!! त्यांच्या स्मृतीला माझी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो !!!!! 

-प्रा. श्रीकांत नाईक

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आठवणीतली माणसं - 17

समाजसेवेचा वसा आणि वारसा जपणारे उमेशराव आपटे !