आठवणीतली माणसं - 9

आमच्या शाळेचा जागल्या - श्री. बबनराव ठाकूर!




कधी कधी मी एकटाच असतो तेव्हा आपल्याला भेटलेल्या माणसांचे नमुने आठवून अचंबित होतो.किती वेगवेगळे स्वभावधर्म असलेली माणसें . पराकोटीचा द्वेष करणारी, तर कधी म्ऊमुलायम स्वभावाची असतात कांही कांही परोपकारी गंपू सारखी असतात. कांही मनांनी कणखर असतात. कधी छोट्याशा प्रसंगानं हळवी होणारी असतात. परखडपणे बोलणारे पण अंतरंगी फणसासारखे रसाळ असतात. अशा विविध रंगी, नाना कळा असलेल्या माणसांत एक माणूस माझ्या मनांत कायम लक्षात राहिलेला आहे.तो आपल्या आयुष्याचा भाग झालेला आहे. तसेच तो आमच्या शाळेच्या जीवनातील अविभाज्य घटक झालेला आहे. शाळेचा रखवालदारच (जागल्या ) म्हणा ना!!कुणीही न सांगता सर्वांच्या हाकेला धावून जाणारा असा हा हवाहवासा वाटणारा माणूस म्हणजे आमचे बबनराव ठाकूर. मुलांचे लाडके ठाकूर सर. या माणसाची माझी भेट झाली ती जवळ जवळ पन्नास वर्षांपूर्वी 1965/66 साल असावे.मी गडहिग्लजला काॅलेजला होतो. आठ पंधरा दिवसांनी सुट्टी मिळाली की ऊत्तूरला आजोळी येत असे. डिसेंबर महिना होता. थंडीचे दिवस होते. आमच्या आजोबांच्या घरी माडीवर ऊत्तूर विद्यालयातील दहावीचे विद्यार्थी अभ्यासाकरिता राहत असत.दळणवळणाची साधने उपलब्ध नव्हती. शिवाय शाळेचा नियमच होता. असेच आजूबाजूच्या परिसरात विद्यार्थी राहत होते. असेच एके दिवशी पहाटे साडेचार वाजता चावडीच्या मैदानावर बिगुल वाजू लागला. तेव्हा ऊत्तूर लहान होते. गांव शांत झोपलेले होते. बिगुल वाजल्या बरोबर विद्यार्थी खडबडून जागे झाले. भराभरा तोंड धुवून विद्यार्थी दहा मिनिटात मैदानावर हजर. मलाही कुतूहल वाटत होतं. म्हणून मीही मैदानावर गेलो तेथे एक स्काऊटच्या वेषातला प्रौढ तरूण ऊभा होता.सर्व मुलं जमल्यावर हजेरी घेतली. त्या नंतर शाळेची प्रार्थना झाली. मग अर्धातास वार्मींग अप व्यायाम झाला आणि मुलांना अभ्यासाला सोडले. यावेळी मुख्याध्यापक श्री.आजगावकर ही उपस्थित होते.हे सगळं करून घेणारा तरूण म्हणजेच आपले बबनराव ठाकूर. त्यांचे मूळ नांव निवृत्ती लक्ष्मण ठाकूर. पण ते बबनराव ठाकूर सर म्हणूनच सर्वांना परिचित. साधारण पाच फूट चार इंच उंची. गोल चेहरा, गव्हाळ रंग, अकाली पांढरे झालेले केस सरळ मागे विंचरलेले थोडेसे स्थूल. पण सळसळता उत्साह. त्यांचेकडे हा विभाग कुणी सोपवला नव्हता. पण राष्ट्रसेवादलाचे संस्कार झालेले. त्यामुळे त्यांच्या रक्तातच हा भाग आलेला आहे. ते स्काऊटमास्टर होते. याच शाळेचे माजी विद्यार्थी. त्यांचे मुख्य काम म्हणजे लेखनिक. पण त्यांच्या उत्साहामुळे त्यांना अनेक भूमिका निभवाव्या लागत.आमच्या संस्थेचे अध्यक्ष डाॅ.देशमाने साहेब,व मुख्याध्यापक श्री.आजगावकर सर यांचे स्वीय सचिव म्हणून कामे करावी लागत.शाळा नव्याने सुरू झाली होती. बाल्यावस्था होती जडणघडण सुरू होती. नवे नवे प्रयोग सुरू झाले होते. शिक्षक जीव तोडून शिकवायचे व पडेल ते काम करायचे. यामुळे एक कडक शिस्तीची आणि उपक्रमशील शाळा म्हणून शाळेचा जिल्ह्यात दरारा निर्माण झाला होता. सर्व शिक्षकही ध्येयवादी होते. सर्वांची राहणी अगदी साधी. शाळा हे सर्वांचे केंद्र. दिवसाचे जवळ जवळ 15/16 तास शिक्षक व कर्मचारी एकत्रच असत. या सर्वांना बांधून ठेवणारा दुवा म्हणजे आमचे बबनराव ठाकूर सर.विद्यार्थ्यांना युनिफॉर्मही पांढरा शर्ट, खाकी हाप पॅट व डोक्यावर गांधी टोपी. तर मुलींसाठी पांढरे पोलके व हिरवा परकर असा ठरलेला होता. सुरूवातीला गडहिग्लजला एस.एस.सी.परीक्षा केंद्र असायचे. याची व्यवस्था पाहणे, त्यांना मदत करणे यासाठी शिक्षक धडपडत असत त्याना सहकार्य ठाकूर सरांचे असायचे. अनेक वर्षे आमच्या मुलांचा केंद्रावर प्रभाव असायचा. अधिकारी केंद्र पाहायला आले की ते आमच्या विद्यार्थ्यांना कधी तपासत नसत कारण गांधी टोपी घालणारी मुलं काॅपी करणारच नाहीत असा दबदबा होता. याचे ठाकूर सरांना फार कौतुक. ते भेटेल त्याला ही गोष्ट सांगायचे.सकाळी लवकर उठून आवरून सात वाजता शाळेत हजर. सुरूवातीला शाळा गावात तीन ठिकाणी भरत असे .ठाकूर सरांचा पहिला राऊंड या तीनही ठिकाणी असायचा. वर्ग सफाई करून घेणे, पालकांना माहिती सांगणे,जादा तासाला आलेल्या शिक्षकांना काय हवे नको पाहणे, वरीष्ठ लेखनिकानी सांगितलेली कामे तयार करणे, असे सतत त्यांचे काम चालू असायचे. पण कधी कंटाळा आला आहे असे कधी म्हणत नसत.पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे सतत धावपळ करणारा ,सर्वांना हसतमुखानं सहकार्य करणारा असा अवलिया होता. ठाकूर सर म्हणजे साक्षात उत्साह .सुरूवातीला शाळेला ग्रंथपाल पद मिळत नव्हते. तेव्हा एखादा शिक्षक व ठाकूर सर मिळून ते चालवत असत. ग्रंथालयाशी माझा अधिक संपर्क येत असे याचे कारण म्हणजे माझी वाचनाची आवड. त्यातूनच माझा अधिक वेळ तिथेच जात असे. ठाकूर सर त्याची व्यवस्था पाहत. तेव्हापासून मला ठाकूर "अहो साहित्यिक "अशीच हाक मारीत. नवं पुस्तक आले की प्रथम मला देत असत.कधी ग्रंथालयला पुस्तके द्यावयास कोल्हापूरहून वितरक आले की ठाकूर सर मला बोलावून कोणती पुस्तके घ्यावीत ते विचारायचे. असेच एकदा कोल्हापूरहून मौज प्रकाशनाचे श्री रवींद्र जोशी आले होते. त्यांची माझी ओळख प्रथम ठाकूर सरांनी करून दिली. आज पन्नास वर्षे झाली आमच्या मैत्रीला. आम्ही जिवाभावाचे मित्र झालो. ठाकूर सर असले की शाळा गजबजल्या सारखी वाटायची. इतकी धावपळ त्यांची चालायची. ते सतत काही ना काही करत असायचे. स्काऊटच्या पथकाची जबाबदारी तेच पाहत. संध्याकाळी राष्ट्रसेवादलाच्या शाखेवर हजर. त्यावेळी बहुतेक शिक्षक अविवाहित होते. त्यामुळे सर्वांचा मुक्काम शाळेत. मग गप्पागोष्टी चालायच्या".समूह गीते "सादरीकरण हे आमच्या शाळेचे वैशिष्ठ्य होते.ती बसवून घेण्यासाठी लाटकर सर,लुद्रीक सर, यांना मदतीला ठाकूर सर लागत. श्रमसंस्कार शिबीरे असली की ठाकूर सर काय हवे नको पाहायला पुढे असणार च.शाळेकडे येणार्या पाहुणे मंडळींची व्यवस्था तेच पाहत.शाळेबद्दलचा अभिमान व अतुट नाते त्यांच्या रोमरोमातुन भिनलेले होते.शाळेबद्दल कोणी वाकडे बोललेले त्यांना सहन होत नसे.शाळेतील सहशालेय कार्यक्रम, विज्ञान प्रदर्शन, क्रीडा स्पर्धा ,इतर अनेक उपक्रमांना त्यांचे उत्स्फूर्तपणे कौतुक करायला ठाकूर सर सर्वात पुढे. पालकांना कळावे म्हणून गावात अभिनंदनाचे बोर्ड लावतील. ते पायाला भिंगरी लागल्यासारखी ते सतत धावपळ करीत असत. आनंद वार्ता सगळ्या गावाला त्यांच्यामुळे कळायची.ठाकूर सर यांची ही धावपळ. घराकडे मात्र ठाकूर बाईंनी ती आघाडी सांभाळली . श्रीमती स्नेहलता ठाकूर या सरांची पत्नी. राज्यपुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षिका. संदीप, सुलक्षणा व स्वप्नाली या आपल्या मुलांना संस्कार संपन्न व उच्च शिक्षित करून त्यांचे संसार मार्गी लावले ते ठाकूर सर यांच्या सहाय्याने.शाळेची गुणवत्ता मोजली जाते ती एस.एस.सी . परीक्षेचा निकाल किती लागतो यावरून. ती मोजपट्टीच.पूर्वी होती व आजही आहे. त्यासाठी अनेक उपक्रम राबविले जात असतात त्यापैकी "अभ्यासिका"हा एक.रात्रीच्या अभ्यासिकेला शिक्षकांबरोबर ठाकूर सर उत्साहाने हजर असत. आमची निकालाची उज्ज्वल परंपरा निर्माण झाली होती. त्यामुळे केंद्रात गुणवत्ता धारक पहिले तीन विद्यार्थी आमचेच असत. निकाल लागला की त्यांना झालेला आनंद पाहण्यासारखा असायचा. ठाकूर सर यांचे शिक्षण एस.एस.सी. पर्यंत झालेले. पण खेडोपाड्यातून येणार्या शेतकर्यांच्या मुलांनी शिकलं पाहिजे असं ते पालकांना सांगायचे. शाळेतील वस्तु कोठे असतील याची सगळी माहिती त्यांना होती. इतकी समरसता होती. ठाकूर सरांना नाटकांची आवड होती. स्थानिक कलाकारांना घेऊन नाटके होत. त्यात श्री. ढोणुक्षे सर सीताराम बैरागी.,मा.विनायकराव व्हनबट्टे व ठाकूर सर अशी मंडळी असत.ठाकूर सर शाळेशी एकरूप झाले होते. पण त्यांच्या उत्साहाचा प्रवास 1998साली अचानक थांबला. ते सर्वांना सोडून गेले. पण प्रत्येकाच्या मनात कुठे ना कुठे घर करून गेले.आज 22वर्षं झाली. पण आजही शाळेत गेलो की "ठाकूर सर, काय करतायं ? नवीन कांही पुस्तके आलीत का?" अशी चौकशी ची हाक जातेच. अशा हरहुन्नरी सहकार्याच्या स्मृतीला माझे विनम्र अभिवादन.


-प्रा.श्रीकांत नाईक 

गडहिग्लज, जि कोल्हापूर

(9405039500)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आठवणीतली माणसं - 17

समाजसेवेचा वसा आणि वारसा जपणारे उमेशराव आपटे !

आठवणीतील माणसं - 5