आठवणीतली माणसं - 8

एका प्रज्ञासूर्याचे अलौकिक दर्शन! (राष्ट्रसंत आचार्य विनोबाजी भावे!) 



प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कांही दुर्लभ योगही येतात. त्यामुळे जीवन उजळून निघते.अधिक संपन्न होते .असेच काही क्षण माझ्या आयुष्यात ही आले. गोष्ट आहे 65 वर्षांपूर्वीची. माझ्या बालपणीची. मी तेव्हा इयत्ता चौथीत शिकत होतो. त्यावेळचे ऊत्तूर हे अगदी छोटेसे गाव होते. आजरा तालुक्यातले . माझ्या आजोळचे वातावरण हे वारकरी संप्रदायाचे, धार्मिक. माझे आजोबा "पंढरीचे" "कार्तिकीचे "वारकरी.त्याच प्रमाणे" ह.भ.प. गणपतराव फारक " हे जवळच्या नात्यातले आजोबा "महिन्याचे वारकरी ".त्यामुळे भजन,कीर्तन, नामस्मरण यांनी वातावरण भारलेले होते. दररोज संध्याकाळी शाळेतून घरी आलो की आमच्या ओसरीवर "फारक आजोबा "आम्हां मुलांना भजन म्हणायला शिकवत असत ,अभंग पाठ करून घेत असत. साधारण 50/60 मुलं असत.एक तास भजन चालायचे.रात्री अभ्यास, जेवण झाले की,पुन्हा आजोबा रामायण, महाभारत, संतांच्या कथा सांगत असत. त्यामुळे भक्तिरसाने चिंब भिजलेले असे ते दिवस होते. त्यामुळे आपोआपच संतांची चरित्रे वाचणे,त्यांच्या जीवनातून काय बोध घ्यावा हे आजोबा समजावून सांगत असत. इकडे शाळेत देशभक्तांच्या कथा, स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेले कार्य,त्यांचा त्याग अशा या गोष्टी ऐकायला मिळत असत. नुकतेच स्वातंत्र्य मिळाले होते. त्यामुळे सगळे वातावरण भारलेले होते. आम्हाला शिकवणार्या गुरूजीपैकी काहींनी चळवळीत भाग घेतला होता, तुरुंगवासही भोगला होता.त्यामुळे ते त्या मंतरलेल्या दिवसांबद्दल भारावून बोलत असत. म.गांधीजीं,पं.जवाहरलाल नेहरू ,वल्लभभाई पटेल,लो.टिळक, लाला लजपतराय, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग अशा अनेक देशभक्तांच्या बद्दल सांगत असत. तसेच सानेगुरुजी, आचार्य विनोबा भावे यांचे बद्दलच्या कथा सांगत असत. गुरूजी म्हणाले, स्वातंत्र्य मिळाले आता खेड्याकडे चला असे आम्हाला गांधीजीं सांगत. स्वराज्याचे आता सुराज्य करायचे आहे. आणि गांधीजींच्या आदेशाप्रमाणे शेकडो अनुयायी खेड्याकडे निघाले. यापैकी एक म्हणजे आचार्य विनोबाजी भावे होय..विनोबाजीनी "भूदान चळवळ "ही एक अपूर्व चळवळ सुरू केली. त्यासाठी देशभर "पदयात्रा " काढल्या .त्यात हजारो अनुयायी सामील झाले. जगभर ही चळवळ गाजली. आचार्य विनोबाजी भावे एक अलौकिक प्रतिभावंत असे व्यक्तिमत्व. वेद ऊपनिषदांचे व श्रीभगवदगीतेचे भाष्यकार, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक, विचारवंत, देशभक्त,म.गांधीजींचे पट्टशिष्य, भूदान ,चळवळ, सर्वोदय, आचार्य कुलाचे संस्थापक, प्रकांड पंडित,प्रज्ञावंत म्हणून प्रसिद्ध. त्यांचे व्यक्तिगत जीवन हे साधुसंतांसारखे साधे.पवनारला त्यांनी आश्रम स्थापन केला.स्वातंत्र्य चळवळीच्या काळात तुरूंगवास भोगला.आणि या तुरूंगवासातच त्यांनी बंदीजनांना भगवदगीतेवर प्रवचने दिली. ही प्रवचने लिहून घेतली ती आपल्या पू.सानेगुरुजी यांनी.भगवान श्रीकृष्णानी अर्जुनाला केलेला ऊपदेश मराठीमधून सोपा करून आचार्य विनोबा भावे यांनी "गीता प्रवचने "मधून सांगितला.तर आपल्या आईसाठी "भगवदगीता "---"गीताई "रूपाने अत्यंत सोप्या भाषेत लिहिली.ऋषीमुनींच्या काळातील शिक्षण पद्धती प्रमाणे आपल्याकडे शिक्षणपद्धती असावी म्हणून "आचार्य कुलाची"कल्पना मांडली .आणि "शिक्षकाचा आचारधर्मही" सांगितला.ज्याच्याकडे अधिक जमीन आहे त्याने आपल्याला आवश्यक तेवढी जमीन ठेवून उरलेली जमीन त्याने दान करावी .अशी दान म्हणून मिळाले ली जमीन गरजूंना देवून त्याच्याही जीवनाला अर्थ प्राप्त करून द्यावा म्हणून " भूदानाची चळवळ " ऊभी राहिली. याप्रमाणे अनेक कल्पना मांडून सुराज्य कसे येईल ते त्यांनी सांगितले. असे देशभर भारलेले उत्साहाचे वातावरण पसरले होते . तर सांगायच असं की , या महान देशभक्ताची, ऋषीतुल्य संतांची भेट होईल असे स्वप्नातही वाटलं नव्हत. संतांच्या कथा खूप वाचल्या,ऐकल्या पण असाच एक संत आपल्यात आहे ,त्यांची भेट घ्यावी असे वाटले पण घडेल असं वाटतं नव्हते, आम्ही लहान मुलं. अशक्यच होतं ते.त्यांचा फोटो पाहूनच समाधान मानत होतो.सन 1958 सालची गोष्ट. मी ऊत्तूरला प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत होतो.मार्च महिना सुरु झाला होता .सकाळची शाळा सुरू झाली होती.एके दिवशी सकाळी गुरुजींनी सर्व मुलांना शाळेसमोरच्या प्रांगणावर एकत्र जमायला सांगितले. त्यानंतर आमचे मुख्याध्यापक कामत गुरूजी सर्वांना उद्देशून म्हणाले, " मुलांनो, एक आनंदाची बातमी सांगणार आहे. आचार्य विनोबाजी भावे या थोर देशभक्ताची पदयात्रा आपल्या गावी येणार आहे .त्यांचे भाषण ऐकायला मिळणार आहे. म्हणून आपल्याला त्यांच्या स्वागताची तयारी करायची आहे. मग कोणत्या वर्गाने काय करायचे यावर चर्चा झाली. गुरूजीनी सूचना दिल्या. त्यादिवसापासून तयारीला लागलो. 20 मार्च 1958 हा दिवस ठरला.आमचा आनंद गगनात मावेनासा झाला. खूप दिवस मनात होतेच.एक देशभक्त, स्वातंत्र्य सैनिक यांच्या भेटीची ओढ लागली होती. पण त्याहीपेक्षा एका महान संत पुरूषाला पाहायला मिळणार याचा आनंद होता.मुलांची चढाओढ लागली की आपल्याला त्यांच्या जवळ कसे जाता येईल याची. आमचे बाल वय. 20 मार्च हा दिवस केंव्हा एकदा उजाडतो असे झाले . संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी" संतांची तुलना चंदनाशी" केली आहे. संत स्वतःचंदनासारखे झिजून इतरांना सुगंध देतात .आचार्य विनोबाजींचे जीवनही असेच, -------संत तुकाराम महाराज म्हणतात, "तुम्ही संत मायबाप कृपावंत /काय मी पतित कीर्ती वाणू//1// अवतार तुम्हा धराया कारण /उद्धराया जन जड जीवा // 2// वाढावया सुख भक्तिभाव धर्म/ कुलाचार नाम विठोबाचे//3// तुका म्हणे,गुण चंदनाचे अंगी/तैसे तुम्ही जगी संत जन 4//..........हे आचार्य विनोबा भावे यांना .तंतोतंत लागू पडते. महाराष्ट्राच्या सुधारणावादी चळवळीत संतमहात्यांचे अतिशय मोलाचे योगदान राहिले आहे.ज्ञान,प्रेम,करूणा,वात्सल्य, माधुर्य या गुणांनी परिपूर्ण असणार्या संतमंडळीनी वास्तवाचा स्वीकार करत आणि अंधश्रद्धेला छेद देत समाजाला सन्मार्गाला लावले. अशा ऊच्च कोटींच्या संतांच्या पंक्तीतील एक महान संत म्हणजे आचार्य विनोबा भावे!!!! परत माझे मन भूतकाळात गेले.गुरूजी दररोज विनोबाजींच्या बद्दल माहिती सांगत होते. मन अगदी अधिर झाले होते. ऊत्तूरच्या ग्रामपंचायतीच्या परिसरात आचार्यांची निवास व्यवस्था केली होती. पदयात्रा गारगोटीहून येणार होती. म्हणून तळेगल्लीच्या कोपर्याला स्वागताची भव्य तयारी केली होती. आम्ही स्काऊटचे विद्यार्थी रस्त्याच्या दुतर्फा ऊभे राहणार होतो. 20मार्च!!!!!तो अविस्मरणीय दिवस उजाडला. सकाळी 11 वाजता पदयात्रा तळ्याच्या जवळ पोहचली. त्यांच्या स्वागताच्या घोषणा दिल्या गेल्या.मुलींनी औक्षण केले. ग्रामस्थांनी स्वागत केले. मिरवणुकीने चावडीच्या प्रांगणावर आलो. आचार्यांनी थोडी विश्रांती घेतली. त्यानंतर त्यांचे प्रवचन झाले.आम्ही मुला-मुलींनी सूचना दिल्या त्याप्रमाणे "गीता प्रवचने "व "गीताई "ही दोन्ही पुस्तके घेतली.प्रवचनानंतर आम्ही रांगेने विनोबाजींच्या दर्शनाला निघालो. सर्वांच्या पुस्तकांवर त्यांनी "विनोबा का जय जगत " अशी स्वाक्षरी केली. आम्ही वाकून त्यांना अभिवादन केले. त्यांनी मस्तकाला स्पर्श करून आशीर्वाद दिले. "तो स्पर्श "अपूर्व होता, मी धन्य झालो. अंगावर शहारे आले. दुसर्या दिवशी सकाळी पुढे त्यांना निपाणीला जायचे होते. त्या पदयात्रेत आम्हाला थोड्या अंतरा पर्यंत सहभागी होता आले. हा एक अविस्मरणीय अनुभव होता. ते दृष्य अविस्मरणीय होते. पुढे हायस्कूलचे शिक्षण, नंतर महाविद्यालयीन जीवनात विनोबाजींचे साहित्य वाचले, अभ्यासले. "गीताई " व "गीता प्रवचने "या पुस्तकाची पारायणे केली. आजही ही पुस्तके मी अधून मधून वाचत असतो. पुढे दिवस सरकत होते. मी माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करू लागलो. त्यांचे साहित्य शिकवण्याची संधी मिळाली. या सगळ्या प्रवासात त्यांचे शिष्य व अनुयायी आदरणीय "मामा क्षीरसागर " यांचा परिचय झाला. त्यांचे मार्गदर्शन लाभले सहवास लाभला. ते "आचार्य कुलाचा" प्रसार करीत असत.त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध वक्ते,विचारवंत, साहित्यिक, आणि "आचार्य कुलाचे पहिले स्वयंसेवक प्राचार्य डॉ राम शेवाळकर, "यांचा सहवास, परिचय झाला. कांही वर्ष त्यांचे निकट राहण्याचे भाग्य मला लाभले. आणि एक दिवस प्राचार्य शेवाळकर सरांचे पत्र आले त्यात लिहिले होते की, तुम्हाला "आचार्य कुलाचा" "शिक्षण योगी "पुरस्कार जाहीर केला आहे .कोल्हापूर येथे गुरुवर्य प्रा.लीलाताई पाटील यांच्या शुभहस्ते देण्याचे ठरविले आहे. त्याप्रमाणे कोल्हापूर येथे अतिशय सुरेख अशा कार्यक्रमात मला मिळाला.हा सन्मान म्हणजे "राष्ट्रसंत आचार्य विनोबा भावे यांच्या आशीर्वादाचे फळ" असेच मानतो. हा दुर्लभ योग माझ्या आयुष्यातील संस्मरणीय क्षण होय.अकरा सप्टेंबरला त्यांची जयंती साजरी झाली.त्यांना माझे विनम्र अभिवादन!!! 

-प्रा.श्रीकांत नाईक 
गडहिग्लज, जि कोल्हापूर 
(9405039500).

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आठवणीतली माणसं - 17

समाजसेवेचा वसा आणि वारसा जपणारे उमेशराव आपटे !

आठवणीतील माणसं - 5