आठवणीतली माणसं - 7
गुरूराया आस तव दर्शनाची
संत शिरोमणी तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे,
जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले | तेव्हा या विठ्ठले कृपा केली ||
आता लागली आस | गुरूराया तव आस दर्शनाची ||
इतके गुरूचे महत्व मानवी जीवनात आहे. त्यासाठी आपला दृढविश्वास असावा लागतो. संतश्रेष्ठ एकनाथ महाराज आपल्या अभंगात वर्णन करताना म्हणतात,
गुरू परमात्मा परेशु | ऐसा ज्याचा दृढ विश्वासु ||
देव तयाचा अंकिला | स्वये संचरा त्याचे घरा ||
एका जनार्दनी गुरुदेव | येथे नाही बा संशय ||
आपल्या आयुष्यात गुरूचे स्थान अनन्यसाधारण आहे. पाच सप्टेंबर हा दिवस "शिक्षक दिनाचा" गुरूपूजनाचा!!आपल्या शिक्षकांना भेटून त्यांच्या ठिकाणी आपली श्रद्दा व्यक्त करण्याचा! जुन्या आठवणींना उजाळा देऊन साजरा करण्याचा हा दिवस. या निमित्ताने मला भेटलेल्या दोन गुरूंच्या या आठवणी....... 1960 सालचा तो काळ. मी ऊत्तूरला इयत्ता पाचवी झाल्यावर इयत्ता सहावी ला संकेश्वरला हायस्कूलला जायचे म्हणून गेलो. संकेश्वरला तेव्हा एस.डी.हायस्कूल चे इयत्ता 5 ते 7 वीचे वर्ग गावातील मध्यवर्ती ठिकाणी भरत. ती जागा म्हणजे घोड्याची "पागा" होती.संकेश्वरच्या श्री शंकराचार्य मठाची ती जागा.पूर्वी दसरा,दिवाळी, यात्रा अशा प्रसंगी "छबिना"निघत असे.त्यात घोडे, उंट, असायचे .यातल्या उंट व घोड्यांसाठी ही जागा "पागा" म्हणून उपयोगात आणत असत. नुकतीच एस.डी.हायस्कूलची भव्य दिमाखदार इमारत "पुणे-- बेंगलोर हायवे जवळ "बांधली आहे. या शाळेला भव्य क्रीडांगण मिळाले आहे. आम्ही इयत्ता पाचवी ते सातवीचे विद्यार्थी " लहान" हाय वे ओलांडून जावे लागते म्हणून आमचे वर्ग या "पागेत" भरत असत. पण आम्हाला ओढ नव्या इमारतीत जायची. शिवाय खेळण्या साठी भव्य क्रीडांगण आम्हाला नव्हते. कधीतरी नवी शाळा पहायला व खेळण्यासाठी नेत असत.सातवी पास झालो आणि इयत्ता आठवी ला जाणार म्हणून सर्वांना खूप आनंद झाला .नवी शाळा, भव्य मैदान पाहून हरखून गेलो होतो. आता इथे आम्हाला नवे शिक्षक शिकवायला येणार म्हणून फार कुतूहल होते.एक दिवस प्रार्थना झाली आणि आम्ही वर्गात आलो. बालसुलभ आमची दंगामस्ती चालली होती. गोंधळ सुरू होता. अचानक आमच्या शाळेचा शिपाई "धुळाप्पा "आला आणि त्याने शांत बसा, नवीन सर तुमच्या वर्गावर येणार आहेत. असे सांगून तो गेला. मुलांची कुजबुज सुरु झाली. कोणते सर येणार, कोणता विषय शिकवणार?असे अनेक प्रश्न घेऊन उत्सुकतेने आम्ही दरवाजाकडे पाहू लागलो घंटा झाली ".आमच्या वर्गात एका सहा/साडे सहा फूट उंचीच्या व्यक्तीने प्रवेश केला. पांढराशुभ्र पोशाख, तोही अत्यंत नीटनेटका, सडपातळ बांधा,गहूवर्ण, धारदार नाक, केस मागे विंचरलेले, डोळे भेदक,जरब बसविणारे, हातात भूमितीची उपकरणे,खडू,डस्टर , त्यांना पाहताच मनात भीतियुक्त आदर. आम्ही सर्वजण उभे राहून त्यांचे स्वागत केले. प्रथम त्यांनी आपला परिचय करून दिला, " मी वाय.ए.घोरपडे" मी तुम्हाला गणित शिकवणार ". मग त्यांनी आम्हाला नावे विचारून परिचय करून घेतला. पहिल्याच दिवशी त्यांनी भूमितीचा कांही भाग शिकवला नंतर कांही प्रश्न विचारले व चाचणी घेतली. मुलांशी संवाद साधत खेळकर वातावरणात पहिला तास संपला. सुरूवातीला वाटणारी भीती बरीचशी निवळली. सरही नवीनच आमच्या हायस्कूल मध्ये आले होते.,आणि पहिलाच तास त्यांचा आमच्या वर्गावर होता. तासाच्या शेवटी ते म्हणाले, "मी तुमचा वर्ग शिक्षक आहे ," "उद्या येतांना तुमची संपूर्ण माहिती लिहून आणा. आज जे आनंददायी शिक्षण शिकवले जाते ते साठ वर्षा पूर्वी आम्हाला घोरपडे सरांनी शिकवले. सगळ्यात महत्वाचे म्हणजे गणिताची भीती घालवली. बीजगणित आम्ही प्रथमच शिकत होतो. एकूण सर्वसाधारणपणे गणित हा तसा नावडता विषय असतो, पण घोरपडे सरांनी तो आम्हाला आवडता करून दाखवला. ही किमया त्यांच्या शिकवण्याची . आम्ही त्यांना गणिताचे जादूगारच म्हणत होतो. त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. आम्ही मुलं नेहमी त्यांच्या भोवती वावरत असू. वर्गशिक्षक असल्यामुळे त्यांना सगळ्या वर्गाची संपूर्ण माहिती खडानखडा होती. ते विद्यार्थ्यांच्या गळ्यातील ताईत बनले होते. सलग तीन वर्षे तेच आमचे वर्ग शिक्षक होते. कधीतरी त्यांच्या डस्टरचा मारही खाल्ला आहे. पण त्यांचे विद्यार्थ्यावर निरपेक्ष प्रेम होते. अभ्यासाबरोबरच त्यांना खेळाची प्रचंड आवड . दरवर्षी स्नेहसंमेलनाच्या स्पर्धांमध्ये माझ्या वर्गाने भाग घेतला पाहिजे हा त्यांचा आग्रह असल्याने ते स्वतः मुलांची निवड करायचे. प्रॅक्टीसलाही हजर असायचे. कलागुणांना वाव देण्यासाठी ते खूप धडपडायचे.घोरपडे सर शिकून बाहेर पडलेल्या मुलांशी नेहमी संपर्क ठेवून असायचे. कधीही भेटले तर त्याला नावानिशी हाक मारून चौकशी केल्याशिवाय सोडत नसत. त्या काळातले सर्वच शिक्षक ध्येयवादी होते,चारित्र्य संपन्न होते, नैतिक दरारा होता. आजही कधी भेटले तर रस्त्यातही वाकून चरणस्पर्श करायला आपोआप नतमस्तक होतो. संस्कार कृतीतून करणार्या शिक्षकाच्या काळात आम्हाला ऋषीतुल्य गुरूजन लाभले हे आमचे भाग्य होय. आज ते 88 वर्षाचे झाले आहेत. स्मरणशक्ती चांगली आहे. वयानुसार आधाराला कोणीतरी लागते इतकेच. भेटीत जुन्या आठवणीत रमतात. नावानिशी चौकशी करतात. एकदा त्यांचा फोन आला, "भेटून जा" मी गेलो. जातांना शाल श्रीफळ घेऊन गेलो.साष्टांग दंडवत घातला. त्यांना खूप भरून आले. मलाही. मला त्याच सुमारास "महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार " मिळाला होता. ते त्यांना समजले होते. खूप भारावून बोलले. म्हणाले, " नाव काढलेस " खूप मोठा हो. हा फार मोठा आशीर्वाद हा पुरस्कारापेक्षा मोठा होता.आजही घोरपडे सर नियमाने संध्याकाळी फिरायला जातात. कुणी लहान मुले, नातवंडं दिसली की त्यांना जवळ घेऊन गणित शिकवतात. ही त्यांची ऊर्जा आम्हाला प्रेरणादायी आहे. ते शतायु व्हावेत अशी सर्वांची मनापासून इच्छा आहे. त्यांना माझे वंदन!!!!!!!!!! गोष्ट आहे 1969-70 सालातली. मी कोल्हापूरला काॅमर्स काॅलेजमध्ये शिकत होतो. तेव्हा दसरा चौकातील " सारस्वत बोर्डींग मध्ये "राहत होतो. आमच्या काॅमर्स काॅलेजमध्ये पद्मभूषण डाॅ. जे.पी.नाईक यांची दोन व्याख्याने आयोजित केली होती. ते आमच्या बोर्डींगचे विद्यार्थी. ही संधी साधायची आणि त्यांना बोर्डींगला भेट द्यावी म्हणून विनंती करायचे असे ठरवले. त्याप्रमाणे आम्ही भेटलो. त्यांनीही आनंदाने यायचे मान्य केले. ते आले, सत्कार समारंभ छान झाला. ते विद्यार्थी असतांना ज्या खोलीत राहत होते. त्या खोलीला त्यांचे नाव दिले.त्या भेटीत त्यांच्याशी बोलण्याचा योग आला. तेव्हा त्यांनी मला, "शिक्षक हो ,चांगला शिक्षक होशील "असा सल्ला दिला. पुढे मी पदवीधर झालो आणि शिक्षक झालो.त्यांचे बोल खरे ठरले. असेच दिवस जात होते. मी शाळेत रमलो होतो. आणि एक दिवस आमचे मुख्याध्यापक मान. श्री. आजगावकर सर म्हणाले, "सुप्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ आणि नियोजन मंडळाच्या माजी सदस्य डाॅ. चित्राताई नाईक शाळेला भेट देणार आहेत "तयारी करा.त्या आल्या. त्यांचे शिक्षक-विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषणही झाले.नंतर सर्वांचा परिचय झाला.मनोमन मी त्यांना गुरू मानून काम करत आलो होतो,आणि आज त्यांना प्रत्यक्ष ऐकण्याचा, पाहण्याचा योग आला होता. माझ्यासाठी ती पर्वणीच होती."एकदा शिक्षक झालात की आयुष्यभर तुम्ही शिक्षकच राहा . तुम्हाला सुट्या नसतात .स्वतःला उजळून आपल्या विद्यार्थ्यांनाही उजळण्याचा प्रयत्न करा"हा त्यांच्या भाषणातील संदेश मी आजही निवृत्तीनंतरही अंमलात आणला आहे. त्याचा मला अभिमान वाटतो.माझे अध्यापन, उपक्रम चालूच होते. पुढे काही वर्षांनी सन 2009मध्ये मी "पद्मभूषण डाॅ. जे.पी.नाईक यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने, डाॅ.जे. पी.नाईक -जीवन व कार्य व "मुलांचे डाॅ. जे . पी. नाईक "अशी दोन पुस्तके लिहिली. त्यापैकी "मुलांचे डाॅ. जे.पी.नाईक " या पुस्तकाला " महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वांग्मय निर्मितीचा (चरित्र गटात) कवी ग.ह.पाटील पुरस्कार "मिळाला हे त्यांना समजले. त्यांनी मला फोन करून अभिनंदन केले आणि पुस्तक मागवून घेतले. पुण्यातला कोथरूडमधील "असीम" हा त्यांचा बंगला. सकाळी 11 ची वेळ. मी दिवाणखान्यात बसलो होतो. इतक्यात 94 वर्षाच्या आदरणीय चित्राताईंचे आगमन झाले. "गोर्यापान, पाच फूट उंची, सडपातळ बांधा, पांढरेशुभ्र केस, पांढरी शुभ्र साडी अशा चित्राताईना पाहून साक्षात सरस्वती देवीच माझ्या समोर उभी राहिली आहे असे वाटले.त्यांना साष्टांग नमस्कार केला. त्यांनी भरपूर आशीर्वाद दिला. "पुढे आजच्या शिक्षणावर, उपक्रमशीलतेवर, ताज्या संदर्भासह बोलत होत्या.मी जीवाचे कान करून ऐकत होतो. अंगावर पौर्णिमेचे चांदणे पडल्यासारखे वाटत होते. माझे पुस्तक त्यांनी संपूर्ण वाचले होते. त्याबद्दल बोलल्या. या वयातही त्यांचे दररोज अद्ययावत ग्रंथ,लेख, नियतकालिके, मासिके यांचे वाचन चालू असते हे दिवाणखान्यातील ग्रंथावरून दिसत होते. " म्हणाल्या, कांही धडपडणार्या शिक्षकांना घेऊन ये.मला त्यांच्याशी बोलायचं आहे. " पुन्हा येण्याचे ठरवून व त्यांचे समवेत फोटो काढून घेऊन मी परतलो. ही भेट व संवाद अपूर्व होता. आयुष्यातील अविस्मरणीय भेट होती . असे अखंड कार्यमग्न मला होता येईल का? "याचा विचार करीत मी घरी आलो. पुन्हा जाणे झाले नाही ही खंत मनात कायम राहिली. त्यांना शिक्षक दिना निमित्त अभिवादन!!
- प्रा.श्रीकांत नाईक
गडहिग्लज, जि. कोल्हापूर (9405039500)



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा