आठवणीतली माणसं - 6
गुरूवंदना !!
आज "श्री गणेश चतुर्थी "चौदा विद्या व चौसष्ट कलांचा" जो अधिपती त्या मंगलमय गणेशा चे आगमन झाले आहे. सर्व विघ्नांचा नाश करणारा व सर्व सुखांचा वर्षाव करणारा असा तो गणपती. त्याला वंदन करुन आज मी माझ्या जीवनातील गुरुंना वंदन करणार आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी गुरूला संतकुळीचा राजा म्हंटले आहे. गुरूचे अपूर्व असे वर्णन त्यांनी आपल्या अभंगात केले आहे. ते म्हणतात,
"गुरू हा संत कुळीचा राजा | गुरू हा प्राण विसावा माझा |
गुरूवीण देव दुजा | पाहता नाही त्रिलोकी ||1||
गुरू हा सुखाचा सागरू | गुरू हा प्रेमाचा आगरू |
गुरू हा धैर्याचा डोंगरू | कदाकाळी डळमळीना ||2||
गुरू वैराग्याचे मूळ | गुरू परब्रह्म केवळ |
गुरू सोडवी तात्काळ | गाठ लिंग देहाची ||3||
गुरू हा साधकासी साह्य | गुरू भक्तालागी माय |
गुरू हा कामधेनु गाय | भक्ताघरी दुभतसे ||4||
गुरू घाली ज्ञानांजन | गुरू दाखवी निजधन |
गुरू सौभाग्य देऊन | साधुबोध नांदवी ||5||
गुरू मुक्तीचे मंडन | गुरू दुष्टांचे दंडन |
गुरू पापांचे खंडन | नानापरी वारीतसे ||6||
काया काशी गुरू उपदेशी | तारक मंत्र दिला आम्हासी |
बाप रखुमादेविवरासी | ध्यान मानसी लागले ||7||
"माऊलींचा " हा अभंग मी अनेकवेळा वाचला आहे. माझ्या डायरीमध्ये मी लिहून ठेवला आहे. तो आता आठवायचं कारण म्हणजे, एकदा मागे वळून बघताना जवळ जवळ सहा साडे दशकांचे आयुष्य सरून गेले. आता आयुष्याची "कांचन संध्या "अनुभवू लागलो तेव्हा आठवले की,हे सर्व घडून येण्यासाठी कोण कोण कारणीभूत ठरले आणि याचे ऊत्तरही पटकन मनात आले आपले गुरू.!!!! गुरूवीण कोण दाखविल वाट ? असं म्हटलचं आहे. श्री दत्तप्रभूनी 24 गुरू केल्याचे आपण वाचतोच. तुमच्या-आमच्या आयुष्यात असे अनेक गुरू येऊन गेलेले असतातच की, त्यांचेच आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने स्मरण करण्याचा हा प्रपंच. मला आठवते ते असे, मी खूपच तापट स्वभावाचा होतो त्यामुळे अनेकांशी माझे खटके उडायचे. भांडणं व्हायची. मलाही खूप त्रास व्हायचा. काय करायचे सुचायचे नाही. अशा वेळी माझी अडाणी आजी सांगायची हे बघ,"खूप राग आला की 10आकडे मोजायचे. दुसरे कांही करायचे नाही. आकडे मोजायचे तेही मनातल्या मनात." मी एकदा प्रयत्न करून पाहिला आणि काय आश्चर्य?राग कुठल्या कुठे पळून गेला. मित्रांचा दुरावाही नाहिसा झाला.बाल वयात आजीने सांगितलेला हा गमतीचा उपाय मला आयुष्यभर उपयोगी पडला.गेल्या 60 वर्षात माझे कधीही कुणाशीही भांडण झाले नाही. उलट मित्रांचे मोहोळ तयार झाले.ही युक्ती सांगणारी माझी आजी ही माझी पहिली गुरू. तिचे नाव "गंगाबाई".तिला मी कधीही विसरू शकत नाही. माझे काका कै.धोंडोपंत श्रीपाद तथा दादा नाईक हे नात्यांनी काका पण माझ्या आयुष्याला आकार देणारे शिक्षक गुरूच.ते आमच्या संकेश्वरच्याएस .डी. हायस्कूल चे शिल्पकार मुख्याध्यापक होते. मला ज्ञानाचे भांडार दाखवले त्यांनीच. ते इंग्रजी, मराठी भाषांचे प्रकांड पंडित होतेच .पण इतर विषयांचेही गाढे अभ्यासक होते.मर्मज्ञ रसिक होते.वाचावे कसे, लक्षात ठेवावे कसे, काय वाचावे, याचे बारकावे त्यांनीच इतक्या बारकाईने शिकविले.त्याच प्रमाणे आयुष्यातील अत्यंत कठीण प्रसंगीही तेच माझ्या मागे ऊभे राहिले. माझ्या वडिलांचे आकस्मिक निधन झाले आणि आमच्या 9 माणसांच्या कुटुंबाची जबाबदारी आपल्या आपल्या शिरावर घेऊन यातून यशस्वीरित्या बाहेर पडण्यासाठी हिमालयासारखे माझ्या मागे ऊभे राहिले म्हणून आयुष्य सुकर झालेच ,.पण मला सक्षमही बनवले.यासाठी वांग्मयाचा आधार कसा घ्यायचा तेही शिकविले. ते नसते तर ही कल्पनाच मी करू शकत नाही. ते माझ्यासाठी सर्व कांही होते. ते आई-वडील, गुरू,मार्गदर्शक, सखा, मित्र,या सर्व भूमिकामधून ते माझे जीवन व्यापून टाकणारे सद्गुरूच. शिक्षक कसा असावा ,त्याने अध्ययन कसे करावे,अध्यापन कसे करावे, हे त्यांनीच मला सप्रयोग सांगितले. माझ्यातल्या शिक्षकाला आकारही त्यांनीच दिला म्हणून माझे शिक्षकी जीवन सफल झाले ,समाधानी झाले. माझ्या काकांचे एक गांधीवादी विचारवंत व थोर स्वातंत्र्य सैनिक, शिक्षणतज्ज्ञ मित्र होते त्यांचे नाव "माधव नारायण कुलकर्णी " तथा बापूसाहेब कुलकर्णी. महात्मा गांधीजींचे निष्ठावंत अनुयायी. त्यांनी दुंडगे ता.गडहिग्लज येथे "परिश्रम विद्यालय " नावाची माध्यमिक शाळा सुरू केली होती. म.गांधीजींच्या शिक्षण पद्धती प्रमाणे चालविली जात असे.बापूसाहेब इंग्रजी, भूगोल, या विषयाचे व्यासंगी होते.संस्कृत,वांग्मयाचे, रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी,दासबोधाचे विवेचक अभ्यासक होते.त्यांना भेटायला गेलो. शिक्षक झाल्याचे सांगितले. त्यांना आनंद झाला. माझी परीक्षा घेण्यासाठी त्यांनी मला प्रश्न विचारले, ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, दासबोध वाचलेस का? मी निरुत्तर झालो होतो. तेव्हा त्यांनी मला समजावून सांगितले की, शिक्षकाने हे ग्रंथ वाचल्याशिवाय शिक्षक होऊच नये. दुसरे असेही सांगितले की,आयुष्यभर "शिक्षकच रहा " दुसरे कांही करू नकोस.या शब्दांनी मी खडबडून जागा झालो .सर्व संत वांग्मय वाचून काढले. शिक्षकाचे ऊत्तरदायित्व निभावण्याची मनोमन प्रतिज्ञा केली. आणि जवळ जवळ 33 वर्षे मी निष्ठेने ती निभावली. कृतार्थ भावनेने निवृत्त झालो.आयुष्याचे सार्थक झाले. हे माझे गुरू मला सतत वंदनीय राहिले. आंतरराष्ट्रीय किर्ती चे शिक्षण तज्ज्ञ पद्मभूषण डाॅ. जे.पी.नाईक यांच्याविषयीची एक आठवण माझ्या संबंधातली, माझी आजी मला सांगायची. ती म्हणायची, "हे बघ या विठू सारखा शहाणा हो.जे.पी.नाईकांचे पूर्वीचे नाव "विठ्ठल " माझी आजी त्यांची आत्या असे नाते होते. माझ्या "बारशा"दिवशी दिवशी ऊत्तूरला माझ्या आजीला भेटायला ते आले होते. माझ्या आजीला ते म्हणाले, "एआत्या, मला शेंगदाणे दे. मी निघालो. "आजी म्हणाली, अरे विठू, जरा आलास तसा थांब .आज बारसे आहे.नातवाचे तोंड बघ, जेवण कर आणि जा. "असे म्हणून मला "जे.पी.नाईक यांचे मांडीवर दिले. " मी 12 दिवसाचा. मला काय माहित, ज्यांनी मला मांडीवर घेतले आहे ते फार मोठे विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ आहेत.आत्याने त्यांना शेंगदाणे, गूळ, घुगर्या दिल्या.त्यानी मला कुरवाळले. नंतर निघून गेले. तो अमृतस्पर्शच होता. पुढे मी कोल्हापूरला काॅमर्स काॅलेजमध्ये शिकत असताना सन 1969/70 मध्ये व्याख्यानासाठी डाॅ जे.पी.नाईक आले होते. दोन दिवस दोन व्याख्याने होती.मला ही संधी साधायची होती .तेव्हा मी "दसरा चौकातील " "सारस्वत बोर्डींग मध्ये राहून शिकत होतो.मला माहिती मिळाली की, जे.पी.नाईकही याच बोर्डींग चे विद्यार्थी होते.आम्ही बोर्डींग चे सर्व विद्यार्थी, व्यवस्थापक यांनी असे ठरविले की ,नाईक साहेबांनी बोर्डींगला भेट द्यावी व ते राहत होते त्या खोलीला त्यांचे नाव द्यावे अशी विनंती केली. तेही आनंदाने आले. समारंभ छानच झाला. या समारंभाचे नियोजन मी पुढे होऊन केले होते.समारंभात मी त्यांच्याविषयी बोललो. ते मन लावून ऐकत होते. परत जातांना त्यांनी मला आठवणीने जवळ बोलावले. मी नमस्कार केला. त्यांनी जवळ घेतले, पाठीवरून हात फिरवला आणि मला म्हणाले ," शिक्षक हो.चांगला शिक्षक नक्कीच होशील ." हाच त्यांचा आशीर्वाद पुढे खरा ठरला. त्यांच्या स्पर्शाने आणि अमृतवाणीने माझ्या आयुष्याचे सोने झाले. माझ्या आयुष्यातील हे तीन गुरू ,"ब्रह्मा,विष्णू, महेशाच्या, "दत्तगुरूंच्या रूपाने मला लाभले. त्यांना माझे त्रिवार वंदन!!!!!
- प्रा. श्रीकांत नाईक (9405039500)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा