आठवणीतली माणसं - 4

गुरू माझा समर्थ - एम.एन.कुलकर्णी..........


  


साधारण 1962/63 साल असावे. संकेश्वरला गांधी चौकातील आमच्या घरी एका रविवारी दुपारी एक गृहस्थ अचानक आले. खादीची गांधी टोपी, खादीचाच हाप शर्ट,खादीचेच धोतर.आणि खांद्यावर घोंगडे, धारदार नाक, गव्हाळ रंग ,करारी नजर, बारीक चणीचे शरीर लाभलेले असे ते व्यक्तीमत्व होते. पायात साध्या वहाणा. आल्या आल्या त्यांनी धोंडोपंत आहेत का अशी विचारणा केली. धोंडोपंत ऊर्फ दादा हे माझे काका. सुप्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ आणि संकेश्वर च्या एस.डी.हायस्कूलचै शिल्पकार मुख्याध्यापक. मी आत जावून दादांना सांगितले, त्यांचे वर्णन केले. त्याबरोबर दादा म्हणाले, बापूसाहेब आलेत होय ,असे म्हणत ते बैठकीच्या खोलीत आले.पुढे बराच वेळ त्यांच्या शिक्षणावर साहित्यावर खूप गप्पा झाल्या. त्यावेळी मला काही कळले नाही. पण आलेली व्यक्ती कांही साधी नाही एवढं जाणवलं. थोड्यावेळाने ते दादांना म्हणाले,"धोंडोपंत, आमच्या शाळेचे खेळाचे साहित्य, घटप्रभा रेल्वे स्टेशनवर रेल्वेपार्सलने आले आहे ,तेवढे दुंडगे येथील आमच्या शाळेकडे पोचवा. "आणि तसेच चहा,काॅफी काहीच न घेता निघून गेले. हे साहित्य दुंडग्याला पोचविण्याची जबाबदारी अर्थातच माझ्यावर आली.मी तेंव्हा आठवीत शिकत होतो. आधी घटप्रभेला जाऊन साहित्य आणले व मग ते घेऊन दुंडग्याला गेलो. बापूसाहेबांनी मला त्यादिवशी ठेऊन घेतले. संध्याकाळी हाॅकीचे साहित्य घेऊन विद्यार्थ्यांना घेऊन "पीराच्या माळावर "गेलो.थोडा वेळ बापूसाहेब कर्णधार झाले जमलेल्या मुलांमधून दोन टीम तयार केल्या. सुरूवातीला हाॅकीची स्टीक कशी धरायची, चेंडू ला कसे मारायचे ते समजावून सांगितले. सर स्वतः स्टीक घेऊन पुढे. खेळ सुरू झाला. मैदान ओबडधोबड होते, सर कसलेले खेळाडू होते त्यातच चारपाच स्टीक मोडल्या मला वाटले सर आता रागावणार? पण ते म्हणाले, मोडू देत. आपण पुन्हा आणू, पण खेळायला मजा आली ना? त्याकाळात पहिल्यांदाच आम्ही हाॅकीचे साहित्य पाहत होतो. कांही मुलांचे गुडघे खरचटले पण मजा आली. सरांचा उत्साह औरच होता.तरूण खेळाडूंना लाजविल अशा त्वेषाने धावत होते. क्षणभर मला मुलांत मुल होऊन समरस झालेले सानेगुरुजी च दिसले. हे बापूसाहेब कुलकर्णी म्हणजे थोर स्वातंत्र्य सैनिक, शिक्षण तज्ज्ञ, परिश्रम विद्यालय, दुंडगे या शाळेचे संस्थापक मुख्याध्यापक श्री माधव नारायण कुलकर्णी. पण ते एम.एन.कुलकर्णी तथा बापूसाहेब कुलकर्णी म्हणूनच सर्वांना परिचित होते. महात्मा गांधी यांचे निस्सीम अनुयायी,आमचे कुटुंबीय, माझे काका, गांधी विचाराचे पाईक ,खरे वारसदार. ....बापूसाहेब यांचा जन्म 1916सालचा. त्यांचे शिक्षण बेळगाव, कागल, कोल्हापूर, मुंबई येथे झाले. फिजिक्स व केमिस्स्ट्री विषय घेऊन बी.एस्सी. झाले.इंग्रजी, गणित,आणि विज्ञान घेऊन ते एस.टी.सी.झाले.पुढे 1951 साली बी.एड.आणि 1953साली एम.एड.ला कर्नाटक विद्यापीठात पहिले आले. सन 1940 ते1945 या काळात संकेश्वरच्या एस.डी. हायस्कूल मध्ये आपल्या शिक्षकी जीवनाची सुरूवात केली. त्यावेळी धोंडोपंत तथा दादा नाईक हे शाळेचे शिल्पकार मुख्याध्यापक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शिक्षक म्हणून घडलो असे ते नम्रपणे सांगत असत. मातीच्या गोळ्याला आकार द्यावा आंणि मूर्ती घडवावी त्याप्रमाणे दादांनी मला शिक्षक म्हणून घडवले आहे. शिक्षणातील ते माझे गुरू आहेत. अशा कुलकर्णी सरांकडून मला मार्गदर्शन घेता आले आणि ते माझे गुरू आहेत हे मी अनेकांना अभिमानाने सांगत असतो.स्वातंत्र्य आंदोलनात म.गांधीजींच्या विचाराच्या प्रभावाने ते ओढले गेले. 1942 च्या चलेजाव चळवळीत त्यांनी नोकरी सोडून भाग घेतला. पकडले गेले. तुरुंगवासही भोगला. स्वातंत्र्य मिळाल्यावर शासनाने देऊ केलेली स्वातंत्र्यसैनिकाची पेन्शनही त्यांनी नाकारली. महात्मा गांधीजींचे विचार,त्यांचे साहित्य आणि त्यांचा सहवास लाभल्यामुळे त्यांचेजीवन गांधीमय झालेले होते.त्यांना दुंडगे येथे हायस्कूलची स्धापना करतांना त्यांच्यासमोर गांधींजींचे विचारच होते." जीवन विकास व जगताची समृद्धि होण्यासाठी श्रम आणि शिक्षण या दोहोंची नितांत गरज आहे. परंतु सद्यःस्थितीत श्रम आणि शिक्षण यांची फारकत आढळते. यासाठी सुशिक्षितांना श्रमिक बनविणे व श्रमिकांना सुशिक्षित बनविणे हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून "वर्धाशिक्षण पद्धतीच्या "आधारे एक अभिनव प्रयोग करून पाहण्यासाठी गडहिग्लज तालुक्यातील दुंडगे या आपल्या जन्म गावी 15ऑगष्ट 1960 रोजी "श्रमिक शिक्षण संस्था "स्थापन केली. "आणि या संस्थेच्या वतीने 1961साली "परिश्रम विद्यालय " ही माध्यमिक शाळा सुरू केली.या शाळेत विद्यार्थ्यांना श्रमाची सवय लागावी म्हणून दररोज शाळेच्या वेळानंतर एक तास प्रत्यक्ष शेतावर जाऊन श्रम करावे लागत असे.या तासाला परिश्रमाचा तास म्हटले जाई.विद्यविद्यार्थ्यांना तासाला 10पैसे त्याकाळात मोबदला मिळे. अशारितीने वर्षभराच्या कमाईतून विद्यार्थी वह्या, पुस्तके, शालेय साहित्य खरेदी करून स्वावलंबनाचे आचरण करीत असत. "कमवा व शिका" याचे ते प्रात्यक्षिकच होते.शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी शाळेद्वारे प्रयत्न केले गेले.श्रमिक, ज्ञान,आंणि कर्म यांनी युक्त राष्ट्रनिष्ठा तेवत ठेऊन ही संस्था नावरूपाला आणली. सुरूवातीला त्या काळातील ध्येयवादी,निष्ठावंत,विद्वान शिक्षकांचा संच त्यांनी जमा केला.गांधीजींच्या विचारांचा प्रसार हे त्यांचे जीवित कार्य होते.शाळेच्या गुणवत्तेबरोबरच हे ही त्यांनी निष्ठापूर्वक केले.बापूसाहेबांनी गावच्या विकासाकरिता ही मार्गदर्शन केले. स्वखर्चाने श्री हनुमान मंदीर जिर्णोद्धार केला... त्यांनी आपल्या वडीलांच्या नांवे "नारायण निधी "निर्माण करून रूपये 10 हजार बेघर कुटुंबीयांना आर्थिक मदत केली.दुंडगे गाव 100% साक्षर व्हावे म्हणून प्रत्येक प्रौढाला दररोज शिकण्याकरिता 10पैसे मानधन देण्याचे कार्य तर केलेच .पण प्रौढासाठी स्वतः छोटी छोटी पुस्तके लिहून ती स्व खर्चानी छापून पुरविली. व्यायामाचे महत्त्वजाणून त्यांनी रूपये 10,000/ची देणगी दिली. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्याबरोबरच त्यांनी संशोधनाचे केलेले कार्यही फार महत्वाचे आहे. ------------------(1) महात्मा गांधीजींचे त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात झाले. (2) ज्ञानेश्वरी व दासबोध यांचा परिचय व्हावा म्हणून "परिचय पुस्तके " व नित्यपठणासाठी या दोन्हीही महान ग्रंथातील ओव्यांचे संपादन करून छोट्या पुस्तिका छापून विनामूल्य वाटल्या. (3) त्या काळातील इयत्ता 8 वी ते 10 वीच्या इंग्रजी च्या पाठ्यपुस्तकातील कवितांचे समवृत्ता मध्ये मराठी अनुवाद करून मुलांना दिला त्यामुळे मुलांना कविता समजायला सोपे गेले. (4) भारतीय भाषांच्या लिपींचा सखोल अभ्यास करून त्यातली क्लिष्टता काढून टाकून सर्व भाषांसाठी एक नवी "भारतीय लिपी "त्यांनी तयार केलेली आहे. तिची त्या काळातील विद्वानांनी दखल घ्यावयास हवी होती. तस झालं असत तर आंतरभारतीचा विचार अधिक पुढे गेला असता. एक तपस्वी, बहुभाषांवर प्रभुत्व असलेला प्रकांड पंडित, सच्चा गांधीवादी, कृतिशील विचारवंत ,साहित्य, धर्मशास्र, संस्कृतातील अधिकारी, अध्यात्म योगी, शिक्षण तज्ज्ञ अशा अनेकविध पैलूंनी मंडित झालेले व्यक्तिमत्व आपल्या अवतीभवती होते यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही . पण मी भाग्यवान म्हणून मला त्यांचे मार्गदर्शन लाभले.सहवास लाभला. मी वंदन करतो.!!!!!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आठवणीतली माणसं - 17

समाजसेवेचा वसा आणि वारसा जपणारे उमेशराव आपटे !

आठवणीतील माणसं - 5