आठवणीतली माणसं - 3
पुलंचा "नारायण" भेटला त्याची गोष्ट!!!
जन्माला येणार्या माणसाचं एक प्रयोजन असतं. एक माणूस दुसर्या सारखा नसतो. एकाच आई वडीलांच्या पोटी जन्माला येणारी भावंडंही एकसारखी नसतात. प्रत्येक माणूस कांही प्राक्तन घेऊन येतो .माझ्या आयुष्यात भेटलेल्या आणि लक्षात राहिलेल्या माणसापैकी आज मी तुम्हाला एका माणसाबद्ल सांगणार आहे. हा माझ्या संपर्कात आला आणि मला पुलंचा तो अविस्मरणीय "नारायण च" भेटला.गोष्ट आहे सन 1987 सालातील. म्हणजेच जवळपास 33 वर्षांपूर्वीची.मी ऊत्तूर विद्यालयात शिक्षक म्हणून काम करत होतो त्यावेळची.जून महिना. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं. या वर्षी माझ्याकडे इयत्ता आठवी चा वर्ग शिक्षक म्हणून काम आले.पहिले दहा बारा दिवस ओळखी होण्यात गेले. मुलांना वह्या,पुस्तकं ,यांची यादी दिली. आठ दहा दिवस अवांतर वाचन,गाणी,विनोद, समूह गीते,यात गेले. मुलंही रमली वातावरण हलके झाले. महिना अखेरीस मुख्याध्यापकांनी स्टाफ मिटींग घेतली. कामाच्या वाटण्या झाल्या.त्याप्रमाणे मी एक जुलैला पहिल्या तासाला आठवीच्या नव्या वर्गावर गेलो. वर्गशिक्षकाला वर्गाचे रजिस्टर तयार करावे लागत असे.त्यात प्रत्येक मुलाची सर्वांगीण माहिती भरावी लागत असे.मी एकेका मुलाला बोलावून चौकशी करून नोंद करीत होतो.तो माझ्या समोर येऊन उभा राहिला. मी त्याच्याकडे पाहिलं, बेताची उंची, निमगोरा रंग,गोल हसरा चेहरा, खाकी हाप पॅट, पांढरा शर्ट, डोक्यावर पांढरी टोपी, असा तो नम्रपणे उभा होता. मी त्याला नाव विचारले, तो म्हणाला, " संपत सावंत "गाव कोणते? तो म्हणाला, " औरनाळ " मी विचारले, "ऊत्तूरला तू कोठे राहातोस? तो म्हणाला, "मुख्याध्यापक व्ही.के.पाटील सर यांचे घरी. ते माझे मामा आहेत.त्याच्याकडे क्षणभर पाहतच राहिलो.तर असा हा " संपत " वर्ष दिड वर्षच आमच्याकडे होता. पण या काळात तो सर्व शिक्षकांचा लाडका झाला तसा मुलांतही प्रिय झाला. याच्याजवळ असलेली खिलाडूवृत्ती, प्रामाणिकपणा,शिक्षणातली तळमळ, हिरीरीने सर्वांत भाग घेण्याची वृत्ती यामुळे पाहता पाहता तो सर्वांना हवा हवासा वाटू लागला. कोणतेही काम सांगा. ते झालेच म्हणून समजा. एखादी जबाबदारी त्यांच्यावर टाकली की निर्धास्त रहावे असा शिक्षकाना विश्वास होता.अभ्यासात तर गती होतीच पण मैदानावरही हरिणाची चपळाई होती.त्याच्या जवळ च्या नेतृत्वाची चमकही दिसून आली.इयत्ता नववी नंतर तो शिक्षणासाठी गडहिग्लजला गेला. ऊत्तूरचा संपर्क कमी झाला, पण सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, त्याच्या सहभागामुळे तो माझ्या मनात कायमच राहिला. अधूनमधून मामांचेकडे आला की भेटत असे. पाहता पाहता संपत एम.ए.एम.पी.एड.झाला.महाविद्यालयीन जीवनात त्यांने मैदान गाजवले अनेक स्पर्धात राज्य व राष्ट्रीय स्पर्धात जिंकून आला. मराठी भाषेचा व्यासंग केला. शैक्षणिक उज्ज्वल परंपरा, खेळातील नैपुण्य, या गुणवत्तेवर त्याला जागृती प्रशालेत गडहिग्लजला शिक्षकाची नोकरी मिळालीमिळाली.पण माझ्याशी जुळलेले ऋणानुबंध मात्र त्याचे कायम राहिले.आज गेली पंचवीस वर्षे तो अध्यापनाचे काम यशस्वीपणे करतो आहे. शारीरिक शिक्षक म्हणून त्याची कारकीर्द लक्षणीय आहेच. त्याचे अनेक विद्यार्थ्यी राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत. त्याच्या मराठी विषयाचा निकाल गेले अनेक वर्षे 90/95% लागत आलेला आहे."संपतची "परोपकारी वृत्ती आता अधिक डोळस झाली. समाजभान लक्षात घेऊन तो विविध ऊपक्रमातून मदतकार्य मोलाचे करीत आहे.घरगृहस्थी ची कर्तव्ये ही तो सक्षमपणे निभावतो आहे. दररोज पहाटे पाच वाजता उठून शेताकडे जाणे,जनावरांना वैरण आणणे, नंतर सहा वाजता गडहिग्लजला मैदानावर मुलांना सराव देण्यासाठी हजर. सराव झाल्यावर परत घरी येऊन जेवण करून साडेदहा वाजता शाळेत हजर.हा नियम कधी चुकला नाही. कधी कधी स्पर्धेसाठी खेड्यातल्या मुलगा किंवा मुलगी असेल तर त्या गावाला आणण्यासाठी तो आपली गाडी घेऊन जात असे. प्रसंगी स्वतःच्या खर्चाने राज्य व राष्ट्रीय स्तरावर मुलांना घेऊन जातो. त्यापैकी आज अनेक मोठमोठ्या पदावर काम करीत आहेत. याची कृतज्ञता ती व्यक्त करतात तेव्हा त्याच्या चेहर्यावरचे समाधान आनंद देऊन जाते.ऊत्तूरला असतांना त्याला सुंदर अक्षराची देणगी मिळाली ती त्याने मेहनतीने जोपासली आहे.संपतच्या मराठीच्या व्यासंगामुळे त्याला व्याख्याने ऐकण्याची गोडी लागली. ही गोडी आपल्या पुरती न ठेवता त्याने " माझिया जातीचा मजभेटो कोणी "याला अनुसरून आठदहा मित्रांचे मंडळ तयार झाले. परिसरात कोठेही व्याख्यान असले की तिथे ही मंडळी हजर. आमच्याकडे ऊत्तूरला "संत ज्ञानेश्वर लोकशिक्षण व्याख्यानमाला "ऐकण्यासाठी संपत याना घेऊन हजर. सात दिवस खुर्च्या घालणे काढणे या पासून सर्व काम ही मंडळी करीत असतात. या सगळ्यांचे प्रेरणा स्थान संपतच.कार्यक्रमाचे आयोजन नेटके करण्यात संपतचा हातखंडा. मला हे जमत नाही हा शब्द त्याच्या कोशात नाही. गडहिग्लज परिसरातील जंगी मॅरेथॉन स्पर्धा या चे नियोजन हा त्याच्या डाव्या हातचा मळ . शिक्षण क्षेत्रातील असे एकही ठिकाण नाही की जेथे संपत नाही असे झाले नाही. रेकाॅर्ड डान्स स्पर्धेचा परीक्षक, वक्तृत्व स्पर्धा परीक्षक, निबंध स्पर्धा परीक्षक, राज्य पंच परीक्षेत तो निवडला गेला आहे. मैदानाची आखणी करण्या पासून पंच म्हणून सर्व कामे तो उत्साहाने करतो.समाजभान लक्षात घेऊन तो आपल्या मित्रांना घेऊन अनेक ऊपक्रम राबवतो. सद्या गेले तीन महिने आपल्या शेतकरी मित्रांना घेऊन. सेंद्रीय भाजीपाला लाॅकडाऊन मुळे आजूबाजूच्या भागातील व गडहिग्लज शहरातील लोकांना घरपोच देण्याचा प्रयत्न केला आहे. तो लक्षवेधी ठरला आहे. गेल्या पाच वर्षापासून औरनाळ या आपल्या छोट्या गावात तीन दिवसांची व्याख्यानमाला चालवली आहे. प्रतिसाद छान आहे. दोन तीन हजार श्रोते असतात.शेवटच्या दिवशी व्याख्यानानंतर गाव जेवण दिले जाते. तो कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ही छान करतो. विद्यार्थ्यांच्या सहली, श्रमसंस्काराची शिबिरे,यात तो हमखास पुढे असणारच. "खरंतर हाडाचा शिक्षक हा अष्टपैलू असतो त्याचे छान उदाहरण म्हणजे "संपत सावंत ".मी ऊत्तूरला तीन वर्षे "त्रिवेणी ग्रामीण मराठी साहित्य संमेलन " भरवतो आहे. त्यातही त्याचे मोलाचे सहकार्य लाभत असते. सद्याच्या लाॅकडाऊन च्या काळात स्वयमस्फूर्तीने पोलिसांना मदत करण्या साठी तो महिनाभर राबताना दिसला. मला कधी कधी अस वाटतं की संपत मध्ये अनेक व्यक्तीमत्वे दडलेली आहेत.कधीतरी कोणालातरी मदत करेल ती अगदी गुपचूप. सर्वात असूनही अलिप्त. असा हा आमचा " नारायण " - "संपत सावंत "!!!!!!!!!!!!!

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा