आठवणीतली माणसं - 2
पुस्तक वेडा - प्रशांत!
प्रत्येक माणसाला कशाचं ना कशाचं तरी वेड असतं. असं वेड असल्याशिवाय माणूस घडत नाही. जीवनाला आकार येत नाही. अनेक प्रकारचे वेड असत.कुणाला बाग कामाचं, कुणाला वर्तमानपत्रातली विषयवार कात्रणे काढून फाईली करण,कुणाला दुसर्याला ऊपयोगी पडण्याची सवय,अशी नाना तर्हेची वेड असणारी माणसं आपल्या अवतीभवती असतात आणि इतरांचे लक्ष वेधून घेतात.आपल वेड जपण्यासाठी ही माणसं पराकोटीचा त्यागही करायला तयार असतात.आणि खरं सांगू,कांही तरी सोडल्याशिवा य वेडं होता येत नाही. या वेडानं त्या माणसाला आत्मानंद मिळवून दिलेला असतो. अशी अनेक वेडी माणसं मला आजपर्यंत अनेक भेटली. त्यातलाच एक माणूस म्हणजे " पुस्तक वेडा- प्रशांत ""!!मी ऊत्तूर विद्यालय, ज्युनियर काॅलेज ऊत्तूर मध्ये 33/34 वर्षे अध्यापन केलं.याच काळात हा "पुस्तक वेडा भेटला." साधारण 1994/95 चे वर्ष. इयत्ता अकरावीचा वर्ग. नवीन वर्ष नुकतच सुरू झालं होतं.आजूबाजूच्या खेड्यातून मुलंमुली आमचेकडे येत असत. सकाळी साडे सात वाजता आमचे काॅलेज सुरू होत असे. अकरावीच्या वर्गात कला व वाणिज्य मिळून 150/170 विद्यार्थी-विद्यार्थीनी असत.10 वी नंतर मुलींचे शिक्षण बंद व्हायचं. पण आमच्या काॅलेज मुळे त्यांची शिकण्याची स्वप्ने पूर्ण करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मुलींची संख्या अधिक होती.शिवाय आमचे निकालही सुरूवातीपासून नेहमी च 95% हून अधिक लागत असतं. मी अकरावी/बारावीच्या वर्गाला "मराठी "विषय शिकवित होतो.माझ्या पद्धतीनुसार जून महिन्यात सुरूवातीला एक आठवडाभर मुलांना मराठी साहित्याची गोडी लागावी म्हणून उत्कृष्ट पुस्तकांचा परिचय करून देणे, इतिहास सांगणे, पुस्तके विकत घ्यावी, ग्रंथालयाचा नेहमी वापर करावा अशा पद्धतीने मी मुलांशी सुसंवाद साधत असे. त्यामुळे मुलांची जिज्ञासा वाढून पुस्तक वाचनाकडे मुलांचा ओढा वाढावा हीच इच्छा. त्याचा सकारात्मक परिणाम होत असे.असाच मी 1995 साली इयत्ता 11वीला मराठी चा तास घेत होतो.पहिले 10/12दिवस नेहमी मराठी साहित्याचा इतिहास वगैरे सांगून झाल्यावर मग पाठ्यपुस्तकाकडे वळणार होतो. याच दरम्यान एके दिवशी सकाळी माझा तास झाल्यावर मी स्टाफरूममध्ये आलो. पाचदहा मिनिटांनी एक विद्यार्थी मला भेटायला आला.सावळा रंग, पाच फूटाची उंची,गोल चेहरा,साधी पँट व शर्ट, हातात एक दोनशे पानी वही ,पावसाळा असल्यामुळे छत्री. असा तो समोर येऊन उभा राहिला. सर, मला तुमच्याशी बोलायचे आहे. जरा संकोचूनच उभा राहिला होता."नाव काय तुझे? " "मी प्रशांत कांबळे ".कोणत्या शाळेतून आलास?" तो म्हणाला, "कर्मवीर विद्यालय, चिमणे "..आमचीच शाळा.सुरूवातीला मला वाटले,याला कांही आर्थिक मदत वगैरे काही हवी असेल. पण माझा अंदाज चुकला.तो म्हणाला, "सर, गेले 10/12 दिवसात तुम्ही मराठी भाषेचा इतिहास, तिची समृद्धी, उत्कृष्ट पुस्तकांचा परिचय करून दिलात .हे मला फार आवडले. अजून ऐकत रहावे असे वाटायचे. मलाही वाचनाची आवड आहे. पाचवीपासून".मला खूप आनंद झाला .त्याची वाचनाची आवड जोपासायला हवी म्हणून मी त्याला म्हणालो, "हे बघ ,प्रशांत, मी देत जाईन तुला पुस्तके .कथा,कविता, चरित्र, कादंबरी यातले काय आवडते तुला ते सांग."पुढे अधून मधून तो माझ्याकडून पुस्तके घेऊन जायचा. वाचून परत करायचा.मलाही बरे वाटायचे.दोन तीन महिन्यांनी मला एक गोष्ट जाणवली की ,प्रशांत काॅलेजला थोडा उशीरा येत असे. चिमणे-ऊत्तूर हे सात किलोमीटर चे,अंतर गाडी चुकत असेल म्हणून उशीर होत असेल असे वाटायचे. पण एक दिवस त्याला उशीरा येण्याचे कारण विचारले. तेव्हा प्रशांतने दिलेल्या उत्तरावर मला काय बोलावे ते कळेना .मी अवाक झालो. तो म्हणाला, "सर,दररोज पहाटे साडेपाचला पेपर येतो.तो मला गावात व ऊत्तूरला वाटून मग काॅलेजला यावे लागते."त्याच्या ऊत्तराने मी खरच. ओशाळलो.शिकण्यासाठी हे काम केल्याशिवाय पर्याय नाही. घरची परिस्थिती अगदीच गरिबीची. तरीही शिकण्याची धडपड.माझं मन मला सांगत होतं याला बळ दे.याचा छंद जोपासायला मदत कर.म्हणजे हा मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहील. मी मनाशी पक्का निश्चय केला.प्रशांतला वाचनाची आवड लहानपणापासूनच. तो सुरूवातीला हिंदी पुस्तकांचा संग्रह करायचा ,वाचायचा. 11वीला आल्यावर मराठी साहित्याची गोडी लागली.एक दिवस असचं काॅलेज सुटल्यावर प्रशांत भेटायला आला. मी विचारले, "कांही काम होतं का? तो म्हणाला, "सर,आमच्या गावात वाचनालय नाही. मी काढू का? " मी म्हटलं, अरे, खर्चाचे काम आहे. शिवाय त्याला वेळ द्यावा लागेल. सुरूवातीला पुस्तके गोळा करावी लागतील. तेव्हा तो म्हणाला, "सर,सुरूवातीला तुम्ही मदत करा.नंतर मी घेईन पुस्तके.माझ्या पेपरच्या कमिशन मधून .",अरे पण , घरी खर्चाला द्यावे लागेल ना काही?ते हो मी करीन, सर.पण माझी इच्छा आहे की गावात वाचनालय सुरू करायचे.त्याप्रमाणे सुरूवातीला मी 200पुस्तके दिली. आमच्या काही शिक्षक मित्रांना सांगून पुस्तके जमा केली. गडहिग्लज मधील काही स्नेह्यानी मदत केली आणि नोंदणीसाठी 300पुस्तके जमा झाली. कागदपत्रांची जमवाजमव केली व धर्मादाय कार्यालयात रितसर नोंदणी साठी अर्ज केला. तो सकाळ पेपर टाकायचा म्हणून सकाळ वाचनालय असे नाव ठरले. थोड्या दिवसात मंजुरीचे पत्र आले. सर्वांना आनंद झाला. 1996साली प्रशांत च्या घरी वाचनालय सुरू झाले.दैनिकं , मासिकं, साप्ताहिकं आली. गावात नवलाई आली.मोफत पेपर वाचायला मिळतात म्हणून वर्दळ सुरू झाली. प्रशांत दरमहा कमिशन मधून पुस्तकं घेऊ लागला. सुरूवातीपासून मी दरमहा त्याला जमेल तशी पुस्तके देत असे.त्याला दर्जेदार पुस्तके च घ्यावयाची ही सवय लावली आहे.असेच दिवस जात होते. प्रशांतला पुस्तकांचा ध्यासच लागला. वाचनालयाला"ड"वर्ग मिळाला.अनुदानही सुरू झाले. त्यातूनही पुस्तके आणली. ओळखी पाळखीतून पुस्तके आम्ही गोळा करू लागलो.त्याची जिद्द पाहून मीही त्यात गुंतत गेलो.कोल्हापूर चे स्नेही रवींद्र जोशी, राम देशपांडे, रजनी हिरळीकर, स्नेहा वाबळे यांचे कडूनही विनंती करून पुस्तके आणली .ग्रंथालयाला आकार येऊ लागला. प्रशांत तर जीव ओतून काम करत होता.घर संसार, तुटपुंजी शेती हे सर्व सांभाळून तो वाचनालयाकडे लक्ष देत होता. आता "क-वर्ग" मिळविण्यासाठी धडपड सुरू झाली. अर्ज केला.ऊत्तम रितीने तयार केलेले दप्तर. ऑडिट, हे सर्व पाहून आयुक्तांनी "क वर्ग " मंजूर केला. अनुदान वाढून मिळू लागले.कांही दिवसानंतर प्रशांतच्या अविरत धडपडीला यश आले आणि वाचनायाला "ब-वर्ग " मिळाला.आता अनुदान ही वाढले वाचनालयाचे सुशोभीकरण केले. साप्ताहिक,मासिके, मुलांची मासिके, दैनिके ,वाढली. विद्यार्थी, पालक, शिक्षक, महिला यांची पावलं वाचनालयाकडे वळू लागली. बालविभाग,महिलाविभाग,स्पर्धा परीक्षा विभाग असे विभाग केले.दर वर्षी कर्मवीर विद्यालय या शाळेचे सहकार्याने मुलामुलींसाठी निबंध, हस्ताक्षर, वक्तृत्व , रांगोळी, या स्पर्धांचे आयोजन केले जाते. महिलांसाठी हळदीकुंकु आदी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आता वाचनालयाला जागा कमी पडू लागली. प्रशांत पुन्हा माझेकडे आला. सर ,आता एक जागा मिळते घेऊया का? मी होकार दिला. जागा मिळाली. आता इमारतीचा विषय मनांत घोळू लागला. राजा राम मोहन रॉय फौंडेशनकडे चौकशी केली. त्यांची कागदपत्रे गोळा करून प्रस्ताव तयार करून पाठवला. आणि योग असा की फौंडेशनने इमारती साठी साडेचार लाख रुपये मंजूर झाले. कांही दिवसानंतर सुंदर ज्ञान मंदीराची इमारत डौलाने ऊभी राहिली. यासाठी "ब-वर्ग "मिळावा म्हणून रवींद्र जोशी यांनी फार मोठी मदत केली. चिमण्यासारख्या एका छोट्याशा गावात इतकी सुंदर वाचनालयाची इमारत उभी करावी हे स्वप्न प्रशांत कांबळे यांने पाहिले आणि ते सत्यात ऊतरवले. आता ग्रंथालय स्वतःच्या जागेत ऊभे आहे. चिमणे गावाचे वैभव बनले आहे. एका वाचन वेड्या मुलाने केलेल्या भगीरथ प्रयत्नांची ही कथा आहे. आता ग्रंथालय दहा हजार पुस्तकांचा टप्पा गाठणार आहे. 2021हे ग्रंथालयाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. ही प्रशांतने अनेकांनी केलेल्या सहकार्याच्या बळावर घेतलेली गरूडझेप आहे. प्रशांतने मला या वाचनालयाचा पदसिद्ध अध्यक्ष होण्याचा हट्ट धरला आणि तो मला नाकारता आला नाही. असा हा वाचन वेडा प्रशांत!!!!!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा