आठवणीतली माणसं - 1

 जंबू गुरुजी


साधारण 65 वर्षांपूर्वीचा काळ. मला सहा वर्षे झाली म्हणून माझ्या आजोबांनी शाळेत घालावयाचे ठरविले. ऊत्तूर हे माझे आजोळ. त्यावेळी चारपाच हजार लोकसंख्या असावी. सरकारी शाळेची एक लहानशी इमारत होती. पण आमचे वर्ग गावातल्या मंदीरात भरत असत. माझा पहिलीचा वर्ग महादेवाच्या मंदीरात भरत होता. जून महिन्यात एके दिवशी आजोबांनी घरात सांगून टाकले की, राजाला शाळेत घालावयाचे ठरविले आहे. तयारी करा. हे ऐकून मी रडायला लागलो.आजीजवळ हट्ट धरला. पण आजोबांपुढे कोणाचेच काही चालले नाही. आजोबांनी हौसेनं नवी पिशवी, नवी कोरी पाटी, अंकलिपी, पेन्सिली चा एक बाॅक्स, पट्टी, नवा ड्रेस, जरीची टोपी, पाटी पूजनाचे साहित्य, हे सगळे साहित्य आणले. सकाळी लवकर आंघोळ केली, पिशवी भरली, न्याहरी उरकली व तयार झालो. आजोबांनी घरातल्या देवाला नमस्कार करायला सांगितलं, नंतर घरातील वडील मंडळींना नमस्कार केला व आजोबांचे बोट धरून मी घरातून बाहेर पडलो. सकाळचे साडेदहा वाजून गेले होते. घराजवळच महादेवाचे मंदीर असल्यामुळे पाच मिनिटातच मंदीरात पोचलो. मंदीराच्या आवारात माझ्याच वयाची मुलं खेळत होती. ते पाहून मला जरा बरं वाटलं अकरा वाजता प्रार्थनेची घंटा वाजली. महादेव मंदीराच्या पटांगणात ओळीने मुलंमुली ऊभी राहू लागली. इतक्यात एक गृहस्थ समोर आले. साधारण साडेपाच फूटांची उंची, तांबूस वर्ण,भरदार शरीरयष्टी, कमावलेली पिळदार. डोक्यावर टोपी, पांढरे शुभ्र धोतर परीटघडीचे ,अंगात शुभ्र नेहरू शर्ट, बहुतेक टक्कल असावे .हातात दीड फूटाचा शिसवी रूळ .त्यांनी माझ्या आजोबांना आदराने नमस्कार केला. आजोबांनी मला त्यांना नमस्कार करायला सांगितलं. गुरुजींनी मला सर्वांत पुढच्या रांगेत उभे केले. वरून तर गुरूजी राकट, दिसत होते. भरदार आवाजात सावधानची ऑर्डरही दिली. एका मुलाने प्रार्थना सांगितली. त्यांच्या मागून सर्वांना म्हणायला सांगितली. नंतर सुविचार, आजची बातमी झाली. ओळीने मुले आपापल्या वर्गात गेली. गुरुजींनी मला हाताला धरून पहिलीच्या वर्गात नेले. माझी ओळख करून दिली. त्यानंतर पाटीपूजन झाले. गुरुजींनी मला मांडीवर बसवून घेतले. मला पाटी कशी धरायची, पेन्सिल कशी धरायची ते बोटाला धरुन शिकवले. आणि आयुष्यातला पहिला श्री गणेशाय नमः ओम् नमः सिद्धम ,पहिला धडा लिहून घेतला. शिक्षणाची सुरूवात झाली ती आजही सुरूच आहे. सर्वांना बत्तासे वाटले. मी दिवसभर पाटीवर गिरवतच होतो. दुपारच्या सुटीत मला घेऊन मुलं खेळत होती. अशा रितीने शिक्षणाची सुरवात झाली. पहिला दिवस .कुतूहल मिश्रित आनंदात गेला. गुरुजींची अद्यापही म्हणावी अशी ओळख झाली नव्हती. शाळा सुटल्याची घंटा वाजली आणि सर्वजण दप्तर घेऊन उड्या मारत घरी आलो. आजीला खूप आनंद झाला. दिवसभर मी तिच्याजवळ नव्हतो. त्यामुळे चुकल्या सारखं वाटतं होतं तिला. हात पाय स्वच्छ धुवुन आजीने दिलेला खाऊ ,दूध प्यालो. मग जरा खेळ खेळत दिवे लागणीच्या वेळेला घरी आलो. परवचा, शाळेचा अभ्यास केला. असेच दिवस जात होते.जंबू गुरुजीं मुळचे भुदरगडच्या जवळ पाटगावचे. त्यावेळी दळणवळणाची साधने उपलब्ध नव्हती. म्हणून गुरूजी दर सोमवारी घोड्यावरून यायचे. आम्हाला नवल वाटायचे. घोडे आमच्या घरासमोर च बांधायचे. परत शनिवारी पाटगावला जातांना घोड्यावरून जात असत.वरून फणसासारखे दिसणारे गुरूजी आतून मात्र गर्यासारखे रसाळ होते.अनेक वेळा प्रेमळ भाषेत समजावून सांगत असत. पण लक्ष नसले की मात्र शिसवी रूळाचा मार मिळायचा. पालकाकडे तक्रार करण्याची सोय नसायची कारण मार दुप्पट मिळायचा. गुरूजींचे उच्चार शुद्ध व स्पष्ट होते.मुलांचेही तसेच असावे असा कटाक्ष असायचा. त्यात चुकारपणा केला की शिक्षा ठरलेली. प्रसंगी एका पायावर उभे राहून पाढे, कविता पाठांतर करावे लागे. दररोज पाटी स्वच्छ घासून पुसून ठेवलीच पाहिजे असा नियमच होता. सगळ्यांची दप्तरं ते रोज तपासून पाहायचे. वावगेपणा त्यांना आवडत नव्हता. त्यांनी एकदा शिक्षा केल्यामुळे घड्याळ पाहायला शिकलो तसेच बे पासून औटकी, अक्करकी पर्यंत पाढे पाठ केले ही गोष्ट आयुष्य भर लक्षात राहिली. त्याच प्रमाणे चांगल्याच ते कौतुकही करायचे .पाठांतरावर त्यांचा भर होता. त्याचा मला खूप ऊपयोग आजही होतो आहे. हीनविसरता येणारी गोष्ट आहे. वळणदार अक्षर ही त्यांचीच देणगी आहे.मी तिसरीत जाईपर्यंत गुरूजी ऊत्तूरला होते. नंतर ते भुदरगड तालुक्यात बदलून गेले. नंतर मात्र संपर्क राहिला नाही. आमच्याकडे गोकुळ अष्टमीला कृष्ण जन्माचा ऊत्सव असायचा. यानिमित्ताने सगळ्या गावाला सायंकाळी मसाले दूध दिले जायचे. विविध क्षेत्रातील आजोबांचे स्नेही यायचे. दुपारी चारवाजल्या पासून रात्री आठ वाजे पर्यंत दूध वाटप चालायचे.त्यामुळे सर्वाशी परिचय व्हावा हाच हेतू होता. आमचे सगळे गुरूजी यायचे. जंबू गुरूजी चे व आजोबांचे संबंध जिव्हाळ्याचे होते. गुरूजी दरवर्षी पंढरपूरला जात असत. गुरूजींकडून खूप शिकायला मिळाले. त्यांना खोटेपणाचा राग यायचा. मी काॅलेजला गेलो तेव्हापासून त्यांना भेटावे असे वाटत होते. पण तो योग काही कधी आला नाही. पण गुरूजीनी माझ्या जडणघडणीचा पाया घातला एवढ मात्र खरं. काही माणसं आयुष्यभर लक्षात राहतील अशी असतात. त्यातले एक म्हणजे जंबू गुरूजी!! तस्मै श्री गुरूवे नमः!!!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आठवणीतली माणसं - 17

समाजसेवेचा वसा आणि वारसा जपणारे उमेशराव आपटे !

आठवणीतील माणसं - 5